...जिथल्या तिथेच सारे !

.........................................


...जिथल्या तिथेच सारे !


.........................................येती विचार, जाती विचार...जिथल्या तिथेच सारे !
मेंदू बधीर, मन थंडगार...जिथल्या तिथेच सारे !


हेही करीन, तेही करीन, म्हणतो मनोमनी मी...
स्वप्नेच फक्त माझी हजार...जिथल्या तिथेच सारे !


मज डावलून,  संधी हसून गेली अनेक वेळा...
मीही कधीच नव्हतो तयार...जिथल्या तिथेच सारे !


होईन शूर, जाईन दूर, ठरले कितीकितीदा...
माझे मलाच उघडे न दार...जिथल्या तिथेच सारे !


ठरवून भेट, केव्हा न थेट झाली तुझी नि माझी...
भेटीवरून चर्चाच फार...जिथल्या तिथेच सारे !


डोळे मिटून, गेली निघून काळापल्याड आई...
ती वेळ, काळ, तारीख, वार...जिथल्या तिथेच सारे...!!


हा व्यर्थ खेळ, साराच वेळ गेला असाच वाया...
झाली न जीत, झाली न हार...जिथल्या तिथेच सारे !


नुसताच गर्व,  बदलून सर्व म्हणतोस टाकले तू...
माऱू नकोस बाताच यार...जिथल्या तिथेच सारे !


नाही अजून,  नाही अजून देहापल्याड गेलो...
माझे विचार, माझे विकार...जिथल्या तिथेच सारे !


तो यामुळेच,  जिथल्या तिथेच थांबून राहिलेला...
दुसऱ्यांवरीच त्याची मदार...जिथल्या तिथेच सारे !


वाटेल हेच, राहो असेच...पण राहणार नाही -
- ती वाट, ती नदी,  झाड, पार...जिथल्या तिथेच सारे!


.........................................


-  प्रदीप कुलकर्णी


...........................................

गझल: 

प्रतिसाद

पहिले ३ आणि आई हे शेर फार आवडले!

मज डावलून,  संधी हसून गेली अनेक वेळा...
मीही कधीच नव्हतो तयार...जिथल्या तिथेच सारे !

होईन शूर, जाईन दूर, ठरले कितीकितीदा...
माझे मलाच उघडे न दार...जिथल्या तिथेच सारे ! .. हे शेर आवडले
-मानस६

वाव्वा! सगळेच शेर चांगले आहेत. नेहमीप्रमाणेच गझल फार आवडली.


होईन शूर, जाईन दूर, ठरले कितीकितीदा...
माझे मलाच उघडे न दार...जिथल्या तिथेच सारे ! ठरवून भेट, केव्हा न थेट झाली तुझी नि माझी...
भेटीवरून चर्चाच फार...जिथल्या तिथेच सारे !

डोळे मिटून, गेली निघून काळापल्याड आई...
ती वेळ, काळ, तारीख, वार...जिथल्या तिथेच सारे...!!

नाही अजून,  नाही अजून देहापल्याड गेलो...
माझे विचार, माझे विकार...जिथल्या तिथेच सारे !हे शेर सध्या विशेष आवडताहेत.

प्रदीपजी, अतिशय सुंदर गझल... आईच्या शेराने डोळ्यांत पाणी आलं.. 

या गझलला गुंगवणारी लय आहे.गर्व,सर्व,  खेळ,वेळ अशा शब्द समुहामुळे ही गझल वाचताना खूप मजा आली.अर्थात,हा नुसता शब्दांचा खेळ नसून अर्थही तितकाच दमदार आहे, हे सांगायला नकोच.

हेच शेर आवडले.
विशेषतः 'विकार'हा शेर पुन्हा पुन्हा वाचावासा वाटला.