कशासाठी ?

दूरच्या फुलातुनी हे, पाहणे कशासाठी ?
स्पंदनात श्वास बनुनी, वाहणे कशासाठी ?

बोल तू  मनामधला, शब्द शब्द बेतलेला
कोष पांघरून परके, राहणे कशासाठी ?

वेदनेस अंतरीच्या, वाट तू गुलाबांना
खोचला उरात काटा, साहणे कशासाठी ?

गंध कस्तुरीचा तू, रंध्र रंध्र भारणारा
लेपुनी सुगंध खोटा, नाहणे कशासाठी ?

जीवनास एकट्याने, भेटणे मनी होते
जीव लावूनी कुणाचे, जाहणे कशासाठी ?

खंत खेद ना कशाचा, वेड घेरूनी यावे
घाव झेलण्यास व्हावे, शाहणे कशासाठी ?

 

 

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

बोल तू  मनामधला, शब्द शब्द बेतलेला
कोष पांघरून परके, राहणे कशासाठी ?
गझलेचे व्याकरण म्हणजे सर्व नसले तरी आवश्यक आहे हे लक्षात ठेवले तर आपली गझल अधिक बहरेल...
शुभेच्छा

मस्त आहे...! खुप आवडली.

प्रयत्न छानच. २रा, ३रा, चौथा शेर चांगले. पण माझा यापूर्वीचा संदेश आपणास मिळाला असेल असे समजून पुनरावॄत्ती करीत नाही. मात्र,
वेदनेस अंतरीच्या, वाट तू गुलाबांना
खोचला उरात काटा, साहणे कशासाठी ? ...यातील 'खोचला'चे प्रयोजन 'कशासाठी'? उमजत नाही.
जीवनास एकट्याने, भेटणे मनी होते
जीव लावूनी कुणाचे, जाहणे कशासाठी ? ... यातील 'जाहणे' हा शब्दप्रयोग मला तरी चुकीचा वाटतो. हा शब्द 'झाले' या अर्थी असेल तर टीक. पण मग शेर निरर्थक होतो. आपणास 'जाणे' अपेक्षित आहे, असे मला वाटते. चुकीचे असेल तर माफ करा.
खंत खेद ना कशाचा, वेड घेरूनी यावे
घाव झेलण्यास व्हावे, शाहणे कशासाठी ?...यातील 'शाहणे' हा फारच सवलत घेवून वापरला आहे असे वाटते. टाळला पाहिजे.
घाई करू नका. आपण गझल लिहू शकता एवढे सांगणारी आपली गझल (!) आहे हे निश्चित. शुभेच्छा.
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०