आकलनक्षमता

    मराठी गझल मराठी समाजातच रुजलेली नाही, हे आता नव्याने सांगण्याचं कारण नाही.
या मागच्या कारणांचा मी माझ्या परीने शोध घेतला. आलेले अनुभव आणि त्यावरून तयार
झालेले विचार मांडत आहे.

    अपुरी जाहिरात, हे प्रमुख कारण आहे आणि ते सर्वज्ञात आहे.
    मला निराळ्या कारणावर भर द्यायचा आहे.

    सहज बोलता बोलता मी ज्यांना ज्यांना सांगितलं, की मी गझल करतो; त्यांनी त्यांनी
माझ्या बोलण्याचा अर्थ मी कविता करतो, असाच घेतला. अपवादानंच एखाद्याने ' ऐकवा एखादा शेर'
असं म्हटलं असेल. कारण स्पष्ट आहे. गझल हा विशेष प्रकार आहे,हे माहीत नसतं. गप्पांच्या ओघात 'काय मस्त गाणं आहे नाही!' एवढ्यावरच गझलेची बोळवण केली जाते. काहींना तर चंद्र, किनारा, बदनामी असे शब्द असलेली कोणतीही रचना गझल वाटते. इतर गैरसमजुती तर खूप आहेत.

     माहीत नसेल तर माहीत करून देणं हे आपलं काम आहे, या विचाराने मी माहिती देऊ लागलो.
वृत्त, रदीफ, काफिया या मूलभूत बाबींची माहिती सांगून प्रसिध्द गझलांची उदाहरणेही देऊ लागलो.
सर्व सांगितल्यानंतर मी एखादी सुप्रसिध्दच गझल ऐकवायचो व 'रदीफ, काफिया' कोणते, असं 
विचारायचो. काहींनी अचूक उत्तरं दिली पण बरेच जण गोंधळात पडल्याचंच चित्र होतं.  अशा परिस्थितीत इतर नियम-तपशील पुरवणं तर लांबच राहतं. ऊदाहरणं सांगितल्यावरही लोकांच्या डोक्यात झटकन काही शिरत नाही.

     सूक्ष्म भावनांचं सर्वाधिक प्रत्ययकारी चित्रण बहुधा फक्त गझलेतच होत असावं. खरी गोम इथेच आहे.
या भावना जोपर्यंत कळणार नाहीत, तोपर्यंत गझल समजणं शक्य नाही. आकलनक्षमतेचीच अडचण आहे, असं वाटतं. मराठी भावगीतांच्या गुहेतून आपले लोक बाहेर यायला तयार नाहीत. ती समजायला(!) सोपी  असतात.  शेर मूळचाच इतका जबरदस्त असतो, की दाद मिळवून जातोच जातो. पण या आकलनाच्या अडचणीमुळे कळत नाही. 'सुरेश भट' हे नाव अनेकांना माहीत असतं, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.
    भावगीतं ऐकायला विरोध नाही, पण राहून राहून एक प्रश्न सतावतो आणि त्याचं उत्तर मिळत नाही...
    आपले लोक गझलेचे नियम न समजण्याइतके खुळे आणि सूक्ष्म भावना अजिबातच नसणारे
    असे आहेत का ?


   - केदार पाटणकर
          
          
 

गझलचर्चा: 

प्रतिसाद

केदार, मी आपल्या 'आकलना'बाबतच्या निरिक्षणाशी पूर्णपणे असहमत आहे.

१. 'गझलेचे नियम न समजणं' आणि 'गझलेतल्या सूक्ष्म भावना न समजणं' यांची तुम्ही categorical गल्लत केली आहे. एकाचा दुसर्‍याशी काहीही संबंध नाही.

२. मी माझ्या अनेक हिंदी-भाषिक मित्रांशी गझलबाबत चर्चा केली आहे. त्यांनाही मिसरे, शेर, रदीफ, काफिया, अलामत, मतला हे सहजासहजी समजत नाहीच! एखाद्याच्या 'मराठी' असण्यामुळे हे नियम क्लिष्ट होतात असे नाही तर ते मुळातच क्लिष्टच आहेत. 'रंग और नूर की बारात किसे पेश करू' ही गझल नाही हे समजावूनही किती लोकाना पटू शकते?

३. गझलचं जाऊद्या, आज किती लोकाना वृत्त कळतात? किती लोकाना सुनीत म्हणजे काय ते कळते? किती लोकाना हायकू काय ते कळते? एवढेच कशाला, किती लोकाना अभंग आणि ओवी यातला तांत्रिक भाग कळतो? रूपक-उत्प्रेक्षा-उपमा यातला फरक कळणारे कितीसे महाभाग अजून शिल्लक आहेत? एकूणच समाजात काव्याच्या तांत्रिक अंगाबाबत उदासीनता आहे.

४. 'एखादा गझल करतो' याचा अर्थ 'तो कविता करतो' असा घेतला गेला तर त्यात तर्कदृष्ट्या 'चूक' काहीच नाही. एखाद्या गोष्टीतले specifics उमगले नाहीत म्हणून ते general understanding चूक होत नाही. आपण 'complex electromagnetic discharge in space' ला 'वीज' च म्हणतो. आणि ते अपूर्ण ज्ञान असले तरी चूकीचे नाही. गझल ही नखशिखांत कविता असावीच लागते.

५. 'सोपं' असणं किंवा नसणं याचा 'दर्जेदार' असण्याशीही काही थेट संबंध नाही. एखादी रचना सोपी आणि दर्जेदार असू शकते, दुसरी अवघड आणि दर्जेदार, तिसरी सोपी आणि दर्जाहीन, चौथी अवघड तरी दर्जाहीन. ही सर्व उदा. आपल्याला सहज आढळून येतात.

६. उगाच 'भावगीता' ना धोपटण्यात काही अर्थ नाही. केवळ एखादी कृती रचनेने भावगीत आहे म्हणून ती निकृष्ट आणि दुसरी रचनेने गझल आहे म्हणून ती दर्जेदार ठरत नाही. 'रंग और नूर की बारात किसे पेश करू' ही गझल नसली (आणि माझ्या मतानुसार हे एक भावगीतच ठरते) तरी एक उत्तम काव्य आहे यात काय शंका? तुकारामाने गझलांच्या ऐवजी अभंग लिहिले म्हणून काय त्यात सूक्ष्म भावना आणि सूक्ष्म विचार नाहीत की काय?

७. गझलच्या रसग्रहणाच्या आड येणारा मला निरिक्षणाअंती जाणवलेला एक खराखुरा अडथळा असा की - द्विपदी ही संकल्पना पटकन गळी उतरत नाही. अगदी बुद्धिमान रसिकही शेरांमधला परस्परसंबंध शोधत राहतात आणि तो न आढळल्यामुळे थोडे निराश होतात. पण हा अडथळा दूर केला तर मग खरा रसिक केवळ रचना 'गझल' आहे म्हणून आकलनात कमी पडतो असे मला तरी जाणवलेले नाही.

असो.
शेवटी, कुठल्याही प्रकारचा प्रचारकी अभिनिवेष प्रयत्नपूर्वक टाळलाच पाहिजे. झेंडे नाचवण्याच्या उत्साहात अभ्यासाधारीत तर्क बाजूला राहतो आणि 'सूक्ष्म भावनांचं सर्वाधिक प्रत्ययकारी चित्रण बहुधा फक्त गझलेतच होत असावं' अशी विधाने केली जातात. कोणत्याही समाजसमूहाबाबतची कोणतीही मते शास्त्रशुद्ध विचार-अभ्यासानंतरच मांडली जावीत हीच माफक अपेक्षा.

कळावे, लोभ असावा, राग नसावा!

-- पुलस्ति.
 

 आपले लोक गझलेचे नियम न समजण्याइतके खुळे आणि सूक्ष्म भावना अजिबातच नसणारे
    असे आहेत का ?
नाही, खुळे नाहीत आणि सूक्ष्म भावना नसणारेही नाहीत. पण गझलेचे नियम ,मनात आले लिहुन मोकळे अशा गद्य कवितांसारखे नाहीत.आज सगळा झटपट चा जमाना आहे, सगळ सेकंदाच्या आत झाल पाहिजे, गझल कळली नाही तर कित्येकांचे काही बिघडत नाही. एकंदर काव्य प्रांतातच तस आहे. म्हणून लोकांचा उत्साह दिसत नाही. 
मला तरी वाटते की गझल  आणि त्यातले सौंदर्य काही प्रमाणात समजावून सांगण्याची गरज आहे, त्याला जाहीरात म्हणायचे कारण नाही.आज आपल्या प्रत्येक छंदाविषयी जसे लोक कौतुकाने सांगतात तसेच या कडेही पाहावे. प्रत्येक कला समजून घेण्याची सारखी कुवत देवाने प्रत्येकाला सारखी दिली असेल असे नाही. पण प्रयत्नांनी कित्येक गोष्टी काही पातळीपर्यंत कळू शकतात. तसेच गझलेचे आहे.
 भावना समजण्याकरता संवेदना असणे आवश्यक आहे, जगात सगळीकडे व्यवहार पाहणार्‍यांना या गोष्टी अवघड वाटू शकतात. अतिभावनाप्रधान माणस आणि कोरडी व्यवहारी माणस यांच्या कोणत्याही कलेच्या दृष्टीकोनात फरक असतो , फरक पडतो निदान असे मला वाटते. तसा माझा अनुभवही आहे.
आकलनक्षमता ही वेगवेगळ्या गोष्टीत वेगवेगळी असू शकते, गझल शायराला वाटते तेवढी किंवा तशी कळली नाही म्हणून कोणी एकदम बुद्धू आहे असे म्हणणे योग्य वाटत नाही. पण त्यांना त्या संवेदना कळल्या असतील तर त्यात अथवा पद्धतीत काय विशेष आहे ते समजले नाही किंवा जाणवले नाही असे सुद्धा म्हणता येईल.
 
सोनाली
 
 

मला वाटते गझल आस्वादताना 'गझलेतल्या सूक्ष्म भावना' आणि गझलेची
structural beauty या दोन्हींचे भान असल्यास अधिक आनंद/लाभ होईल. रदीफ-काफिया यांची जाण आवश्यक असे नक्कीच नाही. पण ते त्यासाठी पूरक निश्चितच आहे.
`'एखादा गझल करतो' याचा अर्थ 'तो कविता करतो' असा घेतला गेला तर त्यात तर्कदृष्ट्या 'चूक' काहीच नाही. एखाद्या गोष्टीतले specifics उमगले नाहीत म्हणून ते general understanding चूक होत नाही.'
-मान्य आहे पण या गैरसमजाचे consequences भयानक असू शकतात. उदाहरणार्थः
मी मुंबई च्या गझलसंमेलनात गझल म्हणून कविता सादर करणारे महाभाग पाहिले आहेत. या उलट अनेक लायक लोक (मी त्यातलाच एक) प्रेक्षकांत होते. या गोष्टी टाळण्याकरता मला वाटते प्रत्येकाने जिथे-जिथे गैर-समज दिसतील तिथे-तिथे बोंबलून सांगायला  हवे की गझल म्हणजे फक्त कविता नव्हे. समजो वा ना समजो गझलेचे बाह्यरूप सांगायचा प्रयत्न करावा. किमान एवढे कळाले की कुठली ही कविता ही गझल नसते तरी खूप.

मा.पुलस्ति,
चर्चेबद्दल धन्यवाद.
हे व्यासपीठ मनमोकळ्या चर्चेसाठीच आहे. राग तर नाहीच. लोभच आहे.
आपल्या काही मुद्यांबद्दल -
१. दोन मुद्दे स्वतंत्रच आहेत. कुठेही गल्लत केलेली नाही, हे मी नमूद करू इच्छितो. गल्लत करण्याचा 
    प्रश्न  उद्भवतच नाही.
२. आपला दुसरा आिण तिसरा मुद्दा वाचून ममाधान झालं. 'एकूणच  समाजात काव्याच्या     तांंत्रिक अंगाबाबत उदासीनता आहे' व 'किती लोकाना सुनीत म्हणजे काय ते कळते?' या विधानांमुळे गझलेबाबतची खंत जरा कमी झाली. 'गझलेचे नियम मुळात क्लिष्ट आहेत' हे मात्र फारसे पटत नाही.
३. मुद्दा चारच्या पहिल्या वाक्याशी अगदी सहमत आहे. 'एखादा गझल करतो' याचा अर्थ 'तो कविता करतो' असा घेतला गेला तर त्यात तर्कदृष्ट्या 'चूक' काहीच नाही. एखाद्या गोष्टीतले specifics उमगले नाहीत म्हणून ते general understanding चूक होत नाही' या बद्दल दुमत नाही. गझल कविता असते, हे सर्वमान्य आहे.
     मला general understanding बद्दल बोलायचेच नाही.specifics बद्दल बोलायचे आहे. specifics समजत नाहीत, म्हणून दुःख.
४.सातव्या मुद्याशीही मी खूप सहमत आहे. 'द्विपदी ही संकल्पना पटकन गळी उतरत नाही. अगदी बुद्धिमान रसिकही शेरांमधला परस्परसंबंध शोधत राहतात आणि तो न आढळल्यामुळे थोडे निराश होतात.' हे अगदी अचूक आहे. तसं त्यांनी करू नये, म्हणून नियम समजावले जातात. ते त्यांना न कळल्यामुळे विषाद वाटतो.
५.इतरही साहित्यप्रकारांत सूक्ष्म भावनांचं चित्रण होऊ शकतं.याबाबत एखादं उदाहरण दिल्यास माझ्या ज्ञानात भर पडेल. 'सूक्ष्म भावनांचं प्रत्ययकारी चित्रण गझलेत होतं' या विधानाला कोणाची हरकत नसावी.
६.भावगीतांचा दर्जा, अभिनिवेष, झेंडे या प्रदेशांत माझा मुद्दा फिरकतही नाही.
    या सगळ्याच्या उल्लेखाचं प्रयोजन समजत नाही. 
  केवळ, 'नियम का समजत नाहीत?' व 'सूक्ष्म भावना नाहीत का'? एवढ्यापुरताच विषय मर्यादित होता.
  एक प्रांजल निरीक्षण होतं. दोन प्रामाणिक प्रश्न होते.
  मुद्याला फाटे फोडले जाऊ नयेत, ही माफक अपेक्षा. 
  आपल्याशी एक चांगला संवाद झाला.
 
 
  आपला,
  केदार पाटणकर 
  
 
 

 

प्रतिसादाबद्दल धन्यवाद, सोनाली. 
मला पडलेल्या प्रश्नाचे आपण ठामपणे उत्तर दिलेत, दिलासा मिळाला.
'गझलेचे नियम ,मनात आले लिहुन मोकळे अशा गद्य कवितांसारखे नाहीत.आज सगळा झटपट चा जमाना आहे, सगळ सेकंदाच्या आत झाल पाहिजे, गझल कळली नाही तर कित्येकांचे काही बिघडत नाही.' हे अगदी खरं आहे.
नियम फारसे क्लिष्ट नाहीत तरीही,'मनात आले लिहून मोकळे' असेही नाहीत. नियम आत्ससात करून घेऊन लिहायला वेळ लागतो. कष्ट लागतात. 
प्रयत्नांनी कित्येक गोष्टी काही पातळीपर्यंत कळू शकतात, हे मान्य आहे.
 बुद्धू कोणीही  नाही. आपल्याच लोकांमधून प्रतिभावान कवी व बुिध्दमान रसिक जन्माला आले आहेत.
केवळ कधी कधी तांत्रिक गोष्टी समजत नाहीत.म्हणून शंका उपस्थित होतात. त्यासाठी, आपण म्हटल्याप्रमाणे प्रयत्न आवश्यक आहेत. 

आपला,
केदार पाटणकर