सुरेश-५
सुरेशच्या वर्तनाच्या, बोलण्याच्या, खाण्यापिण्याच्या सवयी पाहून ज्यांच्या सुसंस्कृतपणाच्या कल्पनांची परीटघडी मोडते, त्यांच्या क्वचित अनुभवातून व बव्हंशी तल्लख कल्पकतेतून सुरेशबद्दलच्या दंतकथांचे पेव फुटलेलेही कुठे कुठे आढळून येते. एखाद्याच्या हयातीत त्याच्याबद्दलच्या आख्यायिकांचा सुळसुळाट होणे व त्या चविष्टपणे चघळीत अधिकाधिक प्रसृत होणे, त्याच्या असामान्य व्यक्तित्वाचे व लौकिकाचेच लक्षण समजावे लागेल. त्यामध्ये तथ्याची राई असेलही; पण त्यावर उभारलेला पर्वतच लोकांना अधिक प्रेक्षणीय वाटतो. अशी सुरेशची दोन रूपे आहेतच. काव्याव्यतिरिक्तचा सुरेश हा पुष्कळांच्या बाबतीत अप्रिय ठरेल. त्याची भाषा, भूषा, वर्तनाची व भाषणाची शैली, त्याच्या काही सवयी ही त्याच्याविषयीची अप्रियता रुजवणारी आणि क्वचित वाढविणारी कारणे असू शकतील. अलीकडे प्रतिष्ठाप्रेमी स्वजनही या सुरेशला टाळू पाहतात. त्यांचे 'इस्त्री'चे कुटुंबजीवन सुरेशच्या आगमनाने किंवा सहवासाने चुरगळून जाऊ नये, याची ते काळजी घेतात. जवळच्या स्वकीयांच्या अशा दक्षतेमुळे सुरेशबद्दलच्या आख्यायिकांना अधिकृतपणे पाय फुटतात व त्या आत्मविश्वासाने दाही दिशांना सैराभैरा धावू लागतात. काव्याबाहेरचा सुरेश पाहून हा कवी असू शकेल, यावर कुणाचाही सहजासहजी विश्वास बसू शकत नाही, हेही खरे आहे. पानपट्टीच्या दुकानावर चुन्याची व काथाची बोटे पुसणारा व तळहातावर तंबाखू मळीत बसलेला एखादा गंडाधारी मग्रूर मल्ल 'मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे', यासारख्या मृदुमुलायम ओळी लिहील, यावर कुणीतरी का विश्वास ठेवावा? त्याच्या एरवीच्या संभाषणातील रांगडेपणा अनुभवून बिचकलेल्या कुणालाही 'सूर्य चंद्र या स्वप्नाचे द्वारपाल झाले' अशी ओळ अचानक स्फुरू लागली, तर उद्या गुंडांच्या अड्ड्यावर नववधूच्या प्रणयप्रभेची सोनपावले उमटू लागायला काय हरकत आहे?
पण तोच सुरेश कविताही करतो, गुंगवून टाकणाऱ्या, कैफ आणणाऱ्या, मनामध्ये सतत रुंजी घालणाऱ्या सुरेल ओळी लिहितो, ही गोष्ट खरीच आहे. हा सुरेश वेगळाच आहे. एकाच व्यक्तिमत्वातील या दोन सुरेशांचे आपसात कसे पटते, हे मलाही कळत नाही. हा धुंद प्रेमकविता करणारा आणि ओठांच्या अलगद स्पर्शाने सौंदर्याचे अनुभव टिपत जाणारा आहे. गीतांमध्ये गुंफले जाणारे त्याचे अनुभवही जिव्हारी झोंबणारे आहेत. मध्येच एखादी ओळ तो अशी लिहून जातो की ती ऐकताच काळजात कळ उठते, कवितेतील त्याची शब्दकळाही कोवळी, भावमय, नादमय व गीतमय असते. सामाजिक आशयाच्या कवितेमध्ये हीच शब्दकळा स्फोटक होते. ओठातून आग ओतते व ऐकणाऱ्याला भाजून काढते, तरी तीसुद्धा गीतांचे घरंदाज वळण सोडत नाही. रौद्रतांडवातील गतिमान पदन्याससुद्धा एकाचवेळी भयप्रद आणि आकर्षक वाटावा तसे हे होते. सुरेशच्या एरवीच्या बोलण्यातील भाषा त्याच्या कवितेत येत नाही हे खरोखर किती सुदैव आहे! सुरेशने आपल्या कवितेला, आपल्याच दुसऱ्या रूपापासून वाचवले आहे. तशी लेखनाच्या व वाचनाच्या जगात तिला भीती कुणापासूनच नव्हती. असलीच तर या दुसऱ्या अतिशय गद्य व रासवट वृत्तीच्या सुरेशपासूनच होती. सुदैवाने कवीनेच ही सावधगिरी बाळगली. त्यातूनच त्याच्या कवितेचे शील शुद्ध राहिले.
हा गद्य सुरेशही पुरेसा लोकप्रिय आहे. त्याचे रांगडे अद्वातद्वा बोलणेही पुष्कळांना आवडते. त्या बोलण्याला ते कवितेसारखीच दाद देतात. या दोनही भिन्न क्षेत्रांत त्याला चाहते मिळावेत हे केवढे नवल आहे! गद्य सुरेशची मित्रमंडळी सुरेशच्या काव्यगायनातही रस घेते, पण काव्यसौंदर्याचे आकलन झाल्यामुळे नव्हे. आपल्या मित्रांच्या त्या पैलूला जाणत्यांकडून जो संतुष्ट प्रतिसाद मिळतो, त्याने ते हुरळून जातात. जाणकारांच्या क्षेत्रातील या मान्यतेमुळे मित्राबद्दलचा त्यांचा अभिमान दुणावत जातो. काव्यक्षेत्रातील त्याचे चाहते बाकी त्याच्या गद्य वर्तुळात गुदमरून जातात, बुचकळ्यात पडतात. त्यांचा प्रेमविषय झालेल्या सुरेशच्या या रूपाने ते चक्रावून जातात. याच्यावर प्रेम करणे त्यांना सहजासहजी मानवत नाही. ते त्याला चालवून घेण्याचा, निभावून घेण्याचा प्रयत्न करतात. कवी सुरेशवर भाळून या सुरेशला सहन करणे अशी दुहेरी कसरत त्यांनाही सहन करावी लागते. दुसरा पर्यायच नसतो.
पोटासाठी सुरेशने उद्योग तरी किती करावेत? मास्तरकी करून पाहिली. साप्ताहिके चालवून पाहिली. आकाशवाणीत डोकावून पाहिले. राजकारणातही आपली पत आहे असा ग्रह करून घेतला. पण या भरकटणाऱ्या सुरेशला शेवटी तारले ते त्याच्या कवितेनेच. तिने त्याचा स्वाभिमान टिकवला. आत्मविश्वास वाढवला व त्याच्याबद्दल प्रेमाचे क्षितिज विस्तीर्ण केले. त्यामुळे तो तिला हळुवारपणे जपतो. तिच्याबाबतीत तो हळवा आहे. इतर अहंपीडितांचे व द्वेषवंतांचे वारेही तिच्यापर्यंत येऊ नये याची तो कसोशीने काळजी घेतो. अनुभवाच्या आधाराने शब्द भीत-भीतच अभिव्यक्तीच्या वेशीपर्यंत येतात. याच्या चेहऱ्याकडे बावरून पाहतात. नजरेत पसंतीची चमक दिसली की उत्साहाने ओळीत स्वतःची जागा पटकावतात. आत्मप्रत्ययाने सतेज होऊन कवितेची कमनीयता वाढवतात. सामाजिक आशयांच्या कवितांमध्ये हेच शब्द निखारे बनतात, तर प्रेमकवितांमध्ये लुसलुशीत पालवी बनून लुकलुकतात. सुरेशही असा विवेक काटेकोरपणे सांभाळतो. सामाजिक प्रक्षोभ प्रगट करताना तो ग्रीष्मतपातील सूर्यकिरणांची लेखणी वापरतो, तर भावकवितांमध्ये प्राजक्ताच्या देठाची, त्यानुसार शाई कधी लाव्हारसाची बनते, तर कधी चांदण्यातील अमृतरसाची.
रूक्षता व रम्यता, रांगडेपणा व हळुवारपणा, गद्य व काव्य, शिव्या व ओव्या, शांभवी व सुधा असे दोन्ही प्रकारचे परस्पर भिन्न प्रकृतीचे अनुभव काखोटीला मारून सुरेश भट नावाचा मौला माणूस आपल्या मधुर गीतांचे स्वर आळवीत आपल्याच मस्ती जगतो आहे.
अजून निदान चाळीस वर्षे तरी त्याने असे जगावे, गावे नि आमचे जगणे सुरेल करावे.
--राम शेवाळकर
(साभार: उजेडाची झाडे)