''मागणे''

गृहस्थाश्रमालाच वैरागतो मी
जगावेगळे मागणे मागतो मी

भिती वाटते या जगाची कश्याने?
जिथे झोप घ्यावी,तिथे जागतो मी

कुणाचे कधी फार ऐकून घेतो
कधी वाटले तोफही डागतो मी

मला वेदने का अशी गाठते तू?
तुझा सांग ना काय गे लागतो मी?

कधी सौम्य वागायचो मीहि आता
जशाला तसे तेवढे वागतो मी

हजेरी तुझी मज कधी भावलेली
अता फार ''कैलास'' वैतागतो मी.

-डॉ.कैलास गायकवाड