गझल कशी होते?

गझल कशी होते? या प्रश्नावर एका संकेतस्थळावर थोड्या विनोदी अंगाने लिहिलेला लेख वाचला. त्यामुळे खरोखरच आपणही अशीच गझल करतो/सांगतो/बोलतो काय? ("गझल कहना"- इति श्री. अनंत ढवळे) ते तपासून पहावे असे वाटले. त्यावर एक गंभीर लेख लिहावा असा विचार मनात आला. पण लेख म्हणजे फक्त आपलेच विचार! मी कोण असा लागून गेलो की ज्याने 'मी' गझल कशी लिहितो -ते लिहावे?  त्यावर प्रतिसाद देताना तुम्ही फक्त "माझ्या लेखाबद्दल" बोलाल. ते मला नको आहे. तुमची गझल कशी होते तेही खरेखुरे जाणून घ्यायचे आहे. म्हणून हा लेख लेख न रहाता मुक्त चर्चा व्हावी असे वाटते.(होतकरू गझलकारांनाही याचा फायदा होईल असे वाटते. :))

हा लेख स्वैर आहे. म्हणून शब्दांचा आणि मुद्दयांचा कीस पाडणे या चर्चेत अपेक्षित नाही. ज्या काही चुका आहेत त्या दाखवाव्यात. त्या मला अगोदरच मान्य आहेत आणि त्याबद्दल मी अगोदरच माफी मागतो.

मी कोणी कसलेला कवि नाही- आहे आपला असाच एक हौशी ! त्यामुळे थेट गझलेला हात घालण्याचे धाडस मी  बिन्धास्त करू शकलो. चांगली गझल लिहिणे किती अवघड असते ते अगोदर माहित असते तर मी त्याकडे फिरकलोही नसतो. पण थोडे वेडेवाकुडे लिहितो आहे.

तर- असाच विचार करता करता मनात एक द्विपदी आकार घेते -

तापल्या वाळूत माझी वाफ झाली
पण बरसलो मी तिथेही - हे खरे ना?

हा अमूर्त गझलेतला पहिला शेर! असे का म्हणावेसे वाटते ते काही सांगता येत नाही. ढग, बरसणे इ. कल्पनांवर ढगांना दोष देणारे जुने शेर वाचले आहेत. पण ढगाचीही कांही बाजू असतेच ना? म्हणून हे असे नवे लिहावे वाटले असावे.

या शेराने गझलेची जमीन ठरते. 'गालगागा, गालगागा, गालगागा' हे वृत्त, 'हे खरे ना ?' हा रदीफ, '..ही ' हा काफिया  आणि  'ए' ही दीर्घ अलामत. मी पुन्हा एकदा 'बाराखडी' बघून घेतो. अजून नवा आहे.

शिवाय गझलेचा बाजही (?) ठरतो. इथे हा काहीसा जुना विषय - आठवणी, तक्रारी, दु:ख! मग पटकन  मतला सुचतो-

आपलेही स्वप्न होते - हे खरे ना?
वाटले सारे खरेही - हे खरे ना?

मीटर मधे असला तरी अजून जमीनचे काम बाकी आहे. ते नंतर पाहू म्हणून मी पुढचे शेर लिहू लागतो.कारण कल्पना सुचत असतात. त्या धरून ठेवणे आता महत्वाचे असते.

मी म्हणालो - जायचे आहे जरासे
चालली होतीस तूही - हे खरे ना?

येतो. मग-

कोण रडतो तो रिकाम्या गोलघुमटीं?
दु:ख त्याचे अंतरी आहे खरे ना?

हा माझ्या एका जुन्या कवितेतला मुक्तछंद आता वृत्तबद्ध होतो. अरे वा! बघता बघता चार शेर झाले! मग आणखी एका शेरासाठी विचार करतो. लगेच येत नाहिये ना? मग त्यावरच लिहावे... का लिहिता येत नाही? जाणिवा गोठल्या म्हणून...

लुप्त झाली वाहणारी शब्दधारा
जाणिवांचा बर्फ झाला - हे खरे ना?

 सध्या असूदे! नंतर दुरुस्त करू किंवा बदलू. मग मी म्हणतो, अरे, झालीच की गझल! मग नावानिशी मक्ता लिहू या का? काय बरे?- ही गझल प्रत्येक गोष्टीत न्यून शोधते आहे. म्हणून आपल्या मनावरच लिहावा. माझा मक्ता विसु, विसू असा लिहिता येतो.त्यानुसार -

आंधळ्या तुजला 'विसू'रे मोरपंखीं -
फक्त दिसतो रंग काळा - हे खरे ना?

असे लिहून जातो. आणि गझल संपते. फारतर एक-दीड तास.लिहिण्याला दोन मिनिटे - विचाराला बाकीची. मग मी ती गझल ठेऊन देतो.

मग जसा वेळ मिळेल तसे एकेका शेरावर विचार करतो-

आपलेही
स्वप्न होते आपलेही - हे खरे ना?
वाटले सारे खरेही - हे खरे ना?

आता अलामत, रदीफ ठीक आहे.

तापल्या वाळूत माझी वाफ झाली
पण बरसलो मी तिथेही - हे खरे ना?

हा तर तयारच आहे. आता पुढचा -

मी म्हणालो - जायचे आहे जरासे
चालली होतीस तूही - हे खरे ना?

मी बहाणा केला हे खरे , पण तू तरी कुठे सच्ची होतीस? या अर्थाचा! पण अलामत चुकतेय! मग यात बरेच बदल होतातः

मी म्हणालो - जायचे आहे जरासे
चालली होतीस तूही - हे खरे ना?
फावले होते तुझेही
ठाम ते जाणे तुझेही
शब्द ते फिरले तुझेही
बोलणे फिरले तुझेही
हां...'म्हणालो' ला बोलणे आणि 'जाण्या' ला फिरले आणि अर्थही 'बोलणे फिरवणे'! ठीक आहे.

मी म्हणालो - जायचे आहे जरासे
बोलणे फिरले तुझेही - हे खरे ना?

पुढे-

लुप्त झाली वाहणारी शब्दधारा
जाणिवांचा बर्फ झाला - हे खरे ना?

हे लुप्त, शब्दधारा असले शब्द आल्यावर तो एक बैरागी ;) त्याचे चित्त एकाग्र करून "याचा अर्थ काय?" यावर विचार करताना डोळ्यासमोर येतो.मला समजण्यास अवघड असणारे लिखाण वाचायला आवडते. त्यामुळे स्वाभाविकच माझ्या लिखाणातही सोपेपणा अभावानेच आढळतो. आणि सोपेपणा तर गझलेचे मुख्य वैशिष्ट्य! त्यामुळे सोपी गझल लिहिणे मला भयंकर अवघड वाटते.म्हणून सोपे करावे असा प्रयत्न करतो, 'जाणिवांचा बर्फ झाला' - ही अलामत आणि काफियात बसत नाही. मग इथे दोन्ही ओळी बरोबरच (एकसमयावच्छेदेकरून!) बदलतात-

लुप्त झाली वाहणारी शब्दधारा
आटली ,  वाळली  रक्तधारा (रक्तधारा नको!)
वाळली  आतून वेली स्पंदनांची (स्पंदन? - बघू)

जाणिवांचा बर्फ झाला - हे खरे ना?
जाणिवा गोटून जाती
जाणिवा थिजल्याच देही (रक्तधारेसाठी)
चांदणे,चांदवा (नको)
.....सुकली फुलेही ('वेलीला' बरं वाटतय)
बेगडी खोटी/ झाली/ फसवी/ उसनी/ नुसती फुले ही

वाळली आतून वेली स्पंदनांची
बेगडी आता फुलेही - हे खरे ना?
हा एक नवाच शेर तयार होतो.मधेच वेलीऐवजी वेणी वापरावा असाही विचार येतो. पण त्याला मी बाजूला ढकलतो.

कोण रडतो तो रिकाम्या गोलघुमटीं?
दु:ख त्याचे अंतरी आहे खरे ना?

कोण म्हणजे मीच! सानी मिसरा अलामत आणि काफिया! त्यावर बराचवेळ विचार करतो.
रुदाली - मोले घातले रडाया - खरे दु:ख वगैरे! गोलघुमटामुळे शेर लांब जातोय माझ्यापासून!
मग त्याचा 'माझ्याप्रमाणे' होतो. पण माझे दु:ख तर आहेच खरे! मग त्या शेराला मी तिच्यावर उलटवतो.
ती हसत आहे असे केले तर? मग इथे मीही हसू लागतो.

का हसावी ती अशी माझ्याप्रमाणे?
दु:ख नाही कोणतेही - हे खरे ना?

'तुम इतना जो मुस्कुरा रहे हो..' आठवते. भटसाहेबांचाही 'माझ्याप्रमाणे' असलेला शेर आहे असे अंधुक आठवते. तो शोधण्याचा प्रयत्न करतो. पण काही केल्या आठवत नाही. तो शेर थेट असाच नाही ना? - एक शंका!

मग मक्त्याकडे येतो- हा 'विसू' फारच ओढून ताणून बसवलाय. हाकलून देऊ.
आंधळ्या नशिबात माझ्या - मोरपंखीं
व्यर्थ डोळे शोधणेही - हे  खरे ना?

रंग तर लांबच, पिसाचा डोळा शोधणेही व्यर्थ आहे! हे ठीक.

***
अशा रितीने एक नवी गझल जन्म घेते-

स्वप्न होते आपलेही - हे खरे ना?
वाटले सारे खरेही - हे खरे ना?

तापल्या वाळूत माझी वाफ झाली
पण बरसलो मी तिथेही - हे खरे ना?

मी म्हणालो - जायचे आहे जरासे
बोलणे फिरले तुझेही - हे खरे ना?

वाळली आतून वेली स्पंदनांची
बेगडी आता फुलेही - हे खरे ना?

का हसावी ती अशी माझ्याप्रमाणे?
दु:ख नाही कोणतेही - हे खरे ना?

आंधळ्या नशिबात माझ्या - मोरपंखीं
व्यर्थ डोळे शोधणेही - हे  खरे ना?

----------------------------

हे सारे व्हायला मात्र खूपच वेळ लागतो. अनेक दिवस जातात. तरीही उत्तम म्हणण्यासारखी गझल होत नाही.
मग डोळ्यासमोर येतो तो भटसाहेबांच्या गझलांचा उत्तुंग पर्वत! बाप रे! काय ती प्रतिभा, काय तो शब्दांचा वापर... आणि प्रत्येक गझल मनाला भिडणारी - पण सोपी, सरळ, सुट्सुटीत.
असे वाटते की मराठी काव्याचे शिखर म्हणजे भटांची गझल! त्याच्या पायथ्याला जरी पोचता आले तरी खूप झाले.
________________

माझ्यावर फारसा खूष न झालेला मी पुन्हा नवी गझल शोधू लागतो.

गझलचर्चा: 

प्रतिसाद

तुम्ही गझल कशी लिहिता ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे...
कृपया मान्यवरांनी आपली मते द्यावीत ही आग्रहाची , नम्र विनंती!

मला वाटते ज्यावेळी एखादा अनुभव व्यक्तीकरणासाथी तयार होतो , तेंव्हा तो आपले रूप सुनिश्चित करून कागदावर उतरतो .तेंव्हा गझल असो की मुक्त शैलीतील कविता , ती  अशी ठरवुन येत नाही.निदान मझ्या बरोबर तरी असेच होतो .शिवाय एकदा अनुभवाने गझलेच्या शेराचे रूओ धारण केले , की माझ्यासाठी त्यात पुन्हा काही बदल करण्यासाठी वाव राहत नाही.याच कारणामुळे , मी अनेकदा ह्रस्व -दीर्घाच्या सवलती घेत जातो.आमचे अनेक अति उत्साही मात्रापटू मित्र या वर आक्शेप घेत असतात , पण आपल्या जाणिवेशी ,कुणी तरी मात्रा मोजेल म्हणुन इमान न राखणे योग्य वाटत नाही.
गझलेत अनेक वर्षे घालविल्यानंतर , तंत्रावर बर्र्यापैकी हुकुमत मिळ्वुन सरावने गझला लिहिणारे बहुतेक कवी सध्या लोकप्रिय आहेत . पण या प्रकार लिहून काही महत्वाचे लिखाण होईल असे वाट्त नाही  !
 

एखादी गझल सुचायला लागल्यावर अनेक कल्पना मनात येतात. ह्या सर्व कल्पना त्या गझलेच्या जमिनीत नांदवता येतीलच असे नसते. सरावाने गझल लिहितान रदीफ, काफिया आणी वृत्ताचे भान नक्कीच राहाते. पण अशावेळी त्या गझलेत नांदू न शकणार्‍या कल्पना दुसर्‍या एखाद्या गझलेसाठी खाद्य पुरवितात,असा माझा अनुभव आहे.

तापल्या वाळूत माझी वाफ झाली
पण बरसलो मी तिथेही - हे खरे ना?

ही ओळ एकदा दाखल झाल्यावर मग विचार केला असता इथे रदीफ ´हे खरे ना´ आणि यमके ´तिथेही´, ´असेही´, ´घरेही´, 'कुठेही' अशी येतील. जमीन हातात आली की कल्पनाही जमिनीची शिस्त पाळत येतात,असे वाटते.