एकदा तरी

मायबोलीवर डॉ. कैलास ह्यांनी दिलेल्या मिसर्‍यावर लिहीलेली ही तरही गझल

लढेन षड्रिपुंसवे किमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

पहाड, जंगले, नद्या उदास सर्व भासती
वळून पाहशील का निदान एकदा तरी?

ढगांवरी जळून चंद्र, वायुला विचारतो
'मिळेल का मला तुझे विमान एकदा तरी?'

मदार केवढी तुझी उधार जिंदगी वरी
बघून यायचेस पण दुकान एकदा तरी

कळेच ना कशामुळे क्षणात बिनसते तुझे
करेन मी जगा तुझे निदान एकदा तरी

नकोस तू ! मला तुझा पुरेल फक्त भास ही
शमेल मृगजळामुळे तहान.... एकदा तरी

करायचाय एकदा असह्य छळ तुझा मना
बनेल काय देह अंदमान एकदा तरी?

प्रतिसाद

मतला घसघशीत.
गझल आवडली.

कळेच ना कशामुळे क्षणात बिनसते तुझे
करेन मी जगा तुझे निदान एकदा तरी

बहोत खुब मिल्या....

मस्त गझल.
'निदान' आणि शेवटचे दोन शेर आवडले !

आवडली गझल!

गझल छान आहे. पण खालील सुट्या ओळी तर फारच छान आहेत.
'मिळेल का मला तुझे विमान एकदा तरी?'
करेन मी जगा तुझे निदान एकदा तरी
शमेल मृगजळामुळे तहान.... एकदा तरी

पुर्ण गझल आवडेश.

अनेक धन्यवाद...

चित्त : तुम्ही फक्त काही ओळी उधृत केल्यात म्हणजे कुठलाही शेर पूर्ण आवडला नाही असे वाटते... :( तुम्हाला वेळ झाल्यास सविस्तर विवेचन कराल का? शिकायला मदतच होईल...

प्रिय मिल्या,

वरच्या ओळी अधिक न्याय करणाऱ्या हव्या होत्या असे वाटून गेले. उदा. विमान एकदा तरी ही ओळ फारच मस्त आहे. पण त्यामानाने वरची ओळ फारच साधी, सरळ आहे असे वाटले. आणि विमान म्हटल्यावर मला तुकारामच आठवला. शमेल मृगजळामुळे तहान एकदा तरी ह्या ओळी आधीच्या ओळीतही भास पुरेल असे आले आहे. त्यामुळे खालच्या ओळीचा प्रभावीपणा कमी झाला आहे.

चित्त समजले... तुम्हाला काय म्हणायचेय ते... बघू सुधारणा जमतात का काही