धुमसतो अद्याप माझ्या आत कोणी

टाळलेला आजही निष्णात कोणी
धुमसतो अद्याप माझ्या आत कोणी

माहिती होती जगाला गोष्ट सारी
बोलले नाही तरी जोरात कोणी

केवढा आहे महत्वाचा पहा मी..
सांडलेले रक्तही भरतात कोणी

का मला टाळून गेली ती दुकाने ?
[ वेदना भरतात का.. गल्ल्यात कोणी? ]

आपली ओळख असावी फार मोठी
एवढ्यानेही कवी होतात कोणी

मद्यपींना एक माझे सांगणे की,
भाकरी मिळण्यासही फिरतात कोणी

दैव होते चांगले की जन्मलो मी
अन्यथा मरते कधी गर्भात कोणी

- अजय अनंत जोशी
पुणे

गझल: 

प्रतिसाद

दैव होते चांगले की जन्मलो मी
अन्यथा मरते कधी गर्भात कोणी

व्वा.... उत्तम आशय असलेला शेर.

डॉ.कैलास

खरच बेस्त आहे.

माहिती होती जगाला गोष्ट सारी
बोलले नाही तरी जोरात कोणी
........................................स्वतः फसल्यावर असीच प्रतिक्रिया होनार ...........!!!!!!!
...........................................आपला अह जाग्रुत झाल्यावर कुनाचे काय चालते............??

माफ करा पन दुसरा मिसरा कन्सात का बरे ताकला?????/

जोरा चा शेर व शेवटचा शेर खूप दमदार झाले आहेत.
छान.

मतला,मक्ता आणि जोरात खुप आवडले.

धन्यवाद सर्वांना...!

सर्वच शेर आवडले...

धुमसतो मिसरा तर फार आवडला

अविनाश,
प्रश्नोत्तरी असल्याने उत्तर कंसात टाकले आहे.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
मिल्या,
रविवारच्या कार्यक्रमात तुमची उपस्थिती आनंद देऊन गेली.

माहिती होती जगाला गोष्ट सारी
बोलले नाही तरी जोरात कोणी
छान.

धन्यवाद चित्तरंजन.
हा शेर बर्‍याच जणांना आवडला.

मद्यपींना एक माझे सांगणे की,
भाकरी मिळण्यासही फिरतात कोणी

अजयजी मद्यपींना खरेच तुमचे सांगणे पटो.नाहीतर त्यांचा शेवट नेहमी असाच व्हायचा.......

तो नशेतच असा संपला
ग्लास अन बाटली राहिली

एकूण गझल आवडली.

धन्यवाद निलेश!
तुमची द्विपदीही छान.