समर्थ

संहिता जुनी नवीन अर्थ मागते
अन्यथा विसर्जनास गर्त मागते

आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)

कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी,
ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते

तोच घेउनी फिरे रिता कमंडलू,
काय त्या दयाघनास व्यर्थ मागते?

स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो,
भूमि ही असा नवा समर्थ मागते

प्रतिसाद

आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)
मस्त शेर.

अजय यांच्याशी सहमत! तोच शेर आवडला. मला हा अकारान्त स्वरकाफिया वाटतो. कृपया विश्वस्तांचे मत समजावे.

स्वत्व जागवील, राष्ट्र उद्धरील जो,
भूमि ही असा नवा समर्थ मागते

क्या बात है. शेर मस्त. "मागणे" जबरदस्त..!!

आज कोणत्या अटीत गुंतणार मी?
(भेट नेहमीच ती सशर्त मागते!)
वा! फारच छान!

बहुधा सशर्त, अर्थ, गर्त अशी यमके चालणार नाहीत.

खुप छान. समर्थ आवडले.

अकारान्त स्वरयमके चालत नाहीत.

कल्पनेस तेज, ओज, चेतना हवी,
ले़खणी सशक्त शब्द, अर्थ मागते

अप्रतिम! सुंदर!
कमी शब्द वापरूनही फार छान आशय मांडलाय!
मला आवडली गझल!
--------------------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

>>> अकारान्त स्वरयमके चालत नाहीत.
कृपया हे अधिक समजवाल का?

'अ'कारान्त स्वरयमके:

बघा:

ज्याचा 'अन्त' 'अ' असा आहे:

आनंदयात्री या नावातील 'आनंद' हा शब्द घेऊयात.

आनंद - 'द' अकारान्त

हिशोब - 'ब' अकारान्त

विचित्र - 'त्र' अकारान्त

प्रश्न - 'श्न' अकारान्त

तृप्त - 'प्त' अकारान्त

झिंग - 'ग' अकारान्त

दोर - 'र' अकारान्त

टिंब - 'ब' अकारान्त

नुसतीच 'अ'कारान्त अक्षरे घ्यायची असली तर कोणताही शब्द घेता येइल. मग 'उच्चारातील' साधर्म्य जाईल. जसे: वार, मार, पार, धार किंवा पण, आपण, सत्यनारायण, रण वगैरे!

आता: 'अ' सोडून इतरच 'कारान्त' यमके का चालतात तरः

सुरू, बघू, टिकू - यात 'ऊ' कॉमन

इती, अशी, वरी - यात 'ई' कॉमन

विखुरला, पुरला, उरला - यात 'उ' कॉमन

वगैरे वगैरे!

बाकी: आपला एक मिसरा मला अजूनही आठवतो अन डोक्याला त्रास देतो.

'कोण आठवले तुला इतके मला विसरायला'

व्वा!