कधी कधी

माझिया सवेच मी बोलते कधी कधी
बोलण्यातही तुला ऐकते कधी कधी

आरश्यात शोधते मी तुझाच चेहरा
हासते कधी कधी लाजते कधी कधी

टाळुनी तुला जरी दूर दूर चालले
सावली तुझी मला भेटते कधी कधी

मागते न मी तुला तारका नभातल्या
आपुलेच श्वास मी मागते कधी कधी

कोणत्याच अंगणी मी न वेचली फुले
अंतरात मी तुला वेचते कधी कधी

एकटेपणातही स्पर्श जाणवे तुझा
आसपास मी तुला पाहते कधी कधी

जागते अजूनही  चांदणे मिठीतले
रात्र आपुली अशी रंगते कधी कधी

 

प्रतिसाद

अतिशय सुंदर गझल. मतल्यापासून मक्त्यापर्यंत सगळेच शेर सुंदर. 
एकटेपणातही स्पर्श जाणवे तुझा
आसपास मी तुला पाहते कधी कधी
हा तर फारच आवडला. पुढच्या गझलेची वाट बघतो आहे. धन्यवाद.


दुसरा शब्द्च नाही. भन्नाट गझल आहे.

अहो ज्योतीताई, किती छान लिहिता तुम्ही. अशी गझल आमच्यासारख्या नव्या गझलकाराना आदर्श आहे.

गझल आवडली. प्रत्येक शेर सुंदर. सुरेश भटांच्या 'मी एकटीच' ह्या पद्मजा फेणाणी ह्यांनी गायलेल्या गीताची आठवण झाली

मस्तच उतरलिये हि गजल !
आपुलेच श्वास... अप्रतिम !

एकटेपणातही स्पर्श जाणवे तुझा
आसपास मी तुला पाहते कधी कधी
विशेष आवडला

कधी कधी नव्हे नेहमीच होते असे
खोल खोल प्रेमात जाल बुड्त जाल जसे

अतिसुन्दर

सुनील

छान गझल....मेनकामधील गझलीस्तानची आठवण आली...!
(बहुतेक) त्याच सदरात ही गझल फार पूर्वी वाचली होती...
आरशात शोधते मी तुझाच चेहरा
हासते कधी कधी लाजते कधी कधी

एकटेपणातही स्पर्श जाणवे तुझा
आसपास मी तुला पाहते कधी कधी
एकदम मस्त...
पुढच्या गझलीची वाट पाहत आहे....!

वा! खूप आवडली गझल. सावली, श्वास, स्पर्ष, रात्र - एकाहून एक सरस शेर!!
-- पुलस्ति.

वा..!! फारच सुंदर गझल...

टाळुनी तुला जरी दूर दूर चालले
सावली तुझी मला भेटते कधी कधी (वा...छान..)

मागते न मी तुला तारका नभातल्या
आपुलेच श्वास मी मागते कधी कधी  (सहज, सुंदर शेर..)

एकटेपणातही स्पर्श जाणवे तुझा
आसपास मी तुला पाहते कधी कधी (सहिच..खास शेर...)

जागते अजूनही  चांदणे मिठीतले
रात्र आपुली अशी रंगते कधी कधी (वा वा..क्या बात है..!!)

भन्नाट...
टाळुनी तुला जरी दूर दूर चालले
सावली तुझी मला भेटते कधी कधी ..वा..
मागते न मी तुला तारका नभातल्या
आपुलेच श्वास मी मागते कधी कधी  ...छानच..
एकटेपणातही स्पर्श जाणवे तुझा
आसपास मी तुला पाहते कधी कधी         क्या बात हे..
जागते अजूनही  चांदणे मिठीतले
रात्र आपुली अशी रंगते कधी कधी   सुन्दर

खास! अप्रतिम! सगळेच शेर मनात उतरले, काय काय उधृत करावं? बेमिसाल!
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}