भेटलेली माणसे घनदाट होती !
थेट पोचायास कोठे वाट होती ?
शेवटी महत्वाचे
महत्वाचे-
१. गझल लिहिण्यासाठी निर्दोष वृत्तात लिहिता येणे आवश्यक आहे. शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा.
२. प्रत्येक शेर म्हणजे एक संपूर्ण कविताच असते. गझल उलगडत नसते. कोणताही शेर सुटा वाचला तरी तो संपूर्ण अभिव्यक्ती असलेली कविता वाटणे, हे गझलेचे गमक आहे. नुसत्या आकृतिबंधाने गझल ठरत नसते.
३. बदलत्या काळाच्या संदर्भानुसार गझलेमधील शेरांचे संदर्भ बदलू शकतात. पण गझल म्हणजे काय हे कवीच्या सोयीनुसार ठरत नसते- आणि ते समीक्षकांच्या सोयीनुसार नव्हेच नव्हे!
४. मराठी गझलेसाठी आवश्यक असलेली प्रतिमा, रूपके आणि संकेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणात भरपूर आहेत. मराठी गझलेला मराठी मातीचाच सुगंध आला पाहिजे.
५. यमक, अन्त्ययमक आणि वृत्तांचे बंधन पाळूनसुद्धा शेर अगदी सहज व सोपा पण तितकाच गोटीबंद असावा. फालतू शब्दांना जागा नसावी. अनावश्यक शब्दांनी वृत्ताची मात्रापूर्ती करू नये.
६. शेर सहज कळावा आणि ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या थेट हृदयात शिरावा, अशी शब्दाची मांडणी असावी. जणू आपण बोलत आहोत, असा शेर असावा. सोपेपणा हे यशस्वी शेराचे रहस्य होय.
७. शेरातील दोन्ही ओळींचा परस्परांशी संबंध असलाच पाहिजे. शेर म्हणून परस्परांशी संबंध नसलेल्या दोन सुंदर ओळी एकत्र लिहिल्या म्हणजे शेर होत नाही. शेरात जे सांगायचे आहे, त्याची प्रस्तावना पहिल्या ओळीत असते, तर दुसरी ओळ म्हणजे पहिल्या ओळीतील प्रस्तावनेचा प्रभावी समारोप असतो.
८. गझलेमधील शेर विरोधाभासावरच (PARADOX) आधारित असतात, ही समजूत पार चुकीची आहे. स्थलाभावी नमुन्यादाखल माझा एकच शेर येथे उद्धृत करतो-
उरली विरंगुळ्याला ही सांजवेळ माझी
उरल्या तुझ्या जराश्या प्राणात हालचाली
९. शेर लिहितांना शेवटच्या शब्दातील शेवटचे अक्षर लघू असल्यास ते कधीही गुरू करू नये.
शेराच्या ओळीतील शेवटी असलेले लघू अक्षर गुरू करण्याची एक अत्यंत वाईट सवय खोड मराठीतील बऱ्याच कवींना फार वर्षांपासून लागलेली आहे. उदाहरणार्थ-
ही वाट हुंदक्याची थकली अता रडून s s s
रहदारि गच्च आहे देवा तुझ्यापुढून s s s
एकवार 'रहदारि' मधील ऱ्हस्व "रि" समजून घेता येईल. पण ओळ संपतांना हा 'न s s s s s' कशासाठी?
म्हणून निदान तरूण पिढीने तरी ही चूक करू नये. व्याकरणाची बाब बाजूला ठेवली तर शेवटच्या लघू अक्षराला ओढूनताणून गुरू केल्यावर ओळीतील प्रसाद व माधुर्य कमी होते, हाही मुद्दा लक्षात घ्यावा.
१०. गझलेची भाषा तिच्या पिंडाला मानवणारी असावी. ज्याचा आपल्या मातृभाषेवर संपूर्ण ताबा आहे. त्याला कोणताही विषय किंवा कोणतीही भावना शिवीगाळ न करता तेवढ्याच प्रभावीपणे शेरातून व्यक्त करता येते. क्वचित प्रसंगी अगदी अपरिहार्य झाल्यास एखादा असा शब्द त्या शेराच्या अभिव्यक्तीत चपखलपणे बसत असल्यास उपयोगात आणायला हरकत नाही. पण तसा शब्द अपरिहार्य असावा.
महाराष्ट्रातील तरुण पिढी ह्या माहितीचे सार्थक करील आणि महाराष्ट्रात यापुढे अधिकाधिक उत्कृष्ट व निर्दोष मराठी गझला लिहिल्या जातील, अशी मी आशा बाळगतो
जरी ह्या वर्तमानाला, कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या, पिढ्यांशी बोलतो आम्ही
-सुरेश भट
प्रतिसाद
श्री प्रसाद लिमये,
माझी मते खालीलप्रमाणे:
१. रदीफ नसलेल्या भरपूर गझला रचल्या गेल्या आहेत. उर्दू, मराठी व मी असे ऐकले आहे की गुजराथी व बंगालीमध्येही! पण आपण जो प्रश्न विचारला आहेत त्याचे उत्तर हे व्यक्तीसापेक्ष आहे. प्रत्येकाचे मत स्वतंत्र असू शकते. माझ्या मते, होय, रदीफ असलेल्या गझला जास्त परिणामकारक असतात, वाटतात. पुढे जाऊन मी असे म्हणीन की जो रसिक गझलेच्या तंत्राबाबतीत थोडा कच्चा वा नवीन आहे त्याला गैरमुरद्दफ गझलांमधे समेवर आल्याची जी जाणीव होईल त्यापेक्षा रदीफ असलेल्या गझलांमधे ती जास्त होईल.
२. मी आपल्याला नवीन वगैरे समजत नाही. पण नवोदीतांना काय किंवा मुरलेल्यांना काय, रदीफ घ्यावी की घेऊ नये हा प्रश्न पडणेच मुळात चुकीचे आहे. विचार सुचताना तो गझलेच्या एखाद्या वृत्तात सुचतो. समजा मला असा विचार सुचला...
'सतत कसली ना कसली आशा बाळगून शेवटी मी हा देह जिवंत ठेवत आहे, आशाच संपल्या तर मी मरुनच जाईन.'
वेचा नवीन आशा ....माझ्या नसानसांनो
बदल्यात व्हा प्रवाही...रक्तातल्या रसांनो
याच्यात रदीफ घ्यावी की घेऊ नये हा प्रश्न पडलाच नाही.
पण मला जर असा विचार सुचला की शेवटी काहीही झाले तरी आपल्या नशीबात असा दिवस काही येणार नाही की त्यादिवशी एकही किंवा कशाचीही काळजी म्हणुन वाटली नाही...
तुझे चालेल आरामात भूषण सोड चिंता तू
न चिंतांची तुला काहीच चणचण सोड चिंता तू
यात मी कधीच ठरवले नाही की रदीफ घ्यावी अथवा घेऊ नये. हा विचारच असा सुचला.
तेव्हा गझलेच्या तंत्रांचे अवडबर न माजवता उत्स्फुर्तपणे आधी काय अन कसे सुचते ते पहावे, ते एखाद्या वृत्तात सुचलेले असले पाहिजे, त्याच्या अनुषंगाने पुढे सुचू शकते. हे सर्व सांगताना मी एखाद्या धिकारी व्यक्तीच्या थाटात सांगत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की मी इथे एक लिंबूटिंबू गझलकार समजला जातो. असो.
३. काफिया लिहून ठेवणे - हे मला व्यक्तिशः अजिबात पटत नाही. समजा तुम्हाला 'नजर' या काफियावरून एक उत्तम शेर सुचला तर तुम्ही अधर, पदर, कहर, बहर वगैरे काफिये लिहून ठेवणार. मग त्यावरून बाकी सगळे रचणार. ही कृत्रिमता आहे. खरे तर हा आरोप माझ्यावरच सर्वात जास्त झालेला आहे. पण माझ्या कुठल्याही गझलेतील कुठल्याही शेराचे प्रयोजन मी सिद्ध करू शकतो, वाद घालणे मला भीतीदायक वाटते म्हणुन त्यात पडत नाही.
माझ्या ळ ची जुळवाजुळव या गझलेवर असेच प्रतिसाद आले होते.
मते एकाच गोष्टीवर तिची जुळतात माझ्याशी
मला माझा, तिलाही नेमका माझाच कंटाळा
हा एकच शेर असा समजला गेला की तो रचण्यासाठी संपूर्ण गझल रचली गेली आहे असे म्हंटले गेले.
त्यातील इतर एक दोन शेर असे होते.
तिचा स्वप्नात येण्याचा भरवसा फारसा नाही
इथे सत्यात अपमानीत व्हा, पुरते वचन पाळा
ती तर साधी स्वप्नात सुद्धा येत नाही. ती स्वप्नात येईल या आशेने मी रात्रभर झोपायचा प्रयत्न करून बघतो. ती काही येत नाही. अन मग निराशेने दिवसा परत मी तिला माझ्याकडे आकर्षित करुन घेण्याचे प्रयत्न सुरू करतो. मग ती माझा सगळ्यांसमोर पाणउतारा करते. प्रेमात मी तेही सहन करतो. ते सहन करून मी माझे वचन पाळतो.
आता हा काही फार महान अर्थ आहे असे माझे म्हणणे नाही. पण हा शेर रचताना माझ्या मनात फक्त एक भावना होती की एखाद्या प्रियकराची जास्तीत जास्त वाईट मनस्थिती काय होऊ शकेल? अन ती मला जशी कल्पिता आली तशी मी सदर वजनात गुंफली. ती फालतू ठरेल किंवा नाही याचा विचार केला नाही. फक्त प्रामाणिक राहिलो. म्हणजेच मी कल्पनेमधे आधी काय सांगायचे हा विचार ठरवला अन मग ते वजन वापरून तो विचार मांडला. मी आधी 'पाळा' हा एक काफिया आहे असे ठरवून काही रचले नाही. पण ५ पैकी ४ शेर भरतीचे ठरवले गेले, हे माझ्या खुज्या प्रतिभेचे निदर्शक आहे, रसिकांचा काहीच दोष नाही.
असेही एरवी वागा जणू कोणीच नाही ती
नि वर झालीच जर नजरानजर तर धाडकन भाळा
तिच्या सतत निर्दयपणे माझ्याकडे दुर्लक्ष करण्यामुळे मलाच आता सवय लागली आहे की ती आपली कोणीच नाही असे तिच्यासमोर वागायचे. म्हणजे तिनेच तशी सवय लावली आहे. पण त्यातही कधी चुकून तिने माझ्याकडे अन मी तिच्याकडे पाहिलेच तर त्या एका निमिषार्धात सगळा धीर, सगळा संयम जातो अन परत मी तिच्यावर भाळतो. परत तिला माझी किंमत कळते किंवा 'टेकन फॉर ग्रँटेड' सारखी माझी परिस्थिती होते.
हा एक अनुभव आहे. 'भाळा' या शब्दासाठी हा शेर निदान मी तरी प्रामाणिकपणे रचला नव्हता. पण तो तसा समजला गेला. मी हे व्यासपीठ माझ्या मुद्यांच्या पुष्ट्यर्थ वापरायच्या मोहात नसून आपण उपस्थित केलेल्या मुद्यांच्याबाबतीत वापरत आहे.
विचार सुचल्यानंतर शब्दरचना सुचणे ही गोष्ट नैसर्गीकरीत्या होणे हे सामान्याचा कवी होण्याची प्रक्रिया आहे असे माझे स्पष्ट मत आहे. कवाफी किंवा रदीफ लिहून ठेवून जपून ठेवणे अन मग निवांत रवंथ करत एक एक शेर रचत बसणे हे कृत्रिम आहे. ते 'कवीलाईक' नाही. उत्स्फुर्त जे सुचते ते टुकार असले तरी खरे असते अन त्या खरेपणाचा वास यावा असे माझे मत आहे.
काफिया नुसता सुचत नाही हा आपला मुद्दा - मुळात काहीतरी सुचावे असे वाटणेच पूर्णपणे चुकीचे आहे असे माझे मत आहे. काहीतरी सुचणे हे नैसर्गीक आहे, सुचावे असे वाटणे अनैसर्गीक आहे.
'होते', 'आहे' अशा रदीफा सुचणे हा आपला मुद्दा - आपल्याला जो विचार मांडायचा आहे तो काय आहे त्यावर रदीफ काय असावी हे ठरणार. मला हेच समजत नाही की केवळ नावीन्यासाठी काहीतरी ओढुनताणुन आणलेली रदीफ वापरायची इच्छाच कवीला का व्हावी? आपण काहीतरी वेगळे वृत्त वापरले, काहीतरी वेगळी रदीफ घेतली वगैरे आकर्षणे कवीपणाची निदर्शक आहेत असे मला मुळीच वाटत नाही.
ज्ञानेशच्या काही गझलांची खालील उदाहरणे पहा:
१. कधी हसवून गेलेले कधी रडवून गेलेले
पुन्हा का आठवावे ते जुने विसरून गेलेले ( अनुभव अन प्रश्न पडणे )
२. भेट चोरटी जरा जहाल होत जाऊदे ( तमन्ना )
३. जाहला बराच वेळ हात आपले अता सुटायला हवे
थांबले असेल दु:ख एकटे घरी मला निघायला हवे ( उपरती किंवा विवेक किंवा व्यथा )
आता जी भावना मांडायची आहे ती मांडताना 'गेलेले' म्हणावे, की 'हवे' म्हणावे, की 'होत जाऊदे' म्हणावे हे कवीला मुलातच सुचते. आपण 'होत जाऊदे' अशी रदीफ घेऊन एक प्रणयावरची गझल करू असे ठरवले आहे असे वाटते का वरील उदाहरणांवरून? अजिबात नाही. हा नैसर्गीकपना यायला पाहिजे असे माझे मत आहे.
सगळे म्हणतात तसे सारे काही म्हणुन झाल्यावर मीही साळसूदपणे म्हणतो...की..या साईटवर अनेक तज्ञ आहेत, त्यांनी काय ते सांगावे.
( परंतू मी ठामपणे माझ्या वरील मतांशी प्रामाणिक आहे ).
धन्यवाद!
कटककर व लिमये यांना,
सप्रेम नमस्कार.
दादांच्या सांगण्याबाबत थोडेसे स्पष्टीकरण करतो.
आमच्या भेटीत ते म्हणाले होते " कविता स्फुरते वगैरे खोटे आहे. काफिये सुचले की लिहून ठेवत जा."
त्यांच्या म्हणण्याचा अन्वयार्थ असा -
आपण सगळे गझला करतो. मी केल्या. तुम्ही करत आहात. गझलेत रदीफ काफियाचे तंत्र असते. मतला झाला, एखादा शेर झाला की कधी कधी पुढची गझल काफियावाचून अडते. काही सुचत नाही. त्यावेळी थोडं थांबावं. नंतर केव्हातरी सुचला की लक्षात ठेवावा. लक्षात ठेवणे जमत नसेल तर लिहून ठेवावा. नंतर त्याचा उपयोग होऊ शकतो.
त्यांना असे बिल्कुल म्हणायचे नव्हते, नसणार-
मतलाही झालेला नसताना दिवसाच्या चोवीस तासांपैकी प्रत्येक तास कोणत्यातरी काल्पनिक काफियाचा विचार करावा आणि सुचला की लिहावा. डेटाबेस बनवावा.
मतल्याची पार्श्वभूमी असली तरच काफिये लिहून ठेवण्याला अर्थ आहे.
लोभ आहेच.
कायम ठेवावा.
प्रिय केदार,
धन्यवाद! मला आपले विचार व आपल्या भेटीत भटसाहेबांनी जे सांगीतले होते ते समजले ही व ते तसे असेल तर मान्यही आहे अन मलाही तेच म्हणायचे आहे हे मी वर स्पष्ट केले आहे.
मात्र एक मुद्दा पटला नाही. आपण लिहीले आहे:
दादांच्या सांगण्याबाबत थोडेसे स्पष्टीकरण करतो.
आमच्या भेटीत ते म्हणाले होते " कविता स्फुरते वगैरे खोटे आहे. काफिये सुचले की लिहून ठेवत जा."
यातील 'कविता स्फुरते वगैरे खोटे आहे' हे मला पटले नाही. मग काय होते? कविता करायची आहे असे ठरवून जर एखादा माणूस बसला तर 'कविता स्फुरते हे खोटे आहे' असे म्हणता येईल. पण समीरची ही ओळ पहा:
व्यर्थ बडबडतो अताशा व्यर्थ लिहितो
ही ओळ ठरवून केल्यासारखी आहे काय? यात 'कविता' करायचीच आहे असा कुठे आग्रह दिसत आहे काय? किंवा या ओळीतील भावना अनैसगीक वाटत आहे काय? समीरला अनेक दिवस 'काव्यातून' घेतलेल्या रजेमुळे कदाचित ती भावना भिडली असेल. ती फक्त वृत्तात मांडली गेली.
आपली ही ओळ!
'कसे कळावे तुला कसे काळजात होते'
यात कृत्रिमता आहे काय? माझ्यामते नाही. या वयातील तरुणाला आवडत्या स्त्री बाबत असे वाटणे व ते गझलेत मांडले जाणे हे अगदीच नैसर्गीक आहे.
आपल्यासाठी कृत्रिम ओळींची उदाहरणे देतो. ( अर्थातच माझ्या ओळींची )
'गझलवन निर्बीडसे हे तिलकधारी गप्प हो' ( तिलकधारी गप्प हो )
'अशी वागशी बावळी तू गडे का...भजी पाहिजे हे बटाटेवडे का?'
'महिला मंडळ घुसले आहे खोचुन पदराला येथे' ( हझल वाचा, हझल )
'चेहरे झाकून खोटे नाव घेती' ( मराठी साहित्य क्षेत्र? )
या सर्व ओळी कृत्रीम आहेत. त्यात काव्यमूल्य काहीही नाही. एखाद्या विशिष्ट क्षणी आलेल्या भावनांचे ते सादरीकरण आहे. त्याला जास्त आयुष्यकाळ लाभू शकत नाही.
पण खालील ओळी या माझ्यामते स्फुरलेल्या ओळी वाटायला हरकत नसावी.
'जगाला नोकरी माझ्या चुकांची नोंद घेण्याची' ( लाघवीशी वाटते आहे )
'कोणीच जन्म घेण्या केला न अर्ज येथे' ( रक्तातल्या रसांनो )
'वागणे वेड्यापरी ना रम्य वाटे..पाहिजे होते कुणी रागावणारे' ( आगी लावणारे )
त्यामुळे 'कविता स्फुरते हे खोटे आहे' हे विधान मला पटत नाही.
आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.
धन्यवाद!
भूषण,
दादांच्या विधानाचा अर्थ मर्यादेतच घ्यावा.
एखाद्या गाफील क्षणी काहीतरी मनात काव्यमय येते. या अर्थी कविता स्फुरते, हे निश्चित. दादाच काय पण महाराष्ट्रातील इतर प्रसिध्द कवींनाही हे मान्य व्हावे, मान्य होते, मान्य होईल.
दादांच्या म्हणण्याचा अर्थ इतकाचः
ज्या स्वरुपात कविता दिसते, त्या स्वरुपात ती सुचत नाही. काहीतरी ढोबळ दिसते व नंतर वृत्त, शब्द यांच्या कारागिरीमुळे ते ओळ स्वरुपात उतरवले जाते.
म्हणून सुचलेले काफिया लिहून ठेवावेत. ढोबळाला काफियाच्या मदतीने रेखीव रुप देता य़ेईल.
काही प्रतिभावंतांना ओळ कागदावर जशी दिसते तशीच सुचत असेल तर मला कल्पना नाही.
धन्यवाद.
बाप रे, माझ्या साध्याशा प्रश्नांमधे ( रदीफ असेल तर गझल जास्त उठावदार होते का ? व नवीन लोकांनी रदीफ वापरून गझल केल्या तर जास्त सहज पडते का ? ) येव्हढा गहन अर्थ दडलेला असेल असे वाटले नव्हते.
( मध्यंतरी एका जाणकाराशी याबाबत संपर्क केला असता छान मार्मिक उत्तर मिळाले कि नुसता काफिया घेऊन चांगली गझल करता येते व रदीफ घेऊन वाइट रचना सुध्दा करता येते. )
बाकी केदार पाटणकरांच्या खुलाश्यामुळे बराच गोंधळ कमी झालाय
केदार व भूषण.... चर्चेबद्दल धन्यवाद
'काफियाच्या मदतीने ढोबळ विचारांना रेखीव रूप देता येईल' हेही मत मला पटत नाही. माझ्यामते 'काफिया' हा शब्द बर्याच वेळा शेराला रूप देण्याची भूमिका करत नसून तो शेराचा आत्मा असल्याप्रमाणे वावरतो. बर्याच वेळा 'काफिया'मुळे शेराला दाद मिळते. त्याच्यावर शेराचा अर्थ भरपूर विसंबून असतो.
आपल्या या ओळी:
म्हटलेच जीवनाला अपघात एक जर का
तर मी अनेक वर्षे अपघातग्रस्त आहे
यातील काफिया आपण बदलू शकणार नाही. या ओळींमधे काफियाने ढोबळ विचारांना रेखीव रूप दिले आहे असे वाटत नसून त्या काफियावरच त्या ओळी अवलंबून आहेत. म्हणजे दुसरी ओळ जर आपण अशी घेतली असतीतः
तर मी कसे म्हणावे की मीच त्रस्त आहे?
तर यातून असे विधान होईलः
'संपूर्ण जीवनच एक अपघात असेल तर मी एकटा थोडाच त्रस्त असणार आहे? सगळेच त्रस्त असणार! '
पण आपल्या शेराचा अर्थ असा होतो:
'जर जीवनालाच अपघात म्हंटले गेले तर मी कायमच अपघातग्रस्त आहे'. यामधे अपघातग्रस्त मधील 'ग्रस्त' घेणे आपल्याला गरजेचे होणार! आपण 'अपघातत्रस्त' घेऊ शकणार नाही कारण तसा शब्द प्रचलीत नाही.
याचाच अर्थ मी असा घेतो की आपला हा शेर पूर्णपणे काफियावर अवलंबून आहे.
कदाचित, ( यात कृपया राग मानू नये, पण) आपल्याला 'अपघातग्रस्त' हा शब्द व त्यात येणारा 'ग्रस्त' हा काफिया सुचल्यामुळे या शेराची निर्मीती झाली असावी असे म्हणायला रसिकांना वाव मिळेल. अपघातग्रस्त या शब्दाने आपल्या शेराला रेखीव रूप दिले असे वाटत नसून त्या शब्दाभोवती तो शेर आहे असे वाटणे शक्य होऊ शकेल.
मला आधीच्या प्रतिसादामधे असे म्हणायचे होते की शेराचा अर्थ ठरल्यावर काफिया शोधावा लागणे हे योग्य समजले जावे. काफिया सापडल्यावर त्याभोवती शेर गुंफणे हे माझ्यामते योग्य नाही. पूर्णपणे मान्य करतो की आपले अनेक शेर हे अत्यंत नैसर्गीक, सहज सुचलेले व मला आवडणारे आहेत अन मी आपल्या रचनांचा चाहताही आहे. वरील शेर फक्त या चर्चेपुरता घेतला कारण तो या चर्चेस योग्य वाटला.
धन्यवाद!
काव्य रचणे आणि सुचणे यात मी तरी सुचण्यालाच जास्त गुण देईन.
एखाद्या गाफील क्षणी काहीतरी मनात काव्यमय येते. या अर्थी कविता स्फुरते, हे निश्चित.
हे विधान मान्य नाही.
कोणताही गझलकार हा प्रथम एक उत्तम कवी असला पाहिजे असे वाचल्याचे आठवते आहे.
कवी गाफिल असतो हे विधानच धक्कादायक आहे. गाफिल राहणारा तो कवी कसला? कविता अशीच जाता-येताही सुचली पाहिजे. तीही वृत्तात. तर स्वत:ला कवी वगैरे म्हणण्यात काही अर्थ आहे. गाफिल क्षणी काव्य सुचत नाही तर एखाद्या गोष्टीत दक्ष असल्यामुळेच काव्य सुचते. कवितेचा अभ्यास करणे निराळे आणि काव्य सुचणे निराळे. काव्य सुचण्यासाठी काही ठाण मांडून बसण्याची आवश्यकता नसते.
दुसरे, काफिया सुचल्यावर लिहून ठेवत जा हे सांगणे बरोबरच आहे. कारण, व्यापामुळे आपण विसरू शकतो. पण ओळ लिहून ठेवा म्हटले तर बरोबर वाटते.
ज्या स्वरुपात कविता दिसते, त्या स्वरुपात ती सुचत नाही. काहीतरी ढोबळ दिसते व नंतर वृत्त, शब्द यांच्या कारागिरीमुळे ते ओळ स्वरुपात उतरवले जाते.
या विधानालाही माझा आक्षेप आहे.
समजा एखाद्याला पूर्ण मतला ताकदीनिशी सुचला तर आपली हरकत आहे काय? मी कोणाचीही उदाहरणे देणार नाही. कोण काय कारागिरी करते मला माहित नाही. वृत्तामध्येच ओळ सुचणे याला मी खरी कविता म्हणेन.
काही प्रतिभावंतांना ओळ कागदावर जशी दिसते तशीच सुचत असेल तर मला कल्पना नाही.
हेही आपले म्हणणे मला मान्य नाही.
जुन्या कितीतरी कवींची उदाहरणे देता येतील की ज्यांनी अशाप्रकारे काव्यच नव्हे तर महाकाव्य लिहिले आहे. मुळात कागदावर जशी दिसते तशीच ओळ सुचली पाहिजे असा कवीचा अट्टाहास असायला हवा. त्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न करायला हवा. आपल्याला याची कल्पना येण्यासाठी कधीही तुम्ही म्हणाल तेंव्हा चहा-कॉफीसाठी भेटू या.
कलोअ चूभूद्याघ्या
प्रसाद, भूषण व अजय,
चिकित्सक चर्चेचा, मला जसा आनंद होतो तसाच तो तुम्हा तिघांनाही होत असणार.
दादांच्या विधानावरून दादांचे एकंदर मत काय असावे , याचा तर्क बांधून थोडे विस्तृत स्पष्टीकरण श्री. लिमये यांच्या आकलनासाठी केले.
मूळचे विधान दादांचे आहे.
मी केवळ माध्यम आहे.
श्री.लिमये, आपला गोंधळ कमी झाल्याचे वाचून छान वाटले.
एकमेकांवर लोभ आहेच.
मी इथे तसा नवीन आहे. मनात काही प्रश्न आले ते मांडतोय
१. जेव्हा गझलेत रदीफ असते तेव्हा ती गझल जास्त उठावदार होते का ?
२. माझ्यासारखे जे नवीन आहेत, नुकतेच गझल लिहीण्याचा प्रयत्न करू लागलेत अशांना रदीफ घेऊन गझल करणे सोपे वाटते का ?
याच साइटवर एका लेखात ( बहुधा केदार पाटणकर यांचा लेख आहे ) दादांनी सांगीतल्याचा उल्लेख आहे की, काफिया सुचल्यावर लिहून ठेवत जा. माझा अनुभव असा की काही सुचलेच तर काफिया व रदीफ दोन्हीही सुचते, नुसता काफिया असा पटकन सुचतच नाही. आणि त्यात सुध्दा रदीफ म्हणजे "होते", "आहे"......अशा ठरावीक स्वरूपाच्याच असतात.
बाकिच्यांचे काय अनुभव आहेत ?