वनवास : डॉ.श्रीकृष्ण राऊत



कमी झाला झमेल्यांचा जिवाला त्रास थोडासा;
घडीभर लाभला जेव्हा तुझा सहवास थोडासा.


दिवसभर रोज मरताना तुला येईल तो कामी;
सकाळी ठेव जगण्याचा मनी उल्हास थोडासा.

पुन्हा झाली चुकी माझी, पुन्हा मी फसवल्या गेलो;
पुन्हा झाला जिव्हाळ्याचा मला आभास थोडासा.


कुणाला शोधते भिरभिर नजर ओली असोशीने;
कुणाची वाट पाहे हा अखेरी श्वास थोडासा.

नको वाचू कधी पोथी,नको जाऊस तीर्थाला;
उपाशी लेकराना तू तुझा दे घास थोडासा.


कुणाला वेढले नाही इथे तू सांग लोच्यांनी;
निमित्ते शोधुनी मित्रा,जरा तू हास थोडासा.

परीक्षा संपली कोठे अरे अद्याप सीतेची;
मला सांगू नको रामा  तुझा वनवास थोडासा.

********************************************
http://mazigazalmarathi.blogspot.com
********************************************


प्रतिसाद

छान आहे ...फार आवडली...
कुणाला शोधते भिरभिर नजर ओली असोशीने;
कुणाची वाट पाहे हा अखेरी श्वास थोडासा...................मस्त शेर
आरती

गझल  अतिशय  आवडली.
हे दोन शेर फारच-
दिवसभर रोज मरताना तुला येईल तो कामी;
सकाळी ठेव जगण्याचा मनी उल्हास थोडासा.

कुणाला शोधते भिरभिर नजर ओली असोशीने;
कुणाची वाट पाहे हा अखेरी श्वास थोडासा.

तसेच-
नको वाचू कधी पोथी,नको जाऊस तीर्थाला;
उपाशी लेकराना तू तुझा दे घास थोडासा.

"मस्जिद  बहोत  है  दूर्...किसी  रोते  हुये  बच्चेको  हसाया  जाये"हा  (निदा  फाजली?) शेर  आठवला.

वाह..!!  गझल फार आवडली.
कुणाला शोधते भिरभिर नजर ओली असोशीने;
कुणाची वाट पाहे हा अखेरी श्वास थोडासा.

परीक्षा संपली कोठे अरे अद्याप सीतेची;
मला सांगू नको रामा  तुझा वनवास थोडासा.

हे शेर जरा जास्तच आवडले.

एकंदर सगळेच शेर छान.
दिवसभर रोज मरताना तुला येईल तो कामी;
सकाळी ठेव जगण्याचा मनी उल्हास थोडासा.
वा.

*आरती सुदाम कदम,
*ज्ञानेश,
*चांदणी लाड,
*चित्तरंजन भट,

आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार.

- डॉ.श्रीकृष्ण राऊत

 
भन्नाट...
नको वाचू कधी पोथी,नको जाऊस तीर्थाला;
उपाशी लेकराना तू तुझा दे घास थोडासा.

कुणाला वेढले नाही इथे तू सांग लोच्यांनी;
निमित्ते शोधुनी मित्रा,जरा तू हास थोडासा.

पुन्हा झाली चुकी माझी, पुन्हा मी फसवल्या गेलो;
पुन्हा झाला जिव्हाळ्याचा मला आभास थोडासा...वा

कुणाला शोधते भिरभिर नजर ओली असोशीने;
कुणाची वाट पाहे हा अखेरी श्वास थोडासा.

नको वाचू कधी पोथी,नको जाऊस तीर्थाला;
उपाशी लेकराना तू तुझा दे घास थोडासा.... यावरुन(बहुदा) निदा फाजलींचा पुढील शेर आठवला...
यहासे मस्जिद दूर है, चलो यू कर ले,
किसी रोते हुए बच्चे को हसाया जाये

परीक्षा संपली कोठे अरे अद्याप सीतेची;
मला सांगू नको रामा  तुझा वनवास थोडासा..... हे सगळे शेर आवडलेत..
अतिशय चांगली गझल..
-मानस६