घोटाळा (हझल)

अंधारातच ओठ बिलगता गालावर पडल्या ज्वाळा
नको तिथे हे नाक करितसे नेहमीच का घोटाळा


उलट रीत जी या जगताची मीच सांगतो ऐक जरा..
धार लाव तू धनुष्यास अन् बाण वाकडे कर बाळा


चोळचोळुनी तेल पावलां थंड राहते डोके, पण..
हात-पाय ते गरम जाहले, त्यांना कुठला द्या चाळा?


घाबरून तो बोलत नाही असे कदाचित नसेलही
थोडे काही बोलण्यासही येतो कुणास कंटाळा


रोज सकाळी नमस्कार त्याला करताना प्रश्न पडे..
पांडुरंग जे नाव तयाचे, का दिसतो पण तो काळा?


चवीचवीने कवी बोलतो गाथा अपुल्या भार्येची
थंड चुलीवर अश्रू भाजुन भरिते कर्माचा थाळा


 


(एक प्रयत्न)

गझल: 

प्रतिसाद

अजय,
आपला प्रयत्न चांगला आहे. माझ्यामते आपण जेव्हा 'हझल' म्हणतो तेव्हा उपहास व अतिशयोक्ती इतकी असणे आवश्यक आहे की खरोखरच 'हसू' यायला पाहिजे. त्या बाबतीत मात्र जरा कमतरता वाटत आहे, पण हे विचार चांगले आहेत. विशेषतः 'चाळा' हा शेर छान!

अंधारातच ओठ बिलगता गालावर पडल्या ज्वाळा
नको तिथे हे नाक करितसे नेहमीच का घोटाळा
हझल हा काव्यप्रकार ज्यांनी अस्तित्वात आणला त्यांची भूमिका अशी होती की काही विषय, जसे प्रेम, सामाजिक विषय, राजकीय नेते, चुकीच्या रीती, यावर अशा पद्धतीने सभ्य भाषेत टीका करणे की ज्याने खसखस पिकावी.
मतल्यामधे कवी नाकाची तक्रार करत आहे. नाक हा अवयव तप्त असावा अशी कवीची धारणा आहे अशी शंका येण्यास या ओळींमधे वाव आहे. जरा स्पष्टच बोलायचे तर ( माफ करा, एकंदर वातावरणाची डिग्निटी मेंटेन व्हायलाच पाहिजे, पण काही काही रचनाच अशा असतात की तसे बोलावे लागते ), चुंबने घेताना प्रियकर व प्रेयसी यांचा चेहरा मिरर इमेज प्रमाणे एकमेकांच्या समोर नसून एकमेकांच्या विरुद्ध बाजूला झुकलेला असेल तर वरील ओळीतील शक्यता निर्माण होते. म्हणजे नाक गालावर आपटून 'घोटाळा' निर्माण होऊ शकतो. जर समोरासमोर असतील तर नाक नाकावरच आपटेल. आता प्रश्न असा आहे की 'नाक' घोटाळा करू शकते हे मान्य, पण गालावर ज्वाळा पडणे म्हणजे कवीला काय बरे म्हणायचे असावे? बर गाल हा काही 'नको असा' अवयव नाही. कवीने 'नको तिथे' म्हंटले आहे. 'नको तेव्हा' समजू शकेल. पण ते वृत्तात बसणार नाही. 'अंधारातच' मधल्या 'च' चे प्रयोजन समजायला जरा अवघड आहे. ओठ अंधारात बिलगू नयेत असा काही कायदा ऐकिवात नाही. आपल्याकडील प्रथेप्रमाणे उलट अशा गोष्टी अंधारातच बिलगतात असे आमचे वाचन आहे.


उलट रीत जी या जगताची मीच सांगतो ऐक जरा..
धार लाव तू धनुष्यास अन् बाण वाकडे कर बाळा
'मीच'! इथे कुणीच सांगत नाहीये, शेवटी मलाच सांगायला लागले, कुणीतरी तरी हे केलेच पाहिजे ना, अशा प्रकारचा भाव निर्माण होतो. 'मीच' ऐवजी 'तुला' का नसावे? या कवीचे आम्ही एक पाहिले आहे. खूप विचार केल्यानंतर या कवीच्या रचना समजतात.


चोळचोळुनी तेल पावलां थंड राहते डोके, पण..
हात-पाय ते गरम जाहले, त्यांना कुठला द्या चाळा?
गरम झालेल्या गोष्टींना चाळा द्यावा लागतो असा एक विचार मांडला आहे.


घाबरून तो बोलत नाही असे कदाचित नसेलही
थोडे काही बोलण्यासही येतो कुणास कंटाळा
व्वा! सुंदर शेर! मात्र हा हझलेला शोभत नाही. गझलेला शोभतो.


रोज सकाळी नमस्कार त्याला करताना प्रश्न पडे..
पांडुरंग जे नाव तयाचे, का दिसतो पण तो काळा?
हा विषय जरूर हझलेचा आहे.


चवीचवीने कवी बोलतो गाथा अपुल्या भार्येची
थंड चुलीवर अश्रू भाजुन भरिते कर्माचा थाळा
हा पण विषय सामाजिक असल्याने निश्चीतच हझलेचा आहे.
कवी अजय चांगल्या गझला करतो. जसे एक कविता, मदारी वगैरे! इथे या कवीने एक शेर गझलेचा, चार शेर हझलेच्या विषयावर (नाक,  बाण, पांडुरंग व भार्या) असे रचून ही हझल प्रकाशित केली आहे. चाळा हा शेर शेरच नाही.
एकंदर या साईटवर 'हझल' हा काव्यप्रकार अजिबात समर्थपणे उभा राहिलेला नाही. दारू, आजारास कारण की, घोटाळा या सर्व हझला हेच सिद्ध करतात. वडे की भजी ही सेन्सॉर्ड हझलदेखील सुमार दर्जाची होती.
हे पाहून आता आम्हीच एक हझल करण्याच्या विचारात आहोत, रसिकांना चालत असेल तर कळवावे.
गंभीर समीक्षक

सन्माननीय गंभीर समीक्षक,
मला असे वाटायचे की आपण पद्य रचू शकत नाही म्हणुन आजपर्यंत गद्यरुपातुन हझलच करायचात अन त्याला समीक्षा म्हणायचात.
करा करा....करा एक हझल तुम्ही!

गंभीर समीक्षकः  आपल्या अनेक गोष्टी मुळातच पटणा-या नाहीत. तरी  एक बदल आपण करायला सांगितलात तो करतो आहे. पण माझ्या पद्धतीने.
उलट रीत जी या जगताची अता सांगतो ऐक जरा..
धार लाव तू धनुष्यास अन् बाण वाकडे कर 'बाळा'
असे वाचा. नाही समजले तर सोडून द्या.
कलोअ चूभूद्याघ्या

श्री अजय जोशी
वरील प्रतिसादांपैकी एका मुद्याशी सहमत कि चांगल्या कल्पना हझलेत वाया घालवू नका, एखाद्या गझलेकरता जपून ठेवा
 
बाकी रचना छान आहे

चोळचोळुनी तेल पावलां थंड राहते डोके, पण..
हात-पाय ते गरम जाहले, त्यांना कुठला द्या चाळा?

घाबरून तो बोलत नाही असे कदाचित नसेलही
थोडे काही बोलण्यासही येतो कुणास कंटाळा
हा  शेर  अगदीच  छान  जमलाय.