कैफियत-६

गझल ही शेवटपर्यंत एकाच वृत्तात लिहायची असते आणि गझल हे वृत्त नाही, हे अद्यापही अनेकांना समजलेले नाही. अभंग किंवा ओवीसारखी अक्षरवृत्ते सोडल्यास कोणत्याही वृत्तात गझल लिहिता येते.

मी मराठी गझलेसाठी माझ्या अर्ध्याहून अधिक आयुष्याची किंमत मोजल्यानंतर मला नियतीने सवाल केला, "एकीकडे विविधरंगी तथाकथित थोरांचे कडेकोट अभिजात हितसंबंध आणि दुसरीकडे महाराष्ट्राची संपूर्ण तरुण पिढी, ह्यात अधिक महत्त्वाचे कोण?"

मी माझा कौल तरुण पिढीच्या बाजूने दिलेला आहे आणि म्हणून गझलेचे जे निर्भेळ सत्य आहे, ते आणि फक्त तेच कोणाचीही पर्वा न करता येथे सांगणे हे माझे कर्तव्य आहे. भारतात प्रत्येकच माणूस शतायुषी नसतो. आणि आता जे आयुष्य उरले आहे, त्याचे सार्थक व्हावे अशी माझी इच्छा आहे. उगवत्या पिढीने गझलेला आपले म्हटले की, मला हे सार्थक मिळणार आहे. माझे तरुण पिढीला एवढेच सांगणे आहे की,

हम से जो हो सका सो कर गुजरे
अब तेरा इम्तेहान है प्यारे!

ज्यांना गझल लिहिणे जमत नाही, ज्यांना आपले अज्ञान लपवून ठेवायचे आहे, ज्यांना आपापल्या हितसंबंधांची राखण करायची आहे; त्यांचा असा पेटंट आरोप आहे की, वृत्त आणि यमकाचे बंधन पडल्यामुळे गझल कृत्रिम व अनैसर्गिक आहे. ह्या आरोपाचा अर्थ असा होतो काय की, टी.एस.इलियट जन्मण्यापूर्वी भारतात जे काही लिहिले गेले, ते सारेच्या सारे कृत्रिम व अनैसर्गिक होते? ह्यावर असेही तर्कदुष्ट उत्तर देता येईल की आता जागतिक पातळीवर वृत्तबद्ध काव्य कालबाह्य झालेले आहे.

पण जोपर्यंत मानवजात ह्या पृथ्वीतलावर शिल्लक आहे, तोपर्यंत लय, ताल आणि सूर शिल्लक राहतील आणि म्हणून वृत्तबद्ध आणि गेय काव्य कधीही कालबाह्य होणार नाही. आणि जे काव्य मूलभूत मानवी मूल्यांशी इमान राखते, जे मानवाच्या सुखदुःखांविषयी, त्यांच्या स्वप्नांविषयी, त्याला हव्या असलेल्या न्यायासाठी उत्कटपणे व परिणामकारकपणे बोलते, ते काव्य कधीही कालबाह्य होत नाही.

मी निरीश्वरवादी आहे. मी स्थितिवादी नाही. "ठेविले अनंते तैसेचि राहावे!" हा उपदेश मला मान्य नाही. नसलेल्या परमेश्वरावर हवाला ठेवून स्वस्थ सोसत बसणे मला मान्य नाही. दुर्दैवाने संतजनांनी हेच केले. परंतु त्याच वेळी त्यांच्या काव्यात मानवाचे दुःख बोलते, करुणा बोलते आणि सामाजिक दंभ व पाखंडाविरुद्ध त्यांची चीड आग ओकते. म्हणूनच द्न्यानेश्वर, एकनाथ, चोखोबा व तुकारामांसारख्या संतांच्या ओव्या आणि अभंगवाणी आजही कालबाह्य नाही. आजही महाराष्ट्राच्या ओठांवर द्न्यानेश्वराची ओवी, एकनाथांचे भारुड आणि तुकारामांचे अभंग आहेत.

खरे तर आपल्या सोयीनुसार वृत्तबद्ध आणि गेय काव्याला कालबाह्य ठरवू पाहणारेच वर्तमानकाळात कालबाह्य आहेत! वर्तमानकाळाचा हात धरून ह्बविष्यकाळाची वाटचाल करणारा कवी कधीही कालबाह्य होत नसतो. काळाचा संदर्भ बदलला तरी हृदयाला स्पर्श करणाऱ्या शब्दात सामावलेल्या चिरंतन तत्त्वाचा कस उतरत नसतो. आणि मुळातच कस नसला तर तथाकथित आधुनिक काव्याची पुस्तके कवी जिवंत असतानाच वाचनालयांच्या कपाटात धूळ खात पडतात - आपुले मरण पाहिले म्यां डोळा!

(उर्वरित भाग लवकरच)