प्रास्ताविक- भाग २
आपल्याला जे जाणवले ते अधिकाधिक लोकांना जाणवावे, ही भटांची ओढ मला मोलाची वाटते. त्यांची कविता दुर्बोधतेकडे झुकत नाही. ती कविता ज्या असंख्य हृदयात ओतावी त्या हृदयांची संख्या ते कुठल्याही अटींनी मर्यादित करीत नाहीत. ' साधीसुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी' असे ते केवळ उपचार म्हणून म्हणत नाहीत. त्या साध्यासुधा माणसाशी साधायच्या संवादाचे मोल मोठे वाटते. एकच तुकारम किंवा एकच गालिब अनपढांपासून ते पंडितांपर्यंत सर्व थरांतल्या आणि सर्व दर्जांच्या बुध्दिमत्तेच्या आस्वादकांना नाना प्रकारांनी भेटत असतो.तो प्रकार कुठला असेना, पण त्यातले काहीतरी जाणवल्याशिवाय त्या कवितेशी संवादच सुरु होत नाही. कवितेतली दुर्बोधता सापेक्ष मानली तरी सुबोधता हा दुर्गुण मानायला नको. वनस्पतिशास्त्रज्ञाला चारचौघांपेक्षा फूल अधिक कळत असेल, पण त्याचे रंग आणि गंध प्रथम सामान्य माणसासारखे त्याला आकर्षित करत नाहीत असे थोडेच आहे?
सुरेश भटांची कविता आजच्या नवकवितेच्या एका निराळ्या वातावरणातही आपले अंगभूत सौंदर्य घेऊन प्रगटली आहे. नाना प्रकारच्या भाववृत्तींचा इथे फुलोरा आहे. 'निराशेचा गाव आंदण आम्हासी' म्हणणा-या संतांची निराशाही त्यांच्या कवितेतून दिसते. अशा एका क्षणी तेही
'भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी।
काय ह्या गावातसुध्दा एकदा होती घरे?'
असा उदास करणारा प्रश्न विचारीत येतात. असा प्रश्न काय त्यांना एकट्यालाच पडतो? जगताना आपल्या संवेदना बोथट होऊ न देता जगणा-या सगळ्यांनाच आज पडणारा हा प्रश्न आहे. मुंबईसारख्या विराटपुरीत राहणा-या माणसाला भोवतालचे दैन्यदु:ख पाहण्याचे टाळत टाळत जगावे लागते. एखाद्या क्षणी स्वत:चे डोळे असून न पाहता आणि कान असून न ऐकता कंठावे लागणारे जिणे आठवले की, त्या हिंडणा-या प्रेतातले आपणही एक आहोत याची जाणीव होते. त्या प्रश्नाला लाभलेले काव्यरूप त्यालाही अधिक उत्कटतेने अस्वस्थ करून जाते. असले नाना प्रकारच्या भावनांचे तरंग उठवणे हेच कलेचे कार्य असते. ते तरंग आहार-निद्रा-भय-मैथुनाच्या पलीकडच्या जीवनाचे स्मरण देऊन जातात. चांगले साहित्य माणसाला अंतर्मुख करते. ज्या गलबल्यात आपल्याला जावे लागते त्यातून दूर पळून जाणा-या माणसाची सुटका नाही. त्यात पुरुषार्थही नाही. सुरेश भटांची वृत्ती पळून जाणा-यांतली नाही. जगताजगता क्षणभर त्रयस्थ होणा-याची आहे. जीवनाच्या नाटकात भूमिका करताकरता क्षणभर प्रेक्षक होणा-याची आहे. खेळताखेळता तो आपलाच खेळ पाहणा-याची आहे. कलावंताचे 'स्व'-तंत्रपण ते हेच! ही वृत्ती, ' गुंतुनी गुंत्यात सार्या, पाय माझा मोकळा' ह्या ओळीत भटांनी व्यक्त केली आहे. जीवनाच्या ह्या खेळाचा कुणी अर्थ काढू नये. तसा त्याला स्वत:चा असा अर्थ नाही. पण खेळाचा आनंद आहे. जिंकण्या-हारण्याचे सुखदु:ख आहे. कधी नाजूक बंधने आहेत. त्या बंधनात गुंतणे आहे. त्यातून सुटणे आहे. तुटणे आहे. हे सारे माणसाने निर्माण केले आहे. पण हा सारा खेळ आहे याची जाणीव ठेऊन जगणे ह्या लेकुरंच्या गोष्टी नव्हेत! सुरेश भटांची कविता वाचताना आनंद वाटतो तो या खेळात आपल्याला पडणारे प्रश्न त्यांच्या कवितेतून नेमके शब्दरूप लेवून प्रकटताना, अर्थात नित्य व्यवहारातल्या प्रश्नांपलीकडले प्रश्नही सगळ्यांनाच पडतात असे नाही. सुरेश भटांनी विचारलेला ' हे खरे ही ते खरे?' हा प्रश्न सनातन आहे. जीवनाच्या या विराट स्वरूपाकडे क्षणभर थबकून पाहण्याची बुध्दी होणा-यांना हा प्रश्न नेहमीच पडतो. सुरेश भटांसारख्या प्रतिभावंत कवीला हा प्रश्न पडलेला पाहून अशा लोकांना त्या कवीशी अधिक जवळीक साधल्याचा आनंद होतो. जीवनात गवसलेल्या आत्मसंतोषापेक्षा न गवसल्याच्या रुखरुखीतूनच काव्य जन्माला येते.
ही अलौकिक रुखरुखच काव्यनिर्मितीमागली मुख्य प्रेरणा असते. कुणी ती शब्दांच्या चिमटीत पकडू पाहतो, कुणी रंगरेषांतून धरू लागतो. हे वेड गतानुगतिकतेतून जाणा-याला कळत नाही. आणि कळत नाही म्हणून रुचत नाही मग :
'हालती पालीपरी ह्या जिभा
सारखी माझ्यावरी थुंकी उडे!'
हा अनुभव कलावंताला भोगावा लागतो. गडकर्यांनी जिला दीड वितीची दुनिया म्हटले आहे, तिच्यातच सगळ्यांना जगायचे आहे. पण त्या दुनियेतही कुणाच्या तरी डोळ्यातले चांदणे वेचण्याचे क्षण लाभलेले असतात. त्याच दुनियेत ' अमृतमय मी, अमृतमय तू, तनमन अमृत बनते ग' असा अनुभव लाभतो. सुरेश भटांच्या 'दिवंगताच्या गीता'तली ही ओळ मला फार महत्त्वाची वाटली. तसा तो आला नसता, नव्हे तो येत असतो याची जाणीव सुरेश भटांच्या काव्यातून उमटली नसती, तर त्यांच्या करुण गाण्याची रडगाणी झाली असती. त्यांची कविता ही एक कारुण्य जोपासण्याचा किंवा अश्रूंची आरास मांडण्याचा षौक झाला असता.
ही जाणीव आहे म्हणूनच सुरेश भट हे केवळ वैयक्तिक सुखदु:खाच्या अनुभूतींना फुंकर घालीत बसणारे कवी नाहीत. आजच्या समाजातले रगडणारे आणि रगडले जाणारे ह्या द्वंद्वाची त्यांना जाणीव आहे. 'तसू तसू दु:खे घेऊन जोजवीत बसणा-यांची आत्मवंचना ज्याची त्याला गाडणार आहे', यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांचे गीत हे त्यांची वैयक्तिक दु:खे गात फुटावे असे त्यांना वाटत नाही. त्या गीतात 'दु:ख संतांचे भिनावे' अशी त्यांना ओढ आहे. असल्या व्यापक दु:खाची जाणीवच कवीला ख-या अर्थाने 'कवी' ही पदवी प्राप्त करून देत असते. समान दु:खांच्या अनुभूतीतून माणूस माणसाच्या अधिक जवळ येतो. त्यांनी तुकारामाला उद्देशून-
'तुझे दु:ख तुझे नाही
तुझे दु:ख अमचे आहे!'
असे म्हटले आहे. सुरेश भटांची कविता वाचताना त्यातल्या दु:खाच्या अनुभूती आस्वादकालाही आपल्या वाटतात. संवाद सुरू होतो. इथेच भटांचे यश आहे. मराठी कवितेच्या प्रांतात भटांना असली आपुलकी आजही लाभली आहे. यापुढे हा आप्तवर्ग खूप वाढेल अशी प्रसादचिन्हे आहेत.
'हाय तरीही बाजारी माझी तोकडी पुण्याई
नाही अजून तेवढी माझ्या शब्दांना कल्हई'
असे जेव्हा सुरेश भट म्हणतात तेव्हा त्यातला उपरोध लक्षात घ्यायला हवा. ही भटांची तक्रार मानू नये! पितळ उघडे पडण्याची भीती असणार्यांना कल्हईची गरज पडावी! इथला सुवर्णकण बावनकशी आहे!
'माझीया मस्तीत मी जाई पुढे
मात्र बाजारु कवाडे लावती !'
बाजारू कवाडे लावली तरी आज अनेक अंत:करणांची कवाडे सुरेश भटांच्या कवितांसाठी उघडली गेली आहेत. आणखीही उघडली जाणारच आहेत. दीड वीत छातीच्या माणसांनादेखील आपल्या छातीची रुंदी आणखी खूप वाढावी अशी ओढ नसते असे आपण का मानावे? तसा एखादा क्षण येऊन त्या चातकाने चोच वासली तर त्या चोचीत धार टाकण्याचे काम कवीलाच करावे लागेल, ह्याची जाणीवही भटांना आहे. म्हणूनच ते वैयक्तिक अहंकाराने नव्हे, तर जो 'अमृताचा वसा' त्यांनी हाती धरला आहे त्यामागच्या कर्तव्याच्या जबाबदारीने म्हणतात की, ' आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे!' त्या उद्याची वाट न पाहता त्यांची गीते आजच लोक गाऊ लागले आहेत. काहीतरी मनात शिरल्याखेरीज कोण कशाला गाईल? आणि अशी कानातून किंवा डोळ्यांतून मनात शिरलेली गीते कधी व्यर्थ का असतात?
दुनियेतील बाजारू कवाडे नाहीशी करण्याचे सामर्थ्य आणि दु:खाचे देखणेपण पाहण्याची ताकद असल्या गाण्यातूनच मिळत असते!
- पु.ल.देशपांडे.