जाहला बराच वेळ...

==========================
जाहला  बराच  वेळ, हात आपले  अता  सुटायला  हवे,
थांबले  असेल  दु:ख  एकटे  घरी, मला  निघायला  हवे..

जाणवेल  रे  कशी  घरास  त्याशिवाय  पावसातली  मजा?
दु:ख  कोठलेतरी  छतामधून  सारखे  गळायला  हवे...

केवढ्या  बधीर  होत  चालल्यात  जाणिवा  सुखामुळे  अता,
शल्य टोकदार  कोणतेतरी  कुठेतरी  रुतायला  हवे..

या  घरातही  जुन्या  घरातली  तशीच  सोय  पाहिजे  मला-
मी  जिथे  बसेल  त्यातिथून  चांदणे  मला  दिसायला  हवे

अर्थ  आजकाल  वेगळेच  का  निघावयास  लागले  बरे?
शब्द शब्द  यापुढे  मला  जरा  जपून  वापरायला  हवे..

स्नेह  केवढा  मनात  यास  फारसे  महत्व  राहिले  कुठे..
'स्नेह  केवढा!' असे  समोरच्यास  फक्त  भास  व्हायला  हवे.

देश  चालला  किती  पुढे ! फुगीर  आकडे  नकाच  दाखवू
फक्त  येथल्या  चुलीचुलीत  अन्न  रोजचे  शिजायला  हवे..

शेवटी  गुपीत  ते तुझे  तसेच  राहणार  यापुढे  सदा,
जे  विचारताच  तू  म्हणायचीस- "तूच  ओळखायला  हवे"

मी  तुला  म्हणायचो  'असे  करू  नको, तसे  करू  नको' जणू-
घाट  बोलतो  नदीस, 'पायरी  बघून  तू  वहायला  हवे.'

भेट आपली  पुन्हा  घडेल  ना  घडेल, ती  नकोच  काळजी
हे  ऋणानुबंध  नेहमी  तुला  असेच  आठवायला  हवे...

काय  साधणार  ते  कुलूप? या  घरामधे  रहायचा  कवी
आत  केवढेतरी  भुयारही  असेल, ते  बुजायला  हवे !

-ज्ञानेश.
===========================

गझल: 

प्रतिसाद

ज्ञानेश,
उत्कृष्ट गझल झळकावलीत! मतला, चांदणे, स्नेह केवढा आणि भुयार हे शेर अप्रतिम आहेत. दोन तीनदा वाचून काढली. आपल्या गझला खरोखरच भिडतात. अशी गझल झळकावल्याबद्दल धन्यवाद!
 
या  घरातही  जुन्या  घरातली  तशीच  सोय  पाहिजे  मला-
मी  जिथे  बसेल  त्यातिथून  चांदणे  मला  दिसायला  हवे

फार आवडला.

अगदी सुरेख सुरेख गझल.  सगळेच शेर फार फार आवडले.  अगदी मोठे वृत्तही आपण सहज हाताळता. पुढील गझलेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

फ़डाड्‍
जाहला  बराच  वेळ, हात आपले  अता  सुटायला  हवे,
थांबले  असेल  दु:ख  एकटे  घरी, मला  निघायला  हवे..
या  घरातही  जुन्या  घरातली  तशीच  सोय  पाहिजे  मला-
मी  जिथे  बसेल  त्यातिथून  चांदणे  मला  दिसायला  हवे

चित्तरंजनशी   पूर्ण सहमत

भूषणजी, कौतुक, प्रसाद लिमये, चित्तदा, समीर...सर्वांचे मनःपुर्वक आभार.
@चित्त दा- तुमची ही शाबासकी फार फार मोलाची आणि आत्मविश्वास वाढवणारी आहे. शतशः आभार!
@प्रसाद- 'फडाड' काही समजले नाही. पण चांगल्या अर्थानेच असावे! धन्यवाद.

सर्वच दृष्टीने परिपूर्ण  गझल. नावे ठेवायला जागा नाही.

फ़डाड म्हणजे....... सुरेख, अप्रतीम

सुंदर. खूपच छान. अभिनंदन.
कलोअ
चूभूद्याघ्या

केवढ्या  बधीर  होत  चालल्यात  जाणिवा  सुखामुळे  अता,
शल्य टोकदार  कोणतेतरी  कुठेतरी  रुतायला  हवे..

शेवटी  गुपीत  ते तुझे  तसेच  राहणार  यापुढे  सदा,
जे  विचारताच  तू  म्हणायचीस- "तूच  ओळखायला  हवे"
भेट आपली  पुन्हा  घडेल  ना  घडेल, ती  नकोच  काळजी
हे  ऋणानुबंध  नेहमी  तुला  असेच  आठवायला  हवे...
हे शेर एकदम झकास.....फार आवडले....

जाहला  बराच  वेळ, हात आपले  अता  सुटायला  हवे,()
थांबले  असेल  दु:ख  एकटे  घरी, मला  निघायला  हवे..

(दुसरी ओळ अतिशय सुंदर)

केवढ्या  बधीर  होत  चालल्यात  जाणिवा  सुखामुळे  अता,
शल्य टोकदार  कोणतेतरी  कुठेतरी  रुतायला  हवे..

(वा...वा...!)

या  घरातही  जुन्या  घरातली  तशीच  सोय  पाहिजे  मला-
मी  जिथे  बसेल()  त्या तिथून  चांदणे  मला  दिसायला  हवे

(वा. फारच छान !)

अर्थ  आजकाल  वेगळेच  का  निघावयास  लागले  बरे?
शब्द शब्द  यापुढे  मला  जरा  जपून  वापरायला  हवे..()

(उत्तम...!)

स्नेह  केवढा  मनात  यास  फारसे  महत्व  राहिले  कुठे..
'स्नेह  केवढा!' असे  समोरच्यास  फक्त  भास  व्हायला  हवे.()

(मस्त...!)  'स्नेह  केवढा!' असे  समोरच्यास  फक्त  भासवायला  हवे.

भेट आपली  पुन्हा  घडेल  ना  घडेल, ती  नकोच  काळजी
हे  ऋणानुबंध  नेहमी  तुला  असेच  आठवायला  हवे...()

(वा...वा...)
 
मि. प्रदीप यांनी कितीतरी बाबी दुरुस्त केल्या. उत्तम! तशी गझल केल्यावर आणखी मस्त वाटेल हे खरे! 'भासवायला हवे' ही दुरुस्ती तर खरच छान आहे.
 
सुनेत्राजी, जोशीसाहेब, निशा, प्रदीपजी.. सर्वांचे  आभार.
@प्रदीपजी- तुम्ही  सुचवलेल्या  बदलांसाठी  आभार  मानावे  तितके कमीच. 'भास व्हायला' आणि 'भासवायला' हा  जरासाच  बदल आहे, तरी  त्या बदलामुळे किती  सहजता  आलीये. याला म्हणतात कसब.
काही  ठिकाणी  'हवेत' असे पाहिजे होते, जे वृतामुळे  घेता येत नाहीत.
@प्रसाद- 'फडाड' समजले. धन्यवाद.

मी  तुला  म्हणायचो  'असे  करू  नको, तसे  करू  नको' जणू-
घाट  बोलतो  नदीस, 'पायरी  बघून  तू  वहायला  हवे.'

सुंदर शेर्..आपणाकडे सांगण्याजोगे भरपूर काही आहे..

ज्ञानेश, मस्त गझल!!
चांदणे, स्नेह आणि ऋणानुबंध हे शेर मला विशेष आवडले!
कुलूप शेर मात्र २-३ दा वाचूनही नीट कळला नाही. चु.भू.दे.घे.

सगळेच्या सगळे शेर आवडले. (दुरुस्ती प्रदीपरावांनी दिलीच आहे. तरीही कवीचे स्वातंत्र्य म्हणू.)
काय  साधणार  ते  कुलूप? या  घरामधे  रहायचा  कवी
आत  केवढेतरी  भुयारही  असेल, ते  बुजायला  हवे !

हा शेर सर्वात ममत्त्वाचा वाटला. शेर सोपा असावा हे खरे. पण मला असे शेर आवडतात.
('या घरामधे रहायचा कवी' ऐवजी 'या घरी अजून राहतो कवी' असे काही केले तर जास्त बरे. 
घरात राहणारा कवी, कुलुप आणि भुयार! वा! घरात कवी गुपचुप येतच राहणार... किति हाकला हाकला, फिरी येतं पिकावर| )
 
@अनंत ढवळे  सर- आपला प्रतिसाद पहिल्यांदाच मिळाला. आभारी आहे. सांगण्यासारखे तर आहेच, आता गझलेतून "सांगण्याची कला" शिकतोय. तुमचे मार्गदर्शन अपेक्षीत आहे!
@पुलस्ति- आभारी  आहे. खरं सांगायचं  तर त्या शेराचा अर्थ मलाही नीटसा  सांगता येणार नाही. तो शेर आहे तसाच सुचला, आणि लिहून टाकला.
बहुधा मला 'प्रेयसीचे मन' म्हणायचे आहे... "मला या मनातून काढून टाकल्यावर बाहेरून कुलूप लावले तरी काय साधणार? आत माझ्या आठवणींचे केवढेतरी भुयार असेल, ते आधी बुजावे लागेल तुला.." हे किंवा असे काहीतरी. पण शेरातून तसला काही अर्थ अजिबात निघत नाही, हे मला दिसते आहे. प्रथमदर्शनी  तर  हास्यास्पद शेर वाटतोय हा!
तसेच 'शिजायला' हा शेर मी का घेतलाय तेही मला कळत नाही. अगदीच बाळबोध सामाजिक शेर आहे तो. (एक जास्तीचा  काफिया म्हणून तर नक्कीच घेतला नाही. कारण या वृतात असे असंख्य काफिये बसवता येतील.) पण माझ्या गझलेत एखादा तरी असा शेर असावा, असे मला नेहमी  वाटत आले आहे. हे थोडेसे  हिंदी  सिनेमासारखे असावे. पिक्चर हिट व्हावे म्हणून त्यात ऍक्शन, रोमांन्स, ़कॉमेडी, सस्पेन्स... सर्व मसाला. तसेच एकाच गझलेत- "चांदणे", "देश चालला" आणि "ऋणानुबंध"..  ज्याला जे हवे असेल  ते त्याने घ्यावे..!

@विसुनाना- तुम्हाला गवसलेला अर्थही चुकीचा नाहीच...कारण तुमचा प्रतिसाद वाचतांना मला वाटले की- अरे हो, हेच म्हणायचे होते मला.

एका शेरात असे अनेक अर्थ  असू शकतात का? असावेत का? शेर संदिग्ध होणे योग्य नाहीच, पण अगदी बाळबोध शेरातही  'मझा' नसतोच ना??
काही  कळेनासं झालंय.
कुणी  मार्गदर्शन करेल का??

भेट आपली  पुन्हा  घडेल  ना  घडेल, ती  नकोच  काळजी
हे  ऋणानुबंध  नेहमी  तुला  असेच  आठवायला  हवे...

अंगावर शहारा आला..हे असेच गझलेत अपेक्षित आहे, दोस्ता
केवढ्या  बधीर  होत  चालल्यात  जाणिवा  सुखामुळे  अता,
शल्य टोकदार  कोणतेतरी  कुठेतरी  रुतायला  हवे..

या  घरातही  जुन्या  घरातली  तशीच  सोय  पाहिजे  मला-
मी  जिथे  बसेल  त्यातिथून  चांदणे  मला  दिसायला  हवे

आय हाय..क्या बात है! कातिल !

काय  साधणार  ते  कुलूप? या  घरामधे  रहायचा  कवी
आत  केवढेतरी  भुयारही  असेल, ते  बुजायला  हवे
प्रिय मित्र ज्ञानेश,
१. अप्रतिम गझल केलीस. अभिनंदन!
२. वरील शेर रचतानाची मनस्थिती आठवून बघ. म्हणजे स्वतःला काय म्हणायचे आहे ते आधी स्पष्ट होईल.
३. माझ्यामते अर्थः - नुसते कुलूप लावून सांगताय की घर विकाऊ आहे आणि आतून अत्यंत सुंदर घर आहे? अरे, काढा ते कुलूप अन बघा, इथे पुर्वी एक कवी रहायचा. निश्चीत या घरात एक मोठ्ठे भुयार पडले असेल. ( कवी राहतो तेथे मुळात काहीही नसते उलट कवीची मनस्थिती पाहून जमीन दुभंगून किंवा जमिनीला छिद्र पडून एक भुयार निर्माण होऊ शकते, इतकी कवीची मनस्थिती तीव्रपणे भयाण असू शकते.)
४. मझा - बाळबोध शेर रचायला लागतात ते एका वेगळ्या कारणाने! ते कारण म्हणजे ते शेर सर्वसामान्यांना समजावेत. पण जे शेर किंवा ज्या गझला स्वतःलाच समाधान देतात त्याच्यात बाळबोध शेर रचण्याचे काहीही कारण नाही. पण मग त्या गझला किंवा ते शेर पब्लिश करण्याचेही कारण नसायला पाहिजे. एका शेरातून एकापेक्षा अधीक अर्थ निघत असतील तर उत्तमच! पण मुळात कवी हे सांगू शकला पाहिजे की त्याला काय अर्थ अभिप्रेत आहे.
५. आजकाल लोक तुझ्या गझलांची प्रिय मित्र प्रदीपच्या गझलांइतकीच वाट पाहतात हे सांगणे उचित ठरेल!
 
ज्ञानेशजी,
केवध्या बद्धीर होत चालल्यात जानीवा सुखामुले आता,
शल्य तोकदार  कोनतेतरी कुथेतरी रुतायला हवे.
सुरेख! सुचक  शब्दान्मुले गजल भावली.

परीस्थीतीची जानीव, किन्मत करुन देनारे शब्द,

ज्ञानेशजी,
'केवध्या बधीर होत चालल्यात जानीवा आता,
शल्य तोकदार कोनतेतरी ,कुथेतरी  रुतायला हवे.
' सुरेख !परीस्थीतीची जानीव करुन देनारे शब्द.'

ज्ञानेशजी,
'केवध्या बधीर होत चालल्यात जानीवा आता,
शल्य तोकदार कोनतेतरी ,कुथेतरी  रुतायला हवे.
' सुरेख !परीस्थीतीची जानीव करुन देनारे शब्द.'

काय  साधणार  ते  कुलूप? या  घरामधे  रहायचा  कवी
आत  केवढेतरी  भुयारही  असेल, ते  बुजायला  हवे !
अफलातून....
स्नेह  केवढा  मनात  यास  फारसे  महत्व  राहिले  कुठे..
'स्नेह  केवढा!' असे  समोरच्यास  फक्त  भास  व्हायला  हवे.
फार छान शब्दयोजना.... आवडला..
शेवटी  गुपीत  ते तुझे  तसेच  राहणार  यापुढे  सदा,
जे  विचारताच  तू  म्हणायचीस- "तूच  ओळखायला  हवे"
सुंदर....

ज्ञानेश,
आवडली गझल.

शेवटी  गुपीत  ते तुझे  तसेच  राहणार  यापुढे  सदा,
जे  विचारताच  तू  म्हणायचीस- "तूच  ओळखायला  हवे"

मी  तुला  म्हणायचो  'असे  करू  नको, तसे  करू  नको' जणू-
घाट  बोलतो  नदीस, 'पायरी  बघून  तू  वहायला  हवे.'

भेट आपली  पुन्हा  घडेल  ना  घडेल, ती  नकोच  काळजी
हे  ऋणानुबंध  नेहमी  तुला  असेच  आठवायला  हवे...
वा! तशी सगळीच गझल आवडली, हे तीन शेर जरा जास्तच आवडले!
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

भेट आपली पुन्हा घडेल ना घडेल, ती नकोच काळजी
हे ऋणानुबंध नेहमी तुला असेच आठवायला हवे... CHANCH

खुप छान. खुप आवडली.

थांबले असेल दु:ख एकटे घरी, मला निघायला हवे..

दु:ख कोठलेतरी छतामधून सारखे गळायला हवे...

या घरातही जुन्या घरातली तशीच सोय पाहिजे मला-
मी जिथे बसेल त्यातिथून चांदणे मला दिसायला हवे

घाट बोलतो नदीस, 'पायरी बघून तू वहायला हवे.'

अप्रतिमेस्ट!!!

चुलीचुलीत अन्न रोजचे शिजायला हवे..???????

देश चालला किती पुढे ! फुगीर आकडे नकाच दाखवू
फक्त येथल्या चुलीचुलीत अन्न रोजचे शिजायला हवे..

शेर आवडला !
एकूण गझल छान....!