आपुलिया बळें-५
आपापले क्लब स्थापून हे काम होणार आहे काय? आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो पाहिके. आम्ही त्यांच्या सुखदु:खाचे शब्द झालो पाहिजे. मराठी जनता मराठी कवींहून मोठी आहे. जनताच कवीला अमर करते. कवीचे मोठेपण समीक्षेवर नव्हे तर त्याच्यावर प्रेम करण्याऱ्या, त्याला आपलाच मानणाऱ्या, सामान्य लोकांवर अवलंबून असते, ही गोष्ट मराठी लोकांनी कधी विसरू नये. ' जे कधीच कुणाचेही नव्हते, नाहीत' अशांच्या टोळीबाज बैठकीत तात्पुरती मानमान्यता मिळवण्यासाठी आअण जगायचे किंवा लिहायचे काय? ' हा प्रश्न प्रत्येक कवीने आता तरी स्वतःला विचारला पाहिजे.
तुकाराम महाराज असोत, की केशवसुत असोत, कंगाल व भणंग कवींनीच मराठी कवितेला सूर्याचे तेज दिलेले आहे! बहिष्कृत ज्ञानेश्वरांची कहाणी कुणाला ठाऊक नाही? आणि गोविंदाग्रज तर बोलून चालून मास्तर होते. त्यांची एखादी साहित्यसंस्था होती काय? ते कुठे प्रोफेसर, हेड ऑफ द डिपार्टमेंट किंवा रसिक अभिजन होते?
ज्या अर्थी प्रत्येक मराठी माणसाच्या छातीत जिवंत हृदय आहे, त्या अर्थी प्रत्येक मराठी माणूस हा जन्मजात रसिक असतोच. पण दु:खाची आणि शरमेची गोष्ट अशी की मराठी माणसाच्या रसिकतेला जागवणारे सशक्त आणि अस्सल शब्द आमच्याजवळ नाहीत. एरव्ही ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांना समजून घेऊ शकणारा मराठी माणूस हल्लीच्या उत्फूर्त आणि विशेष म्हण्जे 'नैसर्गिक' मराठी कवितेचा स्वीकार का बरे करत नाही? मराठी माणूस खडूस व कंजूष आहे, म्हणून मराठी काव्यसंग्रह खपत नाहीत काय?
तेव्हा आता तरी नव्या निदान नव्या दमाच्या कवींनी विचार करावा आणि शेवटी मराठी कविता तिच्या खऱ्या धन्याला मिळावी . म्हणजे ती आम मराठी जनतेची व्हावी,म्हणून मी या प्रस्तावनेच्या निमित्ताने माझे हे म्हणणे मांडत आहे. मला येथे या काव्यसंग्रहाविषयी विशेष लिहिण्याची गरज नाही कारण ते माझे काम नाही. 'खरी कविता म्हणजे काय'? असा प्रश्न मला अनेकांनी विचारलेला आहे. मला असे वाटते की जी छातीत मारलेल्या भाल्यासारखी आरपार घुसते किंवा जिची अक्षरश: विशिष्ट नशा चढते आणि मग ती नशा लवकर उतरत नाही,तीच खरी कविता! खोटी कविता तर फुलांच्या हारांनी सजवलेल्या निर्जीव प्रेतासारखी असते. मोठ्यामोठ्यांनी खांदा दिला तरी सुद्धा ती जिवंत होत नसते!
म्हणूनच आज मराठी कवितेला मराठी माणसांची आवश्यकता आहे, कारण ही माणसे आहेत, म्हणूनच कविता आहे. महाराष्ट्राला माणसांच्या कवितेची गरज आहे आणि 'झाडे' किंवा 'पाखरां'पेक्षा मराठी माणसे निश्चितच अधिक महत्त्वाची आहेत. झाडे बेकार होत नसतात! पाखरांसमोर महागाईचा प्रश्न नसतो. एखाद्या जातीय दंग्यात भर रस्त्यावर एखादे झाडे कापले गेल्याचे एकही उदाहरण ऐकिवात नाही. ज्यांना सत्य सोसवत नाही किंवा परवडत नाही, तेच इसम साधारणपणे अशा अधांतरी निसर्गकविता लिहितात.निसर्गाचा विचारच करू नये, असेही माझे म्हणणे नाही. पण आपल्या
महाराष्ट्रात आता तरी आपण सर्वांनी मराठी माणसांच्या दुःखांचा व
स्वप्नांचा विचार करायला नको काय?