आपुलिया बळें- ४

    माझ्या झंझावात नामक काव्यसंग्रहात माझ्या पूर्वीच्या काव्यसंग्रहात समाविष्ट नसलेल्या काही काव्यरचना आहेत. मी यापैकी काही काव्यरचना आधीच्या काव्यसंग्रहात समाविष्ट करायला चक्क विसरून गेलो होतो तर काही रचना मला नुकत्याच सापडल्या!
    कवी म्हणून मी कसा उलगडत गेलो, घडत गेलो हे वाचकांना कळावे म्हणूंच मी काव्यसंग्रहात माझ्या पूर्वीच्या त्या रचनांचा समावेश केलेला आहे.

    कविता आकाशातून खाली पडत नसते आणि कोणताही कवी एखाद्या ईश्वरी अवतारासारखा एकदम कवी म्हणून जन्मत नसतो. खरे तर, कविता कवीच्या मनात आधीच मुरत असते. पण जेव्हा कवी तिला गुदमरवून टाकणारे अनावश्यक शब्द बाजूला काढून ठेवतो, तेव्हा कविता खऱ्या अर्थाने दिसू लागते- जन्मास येते. पण कविता जन्मण्याची ही प्रक्रिया आधीपासूनच सुरु झालेली असते. कधी कमी काळ लागतो तर कधी जास्त काळ लागतो एवढेच!

    कवी तर स्वतःचे जीवन आणि भोवतीची दुनिया किंवा समाज यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून वाटचाल करणारा मुसाफिर असतो!
    कवीचे जगणे आणि  लिहिणे ही कधीही वेगवेगळी खाती नसतात. जगण्यापासून कवितेला दूर ठेवता येत नसते आणि कवितेतून जगणे वगळता येत नाही. कवी आणि त्याची कविता यांचा स्वतंत्र विचार करणे म्हणजेच अभिजात प्रतारणा होय. जेव्हा जगणे आणि लिहिणे एकजीव होतात,तेव्हाच कबीर व तुकाराम जन्मतात, म्हणून जे कधी घडलेच नाही किंवा जे नाहीच, ते लिहिण्याचा खोटेपणा करू नये, असे माझे स्वतःचे मत आहे.

    ठरवून लिहू नये, तर रागवले नाहीच तरच लिहावे. काही विशिष्ट 'नैसर्गिक' कार्यप्रसंगी कुंथल्यामुळे 'मोकळे मोकळे' वाटत असेल तरीसुद्धा कुंथूनकंथून कविता लिहू नये.
    सत्य व साधी भाषा म्हणजेच कवितेची शक्ती आणि सौंदर्य असते. अगडबंब शब्द किंवा अंधुकपणा म्हणजे कवितेचे अपयश असते. जो कवी थांबू शकत नाही कविता चालूही शकत नाही. बोभाटा म्हणजे कीर्ती नव्हे आणि अढळ स्थानही नव्हे. याच संदर्भात मला माझाच एक शेर आठवत आहे, तो असा:
    चालण्याची नको एवढी कौतुके
    थांबणेही अघोरी कला, यार हो!
    मराठी कविता ही सर्व मराठी माणसांची मालमत्ता बनली पाहिजे. 'धन्याचा माल' धन्याच्या घरी पोहोचता झाला पाहिजे. जेव्हा हे घडेल, तेव्हाच मराठी कविता मराठी होईल. माध्यमे बळकावून बसलेल्या मूठभर लोकांना मी मराठी साहित्य आणि संस्कृतीचे प्रतिनिधी मानत नाही. फार तर त्यांनी स्वतःच स्वतःला पंख्याने वारा घालत बसावे!  पण माझ्यासमोर फक्त ध्येय आहे की, आता मराठी कविता मराठी माणसांची झाली पाहिजे.