एवढीही आठवण येऊ नये




एवढीही आठवण येऊ नये
एवढे कोणामधे गुंतू नये

हा कसा संवाद आहे चालला
की कुणी ऐकू नये, बोलू नये

जन्मण्याआधीच भंगावी कॄती
एवढे शिल्पास या कोरू नये

थांबलो आपण कुणासाठी कधी
आपल्यासाठी कुणी थांबू नये

-- अनंत ढवळे


प्रतिसाद

प्रिय

प्रिय मित्र अनंत,
तत्वज्ञान, जीवनाची अनुभुती, जीवन दर्शन, जीवनाचे चित्रण गझलेत असावे असा आग्रह धरणारे आपण! आपल्या या गझलेत हे सर्व आहे. पण आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत.
१. अनेक वर्षे गझल लेखन केल्यावर गझलकाराच्या विचारांमधे, मांडणीमधे येऊ शकणारा तोचतोचपणा टाळण्यासाठी गझलकाराने काय करावे?
२. आपल्यादृष्टीने आशय कितपत पारदर्शक असावा?
३. आपल्यामते रचलेली गझल ही जर सादर करायची वेळ आली ( जिथे दर वेळेस रसिकांचा दर्जा वेगवेगळा असणार मात्र गझलकाराचा दर्जा तोच राहणार ) अशा वेळेस कोणच्या गझला सादर कराव्यात? जर आपण उच्च दर्जाच्या रसिकांना आवडतील अशा गझला सादर केल्यात तर कच्चे रसिक गझलप्रेमी होण्याची शक्यता मावळू शकते. आपण फक्त आपल्या दर्जाप्रमाणे गझला सादर केल्या तर ते काहींना आवडेल, काहींना नाही तर काहींना कळणारच नाही. आपण कच्च्या रसिकांना भावतील अशा गझला केल्या तर त्यात आपल्यामते आपण स्वतःला न्याय दिलेला नसणार. परत एकदा मुद्दा विचारात घ्यावात. मी असे म्हणत नाहीये की एकच माणूस वेगवेगळ्या दर्जाच्या गझला करू शकतो किंवा करू इच्छित असतो. मला असे म्हणायचे आहे की समोर कोणीही असले तर 'गझल' त्याला आवडावी यासाठी मुळात गझल कशी असली पाहिजे? मला असे वाटते की गझलकाराला जर आपली गझल जाहीर करायची असेल तर त्याने सामान्यातील सामान्य माणसाला आवडेल अशी रचना निर्माण करणे आवश्यक आहे. उदा:
आपले हे दोन शेरः
हा कसा संवाद आहे चालला
की कुणी ऐकू नये, बोलू नये


जन्मण्याआधीच भंगावी कॄती
एवढे शिल्पास या कोरू नये

याचा संदर्भ एखाद्याला लागलाच नाही तर?
हां! आता कुणी जर असे म्हणत असेल की त्याने मला फरक पडत नाही तर माझी या विधानाला तीव्र हरकत आहे. रचना जाहीर करण्याची आवश्यकताच काय मग? आपली आपण करावी अन आपली आपण एन्जॉय करावी.
आपण गैरसमज करून न घेता या प्रश्नांवर आपली मते सांगाल अशी आशा आहे.
 

नाही...

मला तर आहे तसाच शेर आवडला होता. कधी कधी आपण फार अर्थनिर्मितीने ओव्हरकॉन्शस होतो. कुठेतरी 'शिल्प'ही यायलाच हवे. 'शिल्पा'ला फिनिशिंग टचेस देतानाही एखादा कलावंत फार कोरत बसतो...कला भंगते... या शेराच्याही बाबतीत असे न व्हावे....गझल सुंदरच आहे...
प्रा. डॉ . संतोष कुलकर्णी, चैत्रबन , श्याम सोसायटी, येरमेनगरजवळ, उदगीर जि. लातूर ४१३ ५१७ दूरभाष : ०२३८५-२५८०४६ (नि) २५८७५६ (का) भ्रमणध्वनी ९४२२६५७८५०

वा!

गझल... सगळेच शेर.. फार आवडले!

उत्तम....

जन्मण्याआधीच भंगावी कॄती
एवढे शिल्पास या कोरू नये
उत्तम....

थांबलो आपण कुणासाठी कधी
आपल्यासाठी कुणी थांबू नये

छान...