कशी अंकुरावीत आता बियाणे?

कशी अंकुरावीत आता बियाणे?

भुईला दिली ओल नाही ढगाने
कशी अंकुरावीत आता बियाणे?

दशा लोंबतांना तिच्या लक्तरांच्या
कुणी का हसावे? कुबेराप्रमाणे

दगाबाज झाले तुझे शब्द सारे
अता हे फ़ुकाचे कशाला बहाणे?

निखारे विझूनी कशी राख झाली?
अता चेतवू मी मशाली कशाने?

तिजोरी कुणाची उधळतो कुणी तो
अमर्याद झाली तयांची दुकाने

गझल साथ देते न हा देह मित्रा
’अभय’ ते खरे जे मिळविले श्रमाने

गंगाधर मुटे

गझल: 

प्रतिसाद

मतल्यापासूनच काफियात गडबड आहे...
ही गझल नाही.

या प्रकाराला स्वरकाफिया म्हणतात असे ऐकले मी.
ते जर खरे असेल तर ही गझल आहेच.

दुरूस्ती.

गझल साथ देते न हा देह मित्रा
’अभय’ ते खरे जे मिळविले श्रमाने

या ऐवजी कृपया

नको रत्न मोती न पाचू हिरे ते
’अभय’ ते खरे जे मिळविले श्रमाने

असे वाचावे.

दशा लोंबतांना तिच्या लक्तरांच्या
कुणी का हसावे? कुबेराप्रमाणे

व्वा...क्या बात है!!

डॉ.कैलास

आशय आवडला. १, ३, ५, ६ हे शेर आवडले.

आधीचा मक्ताही चांगला आहेच.

धन्यवाद!

ऋत्विकजी, कैलासजी,बेफिकीरजी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

नमस्कार,
ग़ज़ल आवडली...
- ` ख़लिश ' / वि. घारपुरे / २८-०३-२०१०.

दगाबाज झाले तुझे शब्द सारे
अता हे फ़ुकाचे कशाला बहाणे?
हा शेर छान.

*** या प्रकाराला रदीफ नसलेली स्वरकाफिया असलेली गझल म्हणतात. या गझलेत रदीफ नाही. काही गझलेत रदीफ असूनही स्वरकाफिया असतो. इथे रदीफ नाही. त्यामुळे तंत्राच्या दृष्टीने पाहिले तर ही गझलच आहे.
....... आणि हो, ही लयीतही म्हणता येते.

"कशी अंकुरावीत आता बियाणे?" हे व्याकरण जमलं नाहीये..
"कशी अंकुरावीत आता बियाणी?" किंवा "कसे अंकुरावे आता बियाणे?" असायला हवं होतं

खलिशजी,अजयजी,
आभारी आहे.

कुबेराची द्विपदी चांगली.

आवडली. बियाणे आवडले.

केदारजी,प्रतापजी
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

.............................................
"कशी अंकुरावीत आता बियाणे?" हे व्याकरण जमलं नाहीये..
"कशी अंकुरावीत आता बियाणी?" किंवा "कसे अंकुरावे आता बियाणे?" असायला हवं होतं

कसे अंकुरावे अता ते बियाणे?

असेही करता येईल.

दगाबाज झाले तुझे शब्द सारे
अता हे फ़ुकाचे कशाला बहाणे?

तिजोरी कुणाची उधळतो कुणी तो
अमर्याद झाली तयांची दुकाने

नको रत्न मोती न पाचू हिरे ते
’अभय’ ते खरे जे मिळविले श्रमाने...(दुरुस्तीचा शेर)

या तीन शेरातील आशय आवडलाही अन मनाला भावलाही.

नको रत्न मोती न पाचू हिरे ते
’अभय’ ते खरे जे मिळविले श्रमाने

अप्रतिम!!!