इतके दव त्या रस्त्यावरती पडले होते...

==========================

इतके दव त्या रस्त्यावरती पडले होते...
नक्की तेथे रात्री कोणी रडले होते ! *

बर्‍याच वर्षानंतर भेटुन जाणवले की
बरेच काही मधल्या काळी घडले होते !

तिला मनाचे हिरमुसलेपण ऐकवले मी,
काही मिसरे फार तिला आवडले होते !

एक उन्हाची तिरीप रस्ता चुकली होती
बाकी आयुष्यात धुके बागडले होते..

काल कचेरीवरती मोर्चा गेला होता
बहिर्‍याच्या कानात मुके ओरडले होते !

त्या हातांची याद अताशा रोजच येते
ज्यांनी जगण्यालाच कधी पाखडले होते

कागद दिसला, तत्परतेने उमटुन गेले
पेनामधले शब्द किती अवघडले होते...!

--ज्ञानेश.
===========================

(* मतल्याची प्रेरणा- बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

गझल: 

प्रतिसाद

सर्व शेर उत्तम! उत्तम गझल! (एकदम 'ज्ञानेशपेक्षाही चांगली इष्टाईल')

व्वा!

धन्यवाद अशी गझल प्रकाशित केल्याबद्दल! (हे मात्र काही बरोबर नाही. ऐकवायचे एक अन प्रकाशित तिसरेच करायचे, हे अगदी 'वैभव इष्टाईल'!)

तुमची 'सुचण्याची प्रक्रिया' एकदा जाणून घ्यायची इच्छा आहे राव!

व्वा!

काही मिसरे फार तिला आवडले होते - वा वा वा वा! काय बोललात राव!

बशर साहेबांच्या इष्टाईलचा खरे तर हा शेर वाटतोय! वा वा वा!

सुरेख गझल आवडली.
सोनाली

अनुस्वारांना तिलांजली का देता?

१. व'र्षा'नंतर

२. बहि'र्‍यां'च्या

दुसरा वगळता प्रत्येक शेर आवडला. एकंदर गझल मस्त! दुसरा शेर तुलनात्मकरित्या सामान्य/कमकुवत वाटला.

वाह जनाब....बहोत खुब....संपूर्ण ग़ज़ल आणी तिचा अंदाज़-ए-बयाँ आवडला....पण संदर्भ/विचारवस्तु /आशय छान असावेत......जे आहेतच....
एवढेच म्हणेन.....
" वो सुबहका अह्सान है या मेरी कशिश हो ...
डूबा हुवा खु़रशिद सर-ए-गा़म तो आया....
लोभ असावा...
` ख़लिश '- वि. घारपुरे/२९-०३-२०१०.

मस्त गझल.
सर्वच शेर सुंदर..!!

व्वा....उत्तम गझल....नाहीतरी असली रचना बरेच दिवस ड्यु होति.

डॉ.कैलास

काल कचेरीवरती मोर्चा गेला होता
बहिर्‍याच्या कानात मुके ओरडले होते !

वाव्वा! खूप मस्त.


तिला मनाचे हिरमुसलेपण ऐकवले मी,
काही मिसरे फार तिला आवडले होते !

वाव्वा! क्या बात है.

एकंदर उत्तम. मस्त झाली आहे गझल.

तिला मनाचे हिरमुसलेपण ऐकवले मी,
काही मिसरे फार तिला आवडले होते

दोन्ही मिसर्‍यातला ''तिला'' जरा खटकला.

डॉ.कैलास

मोर्चाचा शेर दणकेबाजच आहे... सही
मक्ताही अतिशय मस्त
-मानस६

तिला मनाचे हिरमुसलेपण ऐकवले मी,
काही मिसरे फार तिला आवडले होते !

एक उन्हाची तिरीप रस्ता चुकली होती
बाकी आयुष्यात धुके बागडले होते..

काल कचेरीवरती मोर्चा गेला होता
बहिर्‍याच्या कानात मुके ओरडले होते !

काय अप्रतिम गझल आहे!
तुमच्या गझला इतक्या ओघवत्या आणि इतक्या आशयसंपन्न असतात की...
वाह! क्या बात है!

अहा........ अप्रतिम गझल !!
प्रत्येक शेर अगदी मनापासून आवडला.
खरंच....तुमच्या गझलांची आता नकळत वाट बघते मी :)

उत्तम गझल! मिसरे अतिशय खास!!!!!!!!

काही मिसरे फार 'तिलाही' आवडले होते... केले तर..?

एक उन्हाची तिरीप रस्ता चुकली होती
बाकी आयुष्यात धुके बागडले होते..
व्वा... दाद देणे विसरून गेलो बॉस

काल कचेरीवरती मोर्चा गेला होता
बहिर्‍याच्या कानात मुके ओरडले होते !
मस्तच...

त्या हातांची याद अताशा रोजच येते
ज्यांनी जगण्यालाच कधी पाखडले होते
मस्तच पुन्हा... अच्छा है...अच्छा है...:)

१ आणि ५ सोडून बाकी आवडले.
एक उन्हाची तिरीप रस्ता चुकली होती
बाकी आयुष्यात धुके बागडले होते..

हे जरा आणखी स्पष्ट व्हायला हवे असे वाटते.

बाकी 'गा गा' मध्ये लिहिणे आणि वाचणे दोन्हीला मजा येते...:)

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार !

खूपच मस्त ज्ञानेश !!!

संपूर्ण गझल सुंदर झाली आहे. धन्यवाद अशी रचना वाचायला दिल्याबद्दल.

खूप खूप शुभेच्छा

उत्तम गझल !

क्याअ बात है ज्ञानेश..........सिम्पली मार डाला!!!!

मला खालील शेर अधिक आवडले.

काल कचेरीवरती मोर्चा गेला होता
बहिर्‍याच्या कानात मुके ओरडले होते !

कागद दिसला, तत्परतेने उमटुन गेले
पेनामधले शब्द किती अवघडले होते...!

तुमच्या रचना खरोखरच उत्कृष्ट असतात. वाचताना फार मजा येते.
असेच उत्तम लिहित रहा.
शुभेच्छा!
-------------------------------------नचिकेत भिंगार्डे

खुप आवडली. पाखडले आवडले.

उत्तम गझल!. खूप आवडली.

वा ज्ञानेश!
पेन आणि मोर्चा खास...पुन्हा पुन्हा वाचतो आहे.

वा वा! गझल फार आवडली! मिसरे आणि मुके हे शेर विशेष.

व्वा मस्तच सर्वांगसुंदर गझल पूर्ण गझल आवडली...

सर्वच शेर उत्तम आहेत... त्यातही 'मिसरे' अजून खूप आवडला

इतके दव त्या रस्त्यावरती पडले होते...
नक्की तेथे रात्री कोणी रडले होते !

तिला मनाचे हिरमुसलेपण ऐकवले मी,
काही मिसरे तिला फार आवडले होते !

काल कचेरीवरती मोर्चा गेला होता
बहिर्‍याच्या कानात मुके ओरडले होते !

सुंदर...
अतिशय सुंदर...
साधी रचना...
पण मनात घर करणारी...

ज्ञानेश,

खूप छान.
हिरमुसलेपण....
वा !

खूप छान ज्ञानेश!!
सुरेख गझल!

आवडलेले शेर :

एक उन्हाची तिरीप रस्ता चुकली होती
बाकी आयुष्यात धुके बागडले होते..

त्या हातांची याद अताशा रोजच येते
ज्यांनी जगण्यालाच कधी पाखडले होते

गझल सुरेखच!

काल कचेरीवरती मोर्चा गेला होता
बहिर्‍याच्या कानात मुके ओरडले होते !

कागद दिसला, तत्परतेने उमटुन गेले
पेनामधले शब्द किती अवघडले होते...!

फारच उत्तम शेर....

मतल्याच्या प्रेरणेचा उल्लेख केला हे आवडले.

ज्ञानेशराव... as usual... अप्रतिम गझल... :-)

अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!

औरंगाबादला असताना बशर साहेबांकडून ही पूर्ण गझल ऐकली होती. ती आठवण ताजी केल्याबद्दल धन्यवाद....

इतके दव त्या रस्त्यावरती पडले होते...
नक्की तेथे रात्री कोणी रडले होते ! *

बर्‍याच वर्षानंतर भेटुन जाणवले की
बरेच काही मधल्या काळी घडले होते !

तिला मनाचे हिरमुसलेपण ऐकवले मी,
काही मिसरे फार तिला आवडले होते !

एक उन्हाची तिरीप रस्ता चुकली होती
बाकी आयुष्यात धुके बागडले होते..

त्या हातांची याद अताशा रोजच येते
ज्यांनी जगण्यालाच कधी पाखडले होते

कागद दिसला, तत्परतेने उमटुन गेले
पेनामधले शब्द किती अवघडले होते...!

सगळेच शेर खणखणीत आहेत....

एक उन्हाची तिरीप रस्ता चुकली होती
बाकी आयुष्यात धुके बागडले होते..

क्या बात है !३!

सर्वच प्रतिसादींचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.
असाच लोभ असू द्यावा !

धन्यवाद.