पुन्हा सत्य स्वप्नांस तुडवून गेले

************************
************************

पुन्हा सत्य स्वप्नांस तुडवून गेले
जगाया मला बाध्य करवून गेले

काळजास देतो भरोसा तरीही
असो..व्ह्यायचे तेच होऊन गेले

कशाला धरावा जगाशी अबोला
तिचे ओठ जर नियम टाळून गेले

जिथे यायची ती कधी भर दुपारी
तिथे आज अंधार बिलगून गेले

झगे सात्विकांचे, मलमली बिछाने
कसे पाप पुण्ण्यांत मिसळून गेले

तु माझा विसावा तुच वसंत आहे
ऋतुंना किती कोण फसवून गेले

मलाही कळेना जगावे कशाशी
दिलासे कधीचेच सोडून गेले

करावी न तक्रार 'मैत्रेय' आता
तसे लाड सारेच पुरवून गेले

*************************
*************************

www.maitreyaa.wordpress.com

गझल: 

प्रतिसाद

दोन द्विपदी जराशा बदल्यायत. एडीट करायची सोय नसल्याने विश्वस्तांनी कृपया एव्हढा बदल करावा ही विनंती.
सस्नेह : गिरीश
************************

कशाला धरावा जगाशी अबोला
तिचे ओठ जर नियम टाळून गेले

जिथे यायची ती कधी भर दुपारी
तिथे आज अंधार बिलगून गेले

*************************

मलाही कळेना जगावे कशाशी
दिलासे कधीचेच सोडून गेले
हा शेर छानच.
तु चे मात्र पहा.

जिथे यायची ती कधी भर दुपारी
तिथे आज अंधार बिलगून गेले

ह्यातील विचार (नेहेमीचाच असूनही) चांगल्या लहज्यात आला आहे. विशेषतः पहिल्या ओळीत. आपण हळूहळू वृत्तात येत आहात हे पाहून आनंद झाला.

ह्या गझलेतही वृत्तात बरेच ठिकाणी गडबड आहे पण मी नमूद केलेल्या ओळीनुसार सगळ्या ओळी करून बघा . ती स्वच्छ ओळ आहे .

शुभेच्छा

अजय - वैभव : आपले मनःपुर्वक आभार !!!
वैभव : आपल उत्तेजन खुप काळ स्मरणात राहील... काही बदल करुन रचना रिवाईज केलीय्..इथे एडीट करायची सोय नसल्याने याबरोबर खाली देतोय...

************************
************************

पुन्हा सत्य स्वप्नांस तुडवून गेले
जगाया मला बाध्य करवून गेले

जिथे यायची ती कधी भर दुपारी
तिथे आज अंधार बिलगून गेले

झगे सात्विकांचे, मलमली बिछाने
कसे पाप पुण्ण्यांस चिथवून गेले

अरे या वसंता कसे ते कळावे
ऋतुंना किती कोण चकवून गेले

मलाही कळेना जगावे कसे ते
किती औषधे लोक सुचवून गेले

असे वाटले काळ निसटून गेला
दिलासे तुझे न्याय करवून गेले

करावी न तक्रार 'मैत्रेय' आता
तसे थेर सारेच पुरवून गेले

*************************
*************************

व्वा....आताची रचना अजून सहज अन दोषमुक्त झालिये......

डॉ.कैलास

मलाही कळेना जगावे कसे ते
किती औषधे लोक सुचवून गेले

छान!

औषध आणि अंधार वाले दोन शेर आवडले.

अंधार आणि औषधे सुंदर!
मतल्यातला 'करवून' थोडासा खटकला.....प्रयोजक वापरल्यामुळे सत्य तिसर्‍याच कोणाकडून तरी बाध्य करवून गेले असा अर्थ निघतो!

उत्तम आशय असलेल्या काही 'द्विपदी'! अभिनंदन! विश्वस्तांनी क्षमा करून टाकली याबद्दलही अभिनंदन!

मी एक मते 'ठोकणारा' माणूस आहे. पण प्रामाणिकपणे सांगतो की आपण उत्तम गझल कराल.

धन्यवाद!

कशाला तुका, माउली, मीर वाचा
स्वत:ला स्वतः जाणले.......... बास झाले

-'बेफिकीर'!

अंधार खासच!

दिलासे चा शेर आवडला.

आवडली.