शांततेने चालुदे

मोह, पापे, लोभ, हेवा, शांततेने चालुदे
ईश्वरा इंद्रीय-सेवा शांततेने चालुदे

ठेवतो पेढे, फुटाणे, वाकतो दगडापुढे
मीच म्हणतो खात मेवा, शांततेने चालुदे

जन्म जाळ्यातील माशासारखा केलास तू
शांततेने संपुदे वा शांततेने चालुदे

पाहिजे तर लाद पुरुषावर अता गर्भारपण
स्त्री नको धाडूस देवा.... शांततेने चालुदे

जीवनाचा अर्थ माझे श्राद्ध केल्यावर कळे
कावळ्यांनो मस्त जेवा, शांततेने चालुदे

'बेफिकिर' आला कुणी, घाईत गंगा पाजली
यार येथे मद्य ठेवा, शांततेने चालुदे

सूट - तिसर्‍या शेरात काफिया दोन शब्दांत विभागला आहे. अशी उदाहरणे आहेत.

गझल: 

प्रतिसाद

ठेवतो पेढे, फुटाणे, वाकतो दगडापुढे
मीच म्हणतो खात मेवा, शांततेने चालुदे

हा आवडला.

जन्म जाळ्यातील माशासारखा केलास तू
शांततेने संपुदे वा शांततेने चालुदे

जाळ्यातल्या तडफडणा-या माशाची उपमा दिल्यावर 'शांततेने चालुदे' हे जरा विसंगत वाटतं.

ऋत्विक,
आपले म्हणणे मान्य आहे. रदीफ त्या शेरात बसत नाही व्यवस्थित! धन्यवाद!

आधी मी त्या शेरावर खालील पर्याय लिहिलेले होते.

टाळणे, दुर्लक्ष करणे, पाहणे व़ळुनी पुन्हा
शांततेने संपुदे वा शांततेने चालुदे

ताण जगण्याचा इथे अन ताण मरण्याचा इथे
शांततेने संपुदे वा शांततेने चालुदे

जन्म जाळ्यातील माशासारखा केलास तू
शांततेने संपुदे वा शांततेने चालुदे
मला या ओळींमध्ये विसंगती वाटली नाही. फक्त जन्म या शब्दाबरोबर मरण असा उल्लेख हवा होता का असे वाटले. मी घेतलेला अर्थ...
जन्म तडफडणार्‍या माशाप्रमाणे होता, मरण तरी शांततेने येऊ देत.
हे सोडले तरी गझल काही खास नाही.

धन्यवाद अजय.