आसवे

आज नयनी पुन्हा जागली आसवे
भंगली शांतता वाजली आसवे

लोक जातात नयनांवरी कोरड्या
हाय दिसती कुठे आतली आसवे

तू जरी धाडले शुद्ध हासू मला
पोचता पोचता जाहली आसवे

आठवांच्या तुझ्या या वरातीमधे
वेदना प्राशुनी नाचली आसवे

जाहलो मी अता आसवांची कबर
मी मला खोडुनी गाडली आसवे

ही गझलही नसे ही नसे गीतही
फक्त मी तुजपुढे ढाळली आसवे

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

आठवांच्या तुझ्या या वरातीमधेवेदना प्राशुनी नाचली आसवे
कलोअ चूभूद्याघ्या

अप्रतिम

वाजली आसवे आणि गाडली आसवे जबरदस्त कल्पना.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.....

तिसरा शेर आवडला. मतल्यातील दोन ओळींचे कनेक्शन लक्षात आले नाही. याही गझलेत 'कबर' आली आहे. बाकीचे शेर सरळ वाटले. माफ करा.

ही गझल विशवस्तांनी लिहिली आहे का?
ही गझलही नसे ही नसे गीतही
फक्त मी तुजपुढे ढाळली आसवे
हे छान.

काही तांत्रिक कारणांमुळे वैभव देशमुख ह्यांचे नाव दिसत नाही आहे.