अभ्यास


आता मला गवसला आभास आसवांचा
दडपून ठेविला मी जो श्वास आसवांचा


मज कोडग्या मनाने जगणे पसंत नाही
वाटे हवाहवासा मज त्रास आसवांचा


रेखाटतो सुखाची मी रंगहीन चित्रे
डोळ्यांत रंग भडके सर्रास आसवांचा


पत्रात भेटल्या मज फिक्कट अबोल ओळी
ताजाकलम असावा त्या खास आसवांचा


एकादशीस विठ्ठल आला घरात माझ्या
मी सोडला कधीचा उपवास आसवांचा


जगण्यास जे परीक्षा संबोधतात त्यांनी
केला कधी पुरेसा अभ्यास आसवांचा?गझल: 

प्रतिसाद

जगण्यास जे परीक्षा संबोधतात त्यांनी
केला कधी पुरेसा अभ्यास आसवांचा?
 
अप्रतिम शेर..

मज कोडग्या मनाने जगणे पसंत नाही
वाटे हवाहवासा मज त्रास आसवांचा
वाव्वा! मज कोरडेपणाने जगणे पसंत नाही असेही वाचले.
रेखाटतो सुखाची मी रंगहीन चित्रे
डोळ्यांत रंग भडके सर्रास आसवांचा
वा! काफिया छान आला आहे.
पत्रात भेटल्या मज फिक्कट अबोल ओळी
ताजाकलम असावा त्या खास आसवांचा
वाव्वा! सुंदर.  'मज फिक्कट अबोल' मुळे वरच्या ओळींचा प्रवाहीपणा कमी होतो आहे.

मक्ता प्रथमदर्शनी आवडला. पण नंतर विचार केला की आसवे जगण्यापासून वेगळी नाहीत. म्हणजे विरोधाभास चपखल नाही. पण दोन्ही ओळी फार छान आहेत. त्यापूर्वीचा शेरही प्रथमदर्शनी आवडला. पण एकादशीचा, विठ्ठलाचा आणिआसवांचा मला संदर्भ लागला नाही. पण एकंदर दोन्ही ओळी तशा परिणामकारक आहेत.

अर्थात असेही असू शकते की मला वरील शेर बिलकुल कळलेले नाहीत. गझल एकंदर छानच! थोडी घाईत टाकल्यासारखी वाटली.

मस्त गझल. आसवांचा वावर आणि वापरही अत्यंत परिणामकारक!
गझल बेहद्द आवडली.
कांही सुचले ते असे -
पत्रात भेटल्या मज फिक्कट अबोल ओळी
ताजाकलम असावा त्या खास आसवांचा
- जागी -
पत्रात खूप  करती गर्दी खुशाल वाक्ये /ओळी
ताजाकलम असावा आभास आसवांचा - कसे वाटेल?

बदल छान आहे नाना...
खरे तर तुम्ही लिहिलेला हा एक नवा अतिशय सुंदर शेरच आहे ज्याचा अर्थही भिन्न आहे!
'पत्रात खूप  करती गर्दी खुशाल वाक्ये /ओळी'
 इथे पत्रांच्या रूपाने माणसांचा कोरडेपणा छान प्रकट झाला आहे.
ताजाकलम असावा आभास आसवांचा
इथे प्रेमाची ओल असावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
तर मूळ शेरात 'मला असे पत्र भेटले की ज्यातील मजकूर धूसर/फिक्क्ट वाटला... अबोल मनाची व्यथा मांडल्यासारखे ते पत्र...
कदाचित त्या पत्रात आसवांचा असा खास ताजाकलम असावा..
म्हणून पत्रातील ओळी फिक्कट झाल्यात...आसवांनी तर त्या पुसून गेल्या नाहीत?? ' असा अर्थ आहे.
असो. नवा शेर आवडला :)
-आपला आभाळ :) 
 
 
 

छान ग़ज़ल.

मज कोडग्या मनाने जगणे पसंत नाही
वाटे हवाहवासा मज त्रास आसवांचा

सुंदर शेर. बहोत खूब.  टाळ्यांवर टाळ्या.

आपला,
(दु:खविलासी) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मज कोडग्या मनाने जगणे पसंत नाही
वाटे हवाहवासा मज त्रास आसवांचा
जगण्यास जे परीक्षा संबोधतात त्यांनी
केला कधी पुरेसा अभ्यास आसवांचा?
आभाळ....हे दोन्ही शेर खूपच आवडले...
वेगळ्या कल्पना...
वेगळे विचार...
वेगळे अन्त्ययमक...
.....त्रिवेणी-संगम !!!

छानच गझल आभाळा!!
-- पुलस्ति.

वा आभाळ,
रेखाटतो सुखाची मी रंगहीन चित्रे
डोळ्यांत रंग भडके सर्रास आसवांचा
- सुंदर!!!
मक्ताही अप्रतिम! ताजाकलमचा शेरही आवडला.
एकादशीस विठ्ठल आला घरात माझ्या
मी सोडला कधीचा उपवास आसवांचा
.. हा मात्र थोडा कळला/पटला नाही. देवासाठी उपवास केला तरी तो स्वखुशीनं केलेला असतो. मग त्याला 'उपवास आसवांचा' का म्हणायचं?  (कृपया वेगळा अर्थ असला तर सांगा!)
- कुमार

 

एकादशीस विठ्ठल आला घरात माझ्या
मी सोडला कधीचा उपवास आसवांचा
मजा आली!!!

वाटे हवाहवासा मज त्रास आसवांचा
जगण्यास जे परीक्षा संबोधतात त्यांनी
केला कधी पुरेसा अभ्यास आसवांचा?
वा!

गझल छान झाली आहे. काही शेर विशेष आवडले. विशेषतः
मज कोडग्या मनाने जगणे पसंत नाही
वाटे हवाहवासा मज त्रास आसवांचा

शेर मस्तच आहे. कोडग्या ऐवजी कोरड्या असे सुचवावेसे वाटते. कोरडे जगणे आणि आसवे असा थेट संबंध दिसल्यास उत्तमच.
पत्रात भेटल्या मज फिक्कट अबोल ओळी
ताजाकलम असावा त्या खास आसवांचा

हाही शेर छानच आहे. 'मज' मुळे निर्माण झालेला गतिरोधक 'भेटलेल्या' किंवा तत्सम पर्यायी शब्दयोजनेमुळे हटवता येईल, असे वाटते.
मतल्यात आणि शेवटच्या शेरात दोन मिसर्‍यांमधील परस्परसंबंध नीटसा स्पष्ट होत नाही, असे वाटले. एकादशीचा शेर कळला नाही. विनोद समजावून सांगावा लागणे, हे जसे विनोदाचे अपयश आहे, तसेच एखादा शेर ठराविक कालमर्यादेपलीकडे विचाराधीन राहणे, हे त्या शेराचे अंमळ अपयशच म्हणावेसे वाटू लागते.