कुपी

वाट आहे पाहतो मी फक्त एका उत्तराची
भावनांना कैद आहे रोखलेल्या आसवांची

यापरी होती बरी उबदार सूर्याची दशा
सोसवेना धग अताशा कोवळ्या या चांदण्याची

एकही सौदा अता जमणार नाही सावल्यांशी
सवयही होतेच आहे मोकळ्या उघड्या उन्हाची

वाटते चिंता तुझ्या त्या रम्य एकाकी घराची
नेम धरुनी सज्ज आहे नजर तिरकी वारियाची

आठवांचा गंध आहे दरवळाया लागलेला
सांडली नकळत कुपी का अंतरीच्य़ा अत्तराची ?

गझल: 

प्रतिसाद

आठवांचा गंध आहे दरवळाया लागलेला
सांडली नकळत कुपी का अंतरीच्य़ा अत्तराची?

छान आहे हा शेर!
दुसरा शेर पुन्हा तपासावा. पहिल्या ओळीत गडबड वाटते आहे.

एकही सौदा अता जमणार नाही सावल्यांशी
सवयही होतेच आहे मोकळ्या उघड्या उन्हाची

वा! चांगला शेर! फार आवडला.

आठवांचा गंध आहे दरवळाया लागलेला
सांडली नकळत कुपी का अंतरीच्य़ा अत्तराची ?

वा!

एकंदर गझल छान झाली आहे. यापरी होती बरी उबदार सूर्याची दशा ह्या ओळीत चुकून एक गुरू कमी राहिला असावा.

गझल आवडली. कुपी सुरेखच!

(रात्रीचा प्रतिसाद)

खालील ओळी खूप आवडल्या.

वाट आहे पाहतो मी फक्त एका उत्तराची

एकही सौदा अता जमणार नाही सावल्यांशी
सवयही होतेच आहे मोकळ्या उघड्या उन्हाची

वाटते चिंता तुझ्या त्या रम्य एकाकी घराची

कुपी दरवळण्यावरून भटसाहेबांची एक द्विपदी आठवली.

येताच तू समोरी मी दरवळून जाते
माझ्यासमान तूही गंधाळतोस का रे?

मस्त रे !

आवडली गझल...!

-दिलीप बिरुटे

खर खुप छान गझल आहे...!!!
शुभेछा