मनाला

धरू कसे बेबंद मनाला?
नकोच होते पंख मनाला!

इथे-तिथे फिरते, भरकटते
कसा नसे निर्बंध मनाला?

दिले तुझ्या प्राजक्तफुलांनी
नव्या ऋतूचे रंग मनाला

सळाळणा-या रात्रनागिणी,
अन् स्मरणांचे दंश मनाला

तिथे तुझी लाटांवर होडी,
इथे छळे आतंक मनाला

कसे, कधी तू सांग वाचले
खळाळत्या स्वच्छंद मनाला?

अजून छळती कधीकाळच्या
जुन्या चुकांचे डंख मनाला

खुणावती वाटा परतीच्या,
अता करू नि:संग मनाला!

गझल: 

प्रतिसाद

गझल सुरेख व नादमय झाली आहे. मराठीत 'अ'कारान्त स्वरकाफिया वापरू नये असे एक मत आहे. पण आपण अनुस्वारापुढे प्रत्येक शेवटचे 'अ'कारान्त अक्षर घेतल्यामुळे नाद तोच राहतो. अशावेळेस ही सूट चालावी की काय असा एक विचार मनात आला.

-बेफिकीर!

सुंदर आणि सहजसुंदर दोन्हीही.

अजून छळती कधीकाळच्या
जुन्या चुकांचे डंख मनाला

छान

अशीच क्रांती, गझलेमधली
भुलवत राहो, दंग मनाला

आपला,
(काव्यप्रेमी) धोंडोपंत

डंख, स्वच्छंद मन वाचणे आणि रात्रनागिणी हा शब्द विशेष करून आवडले. गझल एकंदर छान आहे, मनाला भावली. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा.

वा! वा ! मस्त गझल
दिले तुझ्या प्राजक्तफुलांनी
नव्या ऋतूचे रंग मनाला

सळाळणा-या रात्रनागिणी,
अन् स्मरणांचे दंश मनाला
हे दोन शेर तर फारच आवडले.

सन्माननीय धोंडोपंत,

आपली ही मते! ('मिसळपाव' खाताना व 'स्वप्न' ही गझल वाचताना वाचलेली)

वृत्त हा गझलेचा आत्मा आहे. एक मात्रेची जरी चूक झाली तरी ती मोठी ऐब समजली जाते. (ऐब म्हणजे दोष) तेव्हा कृपया वृत्तामधील चूक कळवून आम्हाला उपकृत करावे ही विनंती.

निर्दोष वृत्तात गझल लिहिणे हे दादांकडून आम्हाला मिळालेले बाळकडू आहे. ( दादा= सुरेश भट)

भटसाहेबांनी 'अलामत'ही समजावून सांगीतली आहे. वरील 'गझलेत' जर 'खोच मनाला', 'जाळ मनाला', 'गूढ मनाला', 'पॅच मनाला', 'कौल मनाला', 'ढील मनाला', 'बॉल मनाला', 'टेक मनाला' वगैरे काफिया व रदीफ असते तर आपल्याला ते 'हरकत घेण्यायोग्य' नसते काय? की आपली मते काल-स्थल-सापेक्ष आहेत?

जर गझल बाराखडीप्रमाणे असली तर इतर मतप्रदर्शन व्हावे असे मी दणकून सांगतो. तुमचा वरील प्रतिसाद गझलकारांची दिशाभूल करणारा आहे.

-बेफिकीर!

रचना चांगली आहे. पण अकारान्त स्वरयमके असणाऱ्या रचनेला गझल म्हणता येणार नाही. गझलेत स्वरयमके तरी कशाला हवीत, असाही एक मतप्रवाह पुढे आल्यास नवल नाही.

सळाळणा-या रात्रनागिणी,
अन् स्मरणांचे दंश मनाला...

खुणावती वाटा परतीच्या,
अता करू नि:संग मनाला!..

हे फार आवडले...

शेवटी, ही स्वरयमकाची गझल आहे की नाही?

ही 'स्वरयमकाची' गझल नाही. ही 'तांत्रिकदृष्ट्या' कविता आहे व 'मंत्रदृष्ट्या' गझल ठरू शकावी असे 'मला' वाटते.

दिले तुझ्या प्राजक्तफुलांनी
नव्या ऋतूचे रंग मनाला
चान्ग्ली आहे गजल.

चित्तरंजन,
अकारान्त स्वरयमके असणाऱ्या रचनेला गझल म्हणता येणार नाही.
का ते स्पष्ट करावे. त्याचप्रमाणे असे कुठे लिहिले आहे का तेही सांगावे.

बेफिकीर,
भटसाहेबांनी 'अलामत'ही समजावून सांगीतली आहे.
गझलेच्या बाराखडीत स्वरयमकाबद्दल नेमके काय लिहिले आहे?

अजून छळती कधीकाळच्या
जुन्या चुकांचे डंख मनाला


खुणावती वाटा परतीच्या,
अता करू नि:संग मनाला!

मस्त..!

-दिलीप बिरुटे