सुखास आता तुझे नाव आहे

उरात आता नवा भाव आहे
सुखास आता तुझे नाव आहे

दिलास या तूच चोरून नेले
दिसायला तू जरी साव आहे

उगाच पत्ते बघू मी कशाला?
तुझ्याच हाती दिला डाव आहे

'लिना' घरी हाय! - पाटी 'रिना'ची
असा कसा हा तुझा गाव आहे?

कट्यार जर ती तुझ्या मालकीची
तयार मी सोसण्या घाव आहे

दिलात माझ्या असे खूप जागा
तुझ्या सहेलीसही वाव आहे!

------------------------------------------------
जयन्ता५२

गझल: 

प्रतिसाद

उगाच पत्ते बघू मी कशाला?
तुझ्याच हाती दिला डाव आहे
हे सुंदर आहे.

तुझ्याच हाती दिला डाव आहे ..व्वा!

शेवटचा शेर भलताच प्रेमळ.एकूण गझल आवडली.

अंहं...

जयंतराव, सॉरी.. अपेक्षाभंग केलात यावेळी!

लिना घरी हाय पाटी टिनाची

तुझ्या सहेलीसही वाव आहे

पु. ल. असते तर म्हणाले असते की 'कुटुंब बरेच वर्षांनी पहिल्यांदा माहेरी गेल्यावर सुचेल तशी गझल आहे'.

मी काहीच म्हणत नाही.

मनात माझ्या असे खूप काही
पुढ्यात सध्या वडापाव आहे

-बेफिकीर!

ज्ञानेश,
जयंतराव, सॉरी.. अपेक्षाभंग केलात यावेळी!

अपेक्षाभंग म्हणजे नक्की काय ते कळेल का?
जयन्ता५२

जयंतराव, तुमची गझल म्हटल्यावर काही अपेक्षा निर्माण होतात आपोआप, त्या पूर्ण झाल्या नाहीत या गझलेकडून असे म्हणायचे होते. मी चाहता आहे आपल्या गझल/कवितांचा.

कृपया गैरसमज नसावा.

उरात आता नवा भाव आहे
सुखास आता तुझे नाव आहे

पहिल्याच द्विपदीमधे 'आत्तापर्यंत सुखाला तुझे नाव नव्हते' हे कवीने छातीठोकपणे आपल्या कवितेतील प्रेयसीला सांगून तिला हतबुद्ध केलेले आहे. 'आता'च का असे झाले याची कुठलीही तर्कशास्त्रीय कारणमीमांसा कवितेत आवश्यक नाही या स्वातंत्र्याचा येथे नियोजनबद्ध वापर करण्यात कवी यशस्वी झालेला दिसतो. 'सुखास आता तुझे नाव आहे' ही ओळ आम्हाला आवडली. अत्यंत मधुर ओळ आहे. काही वेळा संपूर्ण द्विपदीच्या ऐवजी एकच ओळही मुशायर्‍यात भाव खाऊन जाते. या मतल्यातील दुसरी ओळ आम्हाला तशी वाटते. 'संसार मांडते मी' या गीतात आशा काळे च्या साजुक चेहर्‍यावर जसे 'आत्ताच सत्यनारायणाची पूजा घरात झाली' असे पवित्र भाव असतात तसा भाव या ओळीस आहे. यात कुठलाही उथळपणा नाही. ही परिपक्वतेतून आलेली कबुली आहे.

दिलास या तूच चोरून नेले
दिसायला तू जरी साव आहे

'दिलास' मधे 'स' आला की ओळीत तो परत येऊ नये असे गृहीत धरलेले दिसते. 'नेले'लाही 'स' लावायला प्रमाण मराठीची हरकत नाही. हां! ते वृत्तात बसणार नाही हा प्रश्न मात्र कवीचा आहे. आम्ही समोर आलेल्या पदार्थाची चव सांगु शकतो. 'हे कसे करायला हवे होते' हे सांगणे आमचा प्रांत नाही. असेच दुसर्‍या ओळीतील 'आहे'चे! मुंबईमधील काही मराठीभाषिकांनी साधारण १९८४ च्या आसपास शुद्ध मराठीवर एक आक्रमण केले अन ते आजही तसेच अस्तित्वात आहे. 'तू आला होतास' या शुद्ध वाक्याला मुंबईची माणसे 'तू आलेला' असे म्हणायला लागली. आता महाराष्ट्रात सर्वदूर हे चालते. 'मी गेलेलो, ती दिसलेली, मी हबकलेलो, ती बहकलेली' अशी विधाने आता सर्रास होताना दिसतात. कवीचे मूळ ठिकाण माहीत नाही. पण 'तू दिसायला साव आहे' मधील 'आहे' ने 'स' ला गिळलेले पाहून आम्हाला याची आठवण झाली. तू दिसायला साव असलीस तरी माझ्या हृदयाला मात्र चोरून नेलेस अशा अत्यंत गहन अर्थाचा हा शेर आहे. इतक्या निर्मळ भावनेवर लिहिण्याची आमची क्षमता जाऊन बरीच वर्षे झाली.

उगाच पत्ते बघू मी कशाला?
तुझ्याच हाती दिला डाव आहे

चांगला शेर! कोणत्याही व्यक्तीस / परिस्थितीस लागू होणारा शेर! यातही एक 'स्वतःला विसरून प्रेम करण्याची अतिशय निर्मळ भावना' प्रदर्शित होते व अत्यंत छान पद्धतीने प्रदर्शित होते. बहुधा, हा या गझलेतील सुचलेला पहिला शेर असावा. आम्हाला फार आवडला. 'तुझ्याच हाती दिला डाव आहे' मधे एक समर्पणाची भावना आहे जी तीव्रपणे येताना दिसते. तीव्रपणे भावना प्रदर्शित करतानाही साधे साधे शब्द योजणे हे कौशल्य!

'लिना' घरी हाय! - पाटी 'रिना'ची
असा कसा हा तुझा गाव आहे?

खरे तर या शेरानंतर आम्ही लिखाण थांबवणार होतो. पण म्हंटले जरा गंभीरतेने पाहुयात. वाटतो तसा साधा सुधा शेर नाही हा! या शेराचे विविध अर्थ:

१. देवाला विचारले जात आहे की तुझ्या भूमीवरची संस्कृती अशी कशी झाली?
२. एकंदर मानव सृष्टीलाही तेच विचारले जात आहे.
३. आजच्या समाजातील स्त्रिया आपले स्त्रीत्व विसरून कशाही का वागत आहेत?
४. मी तुझ्या गावात (जीवनात) यायलाच नको होते कारण सदाचरणाला इतेह काहीही महत्व नाही.
५. मला एका विशिष्ट व्यक्तीची / घटनेची अपेक्षा असताना हे काय वेगळेच झाले?

विविध छटांचा हा शेर दुर्लक्ष करण्यासारखा नाही.

कट्यार जर ती तुझ्या मालकीची
तयार मी सोसण्या घाव आहे

तुझ्याच हाती दिला डाव आहे - या शेराच्या अर्थाच्या जवळपास जाणारा शेर! या 'कलम-भुजंगप्रयात' वृत्तात 'आहे' ही रदीफ घेतल्यामुळे व काफिया घाव, डाव असे असल्यामुळे शब्दरचना फिरंगी पद्धतीची होताना दिसते. 'मी घाव सोसायला तयार आहे' हे विधान शब्दांचा क्रम बदलून आल्यासारखे वाटत राहते. मात्र, या शेरात 'जर' या शब्दाने बराच फरक झालेला आहे. 'जर' तू मारणार असशील तर मी मरायला तयार आहे, ऐर्‍या गैर्‍यांच्या हातून मी मरणार नाही असा अर्थ निघत आहे.

दिलात माझ्या असे खूप जागा
तुझ्या सहेलीसही वाव आहे!

हे दिल, सहेली वगैरे काय चालले आहे काही समजत नाही. 'मनात' हा शब्द का घेतला जाऊ नये? दिल या शब्दातून एका विशिष्ट भाषिक लोकांबाबत काही बोलायचे आहे म्हणावे तर तसेही वाटत नाही. तसेच, सहेलीला तिचे मत विचारण्यात आले की नाही (कवीच्या 'दिलात' राहण्याबाबत ) ते काही समजत नाही. सहेलीला गृहीत धरलेले असावे. किंवा, गृहीत धरलेल्या व्यक्तीला 'तू'ची सहेली म्हणून जाहीर करण्यात आलेले असावे. या गोष्टीला 'तू'ची काही हरकत नसावी. किंवा, 'तू'लाच गृहीत धरण्यात आले असावे. किंवा, स्वतःच्या 'दिलाला' गृहीत धरले की काय कुणास ठाऊक? यातील 'वाव' हा शब्द कोणत्या छटा घेऊन येतो ते स्पष्ट झाले असे वाटत नाही. म्हणजे, सहेलीने नुसते 'दिलात' राहायचे की 'जमेल तेवढी जागा व्यापायची' याबाबत 'कवी' व 'तू' यांचे काय अ‍ॅग्रीमेंट आहे हे लक्षात येत नाही. तसेच, हा असा असा वाव आहे हे व्रुत्त 'तू'ला आत्मविश्वासपुर्वक सांगण्यात येत असल्यामुळे 'तू'ला 'कवीच्या हृदयात कसली आलीय इतकी जागा' असा काहीसा प्रश्न पडला असावा असेही वाटते. फारच गोंधळ आहे या शेरात!

विविध भावनिक पातळ्यांवरून फिरवून आणणारी व काही संवेदना जागृत करू शकणारी अशी ही गझल!

यानंतर आम्ही पुढील एखाद्या गझलेकडे वळत आहोत.