आयुष्य

आयुष्य
------------------------

कसरत किती जिवाची दररोज नाचताना !
कळते कुणास; पाणी डोळ्यात साचताना ?

मुर्दाड होउनी मन गेले कधीच माझे...
पीडा कशास व्हावी मग त्यास काचताना

तुकडा तुझ्या जिवाचा नांदे कुठे तरी ना ?
हे जाणवे न तुज पण सू(सु)नेस जाचताना!

शिवले किती मनाला, उसवेच ते तरीही...
पण आस केवढी दरवेळेस टाचताना !

मळले किती ठिकाणी पुस्तक तुझ्या जिण्याचे
समजो तुझे तुला हे आयुष्य वाचताना !

...आरती कदम

गझल: 

प्रतिसाद

१सुधारणा...

४थ्या द्विपदीतील दुसर्या ओळीत " ही " हा शब्द चुकुन लिहिला गेला. ( त्यामुळे मात्रांचे गणित चुकते)
क्रुपया त्याला वगळून वाचावे.

आरती

छान.
साधी-सोपी गझल. खूप आवडली.
तुम्ही कसदार गझला लिहू शकाल. लिहीत राहा.
पुढील गझलेसाठी मनापासून शुभेच्छा.

मळले किती ठिकाणी पुस्तक तुझ्या जिण्याचे
समजो तुझे तुला हे आयुष्य वाचताना !

वा वा! आरतीताई, सुरेख शेर!

कळते कुणास पाणी डोळ्यात साचताना? - वा वा!

(दरवेळेस - याचे काहीतरी करावे लागेल बहुधा!)

समजो तुझे तुला हे आयुष्य वाचताना - फार सुरेख मिसरा!

गाहे गाहे इसे पढा कीजे
दिलसे बेहतर कोई किताब नही - हे आठवले.

आम्ही मागे एकदा एक शेर रचण्याचा प्रयत्न केला होता.

वेदनांची दीर्घशी कादंबरी ही
या मनाला चाळणे सोपे न माना

मला आपल्या गझलेतील साधेपणा आवडला.

-सविनय
'बेफिकिर'!

गझल आवडली..
पुलेशु...

भन्नाट्...गझल

शिवले किती मनाला, उसवेच ते तरीही...
पण आस केवढी दरवेळेस टाचताना !

मळले किती ठिकाणी पुस्तक तुझ्या जिण्याचे
समजो तुझे तुला हे आयुष्य वाचताना !

धन्यवाद.........प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार
आरती