पक्षी येती झाड बहरता , वठल्यावरती कुणी न दिसते

पक्षी येती झाड बहरता , वठल्यावरती कुणी न दिसते
पक्षी येती झाड बहरता , वठल्यावरती कुणी न दिसते
जमिनीमध्ये रूजणारी बी त्या झाडाचे भाग्य जाणते

श्रावण तसाच निघून गेला अजून आहे तहान बाकी
बरस होवुनी मेघ सावळा ही धरती तुझी वाट बघते

इथे बागेत मोगरा बघून इतका आनंद होतो की
माझ्या आठवांच्या देशातली सुगंधी कुपी दर्वळते

कुंडीमधल्या रोपासंगे अखेर माझी गट्टी जमते
पण बाकी घर तसेच -कायम दोघांशी फटकून वागते

अभिमानाने झाड म्हणाले "पाहा, ताठ उभा आहे मी"
(त्याची ती झुकलेली फांदी त्याला कधीच दिसली नसते!)

त्या गळलेल्या पानांमधुनी,येते मृत्यूची हाक मला
जगण्याची तरतूद कराया झाड माझे धडपडत असते

गझल: 

प्रतिसाद

सन्माननीय सोनालीताई,

सलाम!

आपली ही गझल मला फार फार आवडली. खरच, आपली शब्दयोजना, इतर अनेक योजना फार सुरेख आहेत.

काही ठिकाणी लय तपासणे आवश्यक आहे किंवा काय हे नक्की पाहायला हवे.

पण, आशय हा आत्मा आहे. आणि या रचनेचा आशय 'जीव तोडून लिहिल्यासारखा' आहे सोनालीताई!

अजून अशाच रचनांची वाट पाहात आहे.

केदार,

स्त्री गझलकार कदाचित संख्येनी कमी असतील पण या रचनेचा आशय पहावात.

सगळी गझलच उत्तम!

'गझलियत' इज धिस!

'गुफ्तगू' ही गझलेच्या अनेक व्याख्यांपैकी एक आहे.

पक्षी येती झाड बहरता , वठल्यावरती कुणी न दिसते - सुरेख
जमिनीमध्ये रूजणारी बी त्या झाडाचे भाग्य जाणते - खरे आहे

श्रावण तसाच निघून गेला अजून आहे तहान बाकी - ओहो
बरस होवुनी मेघ सावळा ही धरती तुझी वाट बघते - ओके

इथे बागेत मोगरा बघून इतका आनंद होतो की - लय?
माझ्या आठवांच्या देशातली सुगंधी कुपी दर्वळते - छान

कुंडीमधल्या रोपासंगे अखेर माझी गट्टी जमते - अप्रतिम मिसरा सोनालीताई!
पण बाकी घर तसेच -कायम दोघांशी फटकून वागते - खास, खास मिसरा!

अभिमानाने झाड म्हणाले "पाहा, ताठ उभा आहे मी" - वा वा!
(त्याची ती झुकलेली फांदी त्याला कधीच दिसली नसते!) - अप्रतिम मिसरा सोनालीताई! अप्रतिम!

त्या गळलेल्या पानांमधुनी,येते मृत्यूची हाक मला - ओके
जगण्याची तरतूद कराया झाड माझे धडपडत असते - जबरदस्त मिसरा! (लय? ) मिसरा जबरदस्त आहे.

बेफिकीर!

सोनाली,
गझलक्षेत्रातील निराळेपण तुझ्या गझलेत असते.
ही गझलही उत्तम. शेवटचे दोन शेर आवडले.
लयीची गडबड तपासावी.

भूषण,
चर्चाप्रस्तावात केवळ टक्केवारीबद्दल प्रश्न आहे.
सर्व महिला गझलकार प्रतिभावंत आहेत यात कुणालाही शंका नसावी.

लयीकरता थोडी मदत करा :)
सोनाली

सोनालीताई,

आपल्याला राग आलेला दिसतो. माफ करावेत. मला नीट वाचता आले नसेल. मला वाटले तशा ओळी लिहीत आहे. याचाही कृपया गैरसमज होऊ नये. माझे काही चुकत असल्यास सांगावे.

बरस होवुनी मेघ सावळा .. वाट तुझी धरती ही बघते

इथे बागेत मोगरा बघून इतका आनंद होतो की
बघून बागेत मोगरा हो मनास आनंद एवढा की
माझ्या आठवांच्या देशातली सुगंधी कुपी दर्वळते
स्मृतीदेशची कुपी सुगंधी दरवळून ओसंडुन हसते

त्या गळलेल्या पानांमधुनी,येते मृत्यूची हाक मला
त्य गळलेल्या पानांमधुनी, येते हाक मला मृत्यूची
जगण्याची तरतूद कराया झाड माझे धडपडत असते
जगण्याची तरतूद कराया, झाड बिचारे झगडत असते (बिचारे ऐवजी एकटे / कसेसे )

सोनालीताई,
कृपया गैरसमज नसावा. काही चुकले असल्यास क्षमस्व!

-सविनय

सोनाली,
आहे तशी, लय आवडली.
फांदी,तहान बाकी - हे शेर विशेष आवडले.श्रावणाचा शेर अधिक चांगला होऊ शकतो.
जयन्ता५२

कुंडीमधल्या रोपासंगे अखेर माझी गट्टी जमते - व्वा!

पुन्हा वाचून जास्त आवडलेला शेर!