स्वप्न ज्यात मी नसेन...

त्या कुशीवरी वळून जागतात का कधी?
स्वप्न ज्यात मी नसेन, पाहतात का कधी?

का तुला तरी उगाच ऐकवायची कथा?
संकटाकडे उपाय मागतात का कधी?

या मनास भाकरी तुझ्यामुळे मिळायची
पूर्णवेळ कामगार काढतात का कधी?

सत्यवान केवढे, जगास काय माहिती?
रावणाशिवाय राम गाजतात का कधी?

आपलीच जाहिरात लावतात माणसे
आपलेच घोषवाक्य पाळतात का कधी?

ओठ एवढे मिटून काय चालते तुझे?
साखरेस लोक गूळ लावतात का कधी?

खाउनी प्रसाद देव गुळगुळीत जाहले
पण तरी कृपा वरून सांडतात का कधी?

लोचनात वाहतूक फार वाढली अता
या मनातले विचार आटतात का कधी?

ज्यास त्यास हे विचारुनी दमून चाललो
'बेफिकीर' आपल्यास भेटतात का कधी?

-सविनय
बेफिकीर!

गझल: 

प्रतिसाद

का तुला तरी उगाच ऐकवायची कथा?
संकटाकडे उपाय मागतात का कधी?

वा!

१, २, ६ द्विपदी आवडल्या! ६व्यात ओठास ओठ लावणे यायला हवे होते पहिल्या ओळीत असे वाटून गेले.

सत्यवान केवढे, जगास काय माहिती?
रावणाशिवाय राम गाजतात का कधी?

सुरेख!

क्रान्ति, चित्तरंजन व विदेश,

आपल्या प्रतिसादांनी बळ आले.

श्री. चितरंजन,

खरे आहे, 'ओठास ओठ लावणे' हा शब्दप्रयोग व्हायला हवा होता खरा!

आपल्या प्रोत्साहनाने उत्साह आला.

-सविनय
बेफिकीर!