पीळ
बुरुजातल्या कथांना चिणला सबूत आहे
प्राचीन या गढीचे विकराल भूत आहे
फाशांमधे जगावे, फाशांवरी मरावे
हा कैफ़ जीवनाचा- फसवाच द्यूत आहे
पैशास जो कधीही विकलाच जात नाही
तो कोण या जगी रे, मायेस पूत आहे?
पिंजू तरी किती हे - हृदयास पीळ नाही
नाकास भावनेच्या, धरलेच सूत आहे
गंगेत हर तुक्याची बुडते अभंगगाथा -
माझेच का खरे अन् परदु:ख झूट आहे?
(हा शेर चुकीचा असल्याचे निदर्शनास आणून दिल्याबद्दल जाणकारांचे आभार. त्या ऐवजी-)
धिंडी जिथे निघाल्या सार्याच नागव्याने
लक्तरे आबरूची मी व्यर्थ धूत आहे
((व्यर्थ /तेथ)..हा चालेल?!
आता त्या तुक्याच्या शेरासाठी गझल् लिहिली पाहिजे . हम्म्!)
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
बुध, 18/04/2007 - 09:41
Permalink
फाशांमधे जगावे
विसुनाना,
बुरुजातल्या कथांना चिणला सबूत आहे
प्राचीन या गढीचे विकराल भूत आहे
मतला आवडला.
फाशांमधे जगावे, फाशांवरी मरावे
हा कैफ़ जीवनाचा- फसवाच द्यूत आहे
हा शेर आवडला. विशेषत: वरची ओळ. ´झूट´ चालणार नसले तरी मक्ताही आवडला. मक्ताही आवडला.
कुमार जावडेकर
बुध, 18/04/2007 - 20:13
Permalink
वा!
विसूनाना,
वा! सुंदर गझल...
काफिये खूप आवडले. द्यूताचा शेरही.
मक्ता तर अप्रतिम आहे.
गंगेत हर तुक्याची बुडते अभंगगाथा -
माझेच का खरे अन् परदु:ख झूट आहे? - वा! वा! वा!
- कुमार
चक्रपाणि
बुध, 18/04/2007 - 20:45
Permalink
छान/सूचना
बुरुजातल्या कथांना चिणला सबूत आहे
प्राचीन या गढीचे विकराल भूत आहे
विकराल च्या ऐवजी 'विक्राळ' हा साधा शब्दही चालून जाईल असे वाटते. साधेसोपे आणि सर्वपरिचित शब्द, पण तरीही मोठा गर्भितार्थ हे सूत्र असावे, असे आपले माझे मत.
फाशांमधे जगावे, फाशांवरी मरावे
हा कैफ़ जीवनाचा- फसवाच द्यूत आहे
द्यूत हा शब्द मराठीत नपुसकलिंगी आहे, असे मला वाटते. तसे असल्याने 'फसवेच' हवे का?
पैशास जो कधीही विकलाच जात नाही
तो कोण या जगी रे, मायेस पूत आहे?हा शेर कळला नाही. स्पष्ट करता येईल का?
पिंजू तरी किती हे - हृदयास पीळ नाही
नाकास भावनेच्या, धरलेच सूत आहेवा छान. भावनेच्या नाकास धरलेले सूत ही कल्पना आवडली. पिंजणे, पीळ आणि सूत यांच्यातला परस्परसंबंध छान जमून आला आहे. पण धरलेला जोडून 'च' येणे खटकले. भावनेच्याच नाकास सूत धरले आहे, हा अर्थ अपेक्षित आहे ना? तसे असेल, तर धरलेच मधला च खटकतो.
गंगेत हर तुक्याची बुडते अभंगगाथा -
माझेच का खरे अन् परदु:ख झूट आहे?
वावा! शेर आवडला. मस्त! पण जमीन लक्षात घेता झूट हा काफिया होऊ शकतो, असे मला वाटत नाही (बाकीच्या काफियांमध्ये 'त' हे कायमस्वरूपी अक्षर आहे, हे लक्षात घेतले तर) अर्थात हे माझे मत, चूक-बरोबर जाणकार सांगतीलच.
चित्तरंजन भट
बुध, 18/04/2007 - 22:01
Permalink
हे कसे वाटेल?
धिंडी जिथे निघाल्या सार्याच नागव्याने
या अब्रुदार चिंध्या मी व्यर्थ धूत आहे!
हे कसे वाटेल विसुनाना?
विसुनाना
गुरु, 19/04/2007 - 09:59
Permalink
चक्रपाणि :सूचनांबद्दल आभार
चक्रपाणि,
आपल्या सूचनांचा मी विचार केला.
द्यूत- तो आणि ते दोन्ही वापरले तर चालते असे मला वाटते.
धरलेच सूत - भावनेच्याच नाही -धरले'च' ! असे - आता थोड्याच वेळात जाणार आहे वर. वैद्यबुवां नी नाकाला सूत धरलेलेच आहे, म्हणे!
झूट - नवा शेर वाचला का? कसा वाटतो?
सूचनांबद्दल असे वाटते.