मी मोकळा

आसवांच्या साखळ्या ओवायला मी मोकळा
भावनांना मोकळे सोडायला मी मोकळा

स्वैर शब्दांनी मने उध्वस्त केली केवढी
वादळाशी वारसा जोडायला मी मोकळा

चेहर्‍याने झाकल्या कित्येक नाती जोडली
आरशाशी बोलणे तोडायला मी मोकळा

गीत गाताना सुरांनी काळजाशी टाकले
शब्द सारे पोरके पोसायला मी मोकळा

चाकरीला ठेवलेले सूर्य सारे पांगले
आज माझी सावली ओढायला मी मोकळा

रिक्त आयुष्यातळी थोडे जमेला दाटले
साचलेले शून्य ते मोजायला मी मोकळा

त्या तुझ्यामधुनी कधीची हरवलेली तीच 'तू'
'मी' पुन्हा माझ्यातला शोधायला मी मोकळा

गोठल्या नशिबामध्ये होते 'निरंजन' जागणे
द्या चिता उबदार, अन् झोपायला मी मोकळा!

गझल: 

प्रतिसाद

त्याचे काय आहे बर का 'निरंजनराव'!

की एकदम 'अलखनिरंजन; असे 'जरासे' असंभवनीय 'सदस्यनाम' घेऊन छान छान गझला करणे म्हणजे...!

असो!

आसवांच्या साखळ्या ओवायला मी मोकळा - व्वा!
भावनांना मोकळे सोडायला मी मोकळा - फारच खास!

स्वैर शब्दांनी मने उध्वस्त केली केवढी
वादळाशी वारसा जोडायला मी मोकळा - खरे आहे.

चेहर्‍याने झाकल्या कित्येक नाती जोडली - झाकलेल्या चेहर्‍याने खूप नाती जोडली?
आरशाशी बोलणे तोडायला मी मोकळा - छानच!

गीत गाताना सुरांनी काळजाशी टाकले - काय टाकले?
शब्द सारे पोरके पोसायला मी मोकळा - वा वा ! फार सुरेख!

चाकरीला ठेवलेले सूर्य सारे पांगले - हा मिसरा अप्रतिम! काय बोललात राव!
आज माझी सावली ओढायला मी मोकळा - हाही तसाच! आपण फारच सरावलेले आहात.

रिक्त आयुष्यातळी थोडे जमेला दाटले
साचलेले शून्य ते मोजायला मी मोकळा - चांगलाच शेर!

त्या तुझ्यामधुनी कधीची हरवलेली तीच 'तू' - ओह ओ! वा वा!
'मी' पुन्हा माझ्यातला शोधायला मी मोकळा न- गडबड! शब्दक्रमाची! आशय फार छान!

गोठल्या नशिबामध्ये होते 'निरंजन' जागणे - तखल्लुस सामावत नाही असे वाटले. निरंजन हा शब्द 'चिरंतन' असा घेतला गेल्यासारखे वाटले.
द्या चिता उबदार, अन् झोपायला मी मोकळा! - किरकोळ मिसरा!

बोलतो मी आज तो सिद्धांत लोकांचा उद्या
बोल जे बोलायचे, बोलायला मी मोकळा

सविनय
- 'बेफिकीर' !

मी मोकळा

या 'अन्त्ययमकासाठी' माझे आत्तापर्यंतचे 'जे काय किरकोळ काम' आहे ते कुर्बान बॉस!

मी मोकळा!

व्वा!

कटककर साहेब,

'वो आये घर में हमारे खुदा की कुदरत है
कभी हम उन को कभी अपने घर को देखते हैं' :))

आपल्या मूल्यवान प्रतिसादाबद्दल आणि सूचनांबद्दल अनेक धन्यवाद!!

गझल छानच. जमीन उत्तम. काही सुट्या ओळी तर अत्युत्तम आहेत. 'आज माझी सावली ओढायला मी मोकळा' ही ओळ भयंकर आवडली. कधीकधी दोन उत्तम ओळी एकत्र येऊनही द्विपदी तेवढी परिणामकारक होत नाही.

सहमत!

तसेच,

गोठल्या नशिबाम'धे' असुदे निरंजन जागणे
आणि म'ध्ये'ला म'धे' समजायला मी मोकळा

चित्तंशी सहमत.
आसवांच्या साखळ्या ओवायला मी मोकळा; आज माझी सावली ओढायला मी मोकळा; शब्द सारे पोरके पोसायला मी मोकळा - हे मिसरे फार म्हणजे फार आवडले!!
अख्खे शेर म्हणून मला शून्य आणि "मी"/"तू" हे शेर आवडले.

चित्तरंजन, पुलस्ति, भूषण यांचे श्तशः आभार! अजून लिहिण्यास उभारी मिळाली!