...एकंदरीने !

.....................................
...एकंदरीने !
.....................................

झुंजले रात्रीसवे बेहत्तरीने...!
स्वप्न झाका फाटक्या या चादरीने !

चंद्र-तारे दे मला कविता कराया...
का मनाची भूक भागे भाकरीने ?

लावुनी धरलेस ते आयुष्यभर तू...
बोललो होतो कधी जे मस्करीने !

द्वेष कोणाचाच कोणी करत नाही...
सांगता येईल का हे खातरीने ?

`शेवटी लाथाच का माझ्या कपाळी ?`
- एकदा तक्रार केली पायरीने !

आवडेनासा अता पाऊस झाला...
कोरडे केले मला एका सरीने !!

पाहिला आहे पऱ्यांचा गाव कोणी ?
मी तरीही शोधतो माझ्या परीने !!

ओळखावी नीट ताकद लेखणीची...
जे लिहावे, ते कसे मातब्बरीने !!

दोन ओळींतून सारे व्यक्त होते...
होत नाही व्यक्त जे कादंबरीने !

खूप हिंडवलेस तू दुनियेत बाबा...
ने मला रस्त्या, अता माझ्या घरी ने !

हां, अता नाहीस तू, ही खंत आहे...
ठीक आहे पण तसे एकंदरीने !!

- प्रदीप कुलकर्णी

 

 

गझल: 

प्रतिसाद

प्रदिप,
एकदम खणखणीत गझल..
सर्वच शेर एक से एक..
अनिरुद्ध..

मि. प्रदीप,
आपली ही गझल ' हे नसे थोडके' पेक्षाही उत्कृष्ट आहे. सर्व शेर लाजवाब. परत परत वाचतोय. एक एक शेर अफाट आहे. दोन ओळींमधे खरोखरच कादंबरीपेक्षा जास्त व्यक्त होते हे पटले.

सर्व शेर झकास!
त्यातही  'परीने' आणि  'घरी  ने' मधली  गंमत जाम  आवडली.

नेहमी प्रमाणेच छान.

हां, अता नाहीस तू, ही खंत आहे...
ठीक आहे पण तसे एकंदरीने !!

मध्यंतरी 'अ' हा स्वर अलामत म्हणून घ्यावा की काय याबाबत उलट्-सुलट चर्चा होती. पण आता 'अ' हा स्वरही उत्तम काम करू शकतो असे वाटते. चुकीचे वाटत असल्यास पुन्हा सांगावे.

आवडेनासा अता पाऊस झाला...
कोरडे केले मला एका सरीने .. हा शेर आवडला
-मानस६

ओळखावी नीट ताकद लेखणीची...
जे लिहावे, ते कसे मातब्बरीने !!      आपण लेखणीची ताकद ओळखली आहेच. आणि आपण एक मातब्बर क्वि आहातच.

दोन ओळींतून सारे व्यक्त होते...
होत नाही व्यक्त जे कादंबरीने !      हे आपल्या शेरातुन कित्येकवेळा आपण शाबित केलेलं आहेच .  एवढच म्हणतो की आपण एक लाजबाब गझलकार आहात

लावुनी धरलेस ते आयुष्यभर तू...
बोललो होतो कधी जे मस्करीने !


अप्रतिम गझल. खूप आवडली.
सरीचा, परीचा शेर खूप मस्त

आवडेनासा अता पाऊस झाला...
कोरडे केले मला एका सरीने !!
वाव्वा!! अतिशय सुरेख ... मातब्बर गझल. एकंदरीने फार-फार आवडली.

मातब्बरी, कादंबरी आणि मस्करी हे शेर फार फार आवडले!!

आवडेनासा अता पाऊस झाला...
कोरडे केले मला एका सरीने !!

पाहिला आहे पऱ्यांचा गाव कोणी ?
मी तरीही शोधतो माझ्या परीने !!
---- प्रदीप! सरीचा शेर केवळ अप्रतिम.
जयन्ता५२

प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार... लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

चांगले तयार केले आहे.

अफाट गझल...!! खुपच आवडली.

लावुनी धरलेस ते आयुष्यभर तू...
बोललो होतो कधी जे मस्करीने !

आवडेनासा अता पाऊस झाला...
कोरडे केले मला एका सरीने !!

ओळखावी नीट ताकद लेखणीची...
जे लिहावे, ते कसे मातब्बरीने !!

हां, अता नाहीस तू, ही खंत आहे...
ठीक आहे पण तसे एकंदरीने !!

त्यात हे शेर फार आवडले.

लावुनी धरलेस ते आयुष्यभर तू...
बोललो होतो कधी जे मस्करीने !

वाहवा!

`शेवटी लाथाच का माझ्या कपाळी ?`
- एकदा तक्रार केली पायरीने !
नवी कल्पना..

आवडेनासा अता पाऊस झाला...
कोरडे केले मला एका सरीने !!

वा!

गझल आवडली.

प्रत्येकच शेर लोभस आहे. गझल परत परत वाचावाशी वाटली. (आपल्याला असे का सुचत नाही, असेही वाटले बरं का ?) हीच तर (ह्या) गझलेची महता आहे. फारच सुंदर ! (' घरी ने ' मधला 'ने' तुटला तरी मजा कमी होत नाही . तो तुटला नसता तर बरे झाले असते असे वाटले. पण या वाटण्याला काही अर्थच नाही; कारण तो अपरिहार्यतेने तुटला आहे. (कुणीच ) अपरिहार्यतेशिवाय तुटू नये....).
सुंदर गझल 'एकंदरीने..'