आज ही वेदना दार ठोठावते.....

आजही वेदना दार ठोठावते
ज़ख्म ओली जुनी फार लोभावते.....

औषधांचा मला काय हो फायदा ?
मीठ माझी ज़खम फार गोंजारते.....

तू न येणार हे जाणतो मी तरी
सारखी ही नज़र फार घोटाळते.....

हो तुझे रूप आहेच लोभावणे !
त्या मुळे मन असे फार लोभावते.....

तू मला जीव लावू नको फारसा
ह्या सुखालाच मन फार सोकावते.....

बाग माझा जरी पार वैराण हा !
पालवी एक का फार लोभावते ?

एक घावा निशी जीव जावा ` ख़लिश '
पण मला वेदना फार लोभावते.....

` ख़लिश '-विठ्ठल घारपुरे / १२-०८-२००९

गझल: 

प्रतिसाद

पहिल्या ३ द्विपदी छान आहेत. आवडल्या. लोभवाणे म्हणजे लोभसवाणे काय?

खलिश,

आपण गझलेची 'जमीन' पाळलेली नाहीत.

मराठीत 'ती बाग' आहे.

घावा निशी - हा एक शब्द असावा.

दुसर्‍या व तिसर्‍या शेरातील 'हो' हा शब्द भरतीचा वाटतो. तिसर्‍या शेराचा आशय आवडला.

चित्तरंजन यांनी विचारलेला प्रश्न मलाही पडला. 'लोभावणे' म्हणजे काय?

मतल्यातील जमीन पाळायला हवी.

जख्म?

जख्म हा शब्द आपल्याला वृत्तानुसार 'जखम' असा लिहिता येईल असे म्हणावेसे वाटले, बाकी आपली इच्छा!

माननीय चित्तरंजनजी आणी भूषणजी, धन्यवाद.

" हो तुझे रूप आहेच लोभावणे ! "

*लोभावणे हे मी लोभनीय/लोभसवाणे ह्या पर्याय रुपी घेतले आहे. ` गोजिरे' घेउ शकलो असतो. मूळ मिसरा असा होता.

" का तुझे रुप आहे असे गोजिरे ?
त्या मुळे मन असे फार लोभावते....."

*-हा शेर जास्त योग्य असल्यास तोच ठेवुया....

**`हो' शब्द जरी भरतीचा वाट्त असला तरी :
- मिसर्याचा मूळ भाव जपण्या साठी वापरला आहे.

*** ' ज़ख्म ' आणी ` ज़खम ' हे मी अनुक्रमे " गा ल गा ( फ़ा (इ) लुन )
वज़न धरुन ठेवण्या साठी वापरले.

****
" बाग माझा जरी पार वैराण हा !"
हे
' बाग माझी जरी पार वैराण ही !' असे चालु शकले असते. पणः
बाग हे m & f ( masculine and feminine gender ) वापरु शकत असल्या मुळे तसे वापरले आहे.
आपली सूचने आवश्यक आहेत.
लोभ असावा.
` ख़लिश '- वि. घारपुरे.१४-०८-२००९.

जमीन - ठोठावते व लोभावते हे 'मतल्यात' आल्यानंतर पुढील शेरांमध्ये फक्त 'आवते'च यायला हवे असे बाराखडीत म्हंटले आहे. याची दखल विश्वस्तांनी घेतली नाही हा भाग वेगळा! पण, गोंजारते व घोटाळते हे कवाफी ... 'या' ... 'मराठी' गझलेत चालू शकणार नाहीत, असा माझा समज आहे.

कवीचे स्वातंत्र्य आहेच!

खलिश, मतल्यात स्थापित झालेल्या अलामतीनुसार योग्य ते बदल करावेत. किंवा मतल्यात बदल करावेत. धन्यवाद.