गलका !

गलका !

धक्का बसला कसा कळेना, एक उडाला टवका !
आज पाहिले... रंगाखाली देव किती हा मळका !

सजावटींच्या दिव्यांपुढे ही शांत विलसते समई...
असो कितीही लखलखाट अन् असो कितीही भपका !

उगीच का डोळ्यांत अचानक पाणी दोघांच्याही ?
त्याच क्षणी मज लागे उचकी, तुला ज्या क्षणी ठसका !

तसा काल मी, असा आज मी, काय उद्याचे सांगू ?
माझ्याइतका माझा नाही कुणी घेतला धसका !

ऊब हवीशी स्वप्नांची... पण वास्तव हे तडतडते...
जगणे येते भानावर मग जसा बसावा चटका !

जागा होतो माझ्यामधला कधी कधी बैरागी...
रक्त जणू हे विरक्त होई...श्वास भासतो परका !

मौन आतल्या आत राहते झाड मनाचे दिवसा...
सायंकाळी मात्र त्यावरी आठवणींचा गलका !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

भन्नाट...

धक्का बसला कसा कळेना, एक उडाला टवका !
आज पाहिले... रंगाखाली देव किती हा मळका !

सजावटींच्या दिव्यांपुढे ही शांत विलसते समई...
असो कितीही लखलखाट अन् असो कितीही भपका !

उगीच का डोळ्यांत अचानक पाणी दोघांच्याही ?
त्याच क्षणी मज लागे उचकी, तुला ज्या क्षणी ठसका !

तसा काल मी, असा आज मी, काय उद्याचे सांगू ?
माझ्याइतका माझा नाही कुणी घेतला धसका

सजावटींच्या दिव्यांपुढे ही शांत विलसते समई...
असो कितीही लखलखाट अन् असो कितीही भपका !

उगीच का डोळ्यांत अचानक पाणी दोघांच्याही ?
त्याच क्षणी मज लागे उचकी, तुला ज्या क्षणी ठसका !

मौन आतल्या आत राहते झाड मनाचे दिवसा...
सायंकाळी मात्र त्यावरी आठवणींचा गलका !
अप्रतिम शेर!

फारच छान गझल. खूप खूप आवडली. उचकी-ठसका, टवका, गलका सर्वाधिक आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

गझल उत्तम. भपका, गलका फार फार.

प्रदीप

गझल आवडलीच.
भपका मस्त .

मौन आतल्या आत राहते झाड मनाचे दिवसा...
सायंकाळी मात्र त्यावरी आठवणींचा गलका

फारच सुरेख!

आवडली.

प्रत्येक शेर आवडला.
मस्तच

भिडली एकदम गझल.

ही ओळ आवडली.
मतल्यावरून ज्ञानेशचा 'खरवडूनी पाहतो शेंदूर थोडासा' आठवला. आपल्या शेराचा अर्थ अर्थातच वेगळा आहे.
भपका शेर छान वाटला. समई हा शब्द फारसा गझलेत आढळला नव्हता, आपण छान वापर केलात असे वाटले.
कवाफी नवीन वाटले. विषय जुने वाटले.

गझल छान आहे.