शिक्षा

शिक्षा नवी तरीही आरोप जुना आहे
काही न बोलणे हा, इतकाच गुन्हा आहे

आम्ही असे अनोख्या मस्तीत झिंगलेले,
गेले घडून त्याचे सुखदु:ख कुणा आहे ?

घायाळ जरी झाले झेलून शर विषारी,
हे पाखरू भरारी घेणार पुन्हा आहे

गाईल वसंताची गाणी पुन्हा नव्याने,
हा कंठ कोकिळेचा, जो आज सुना आहे

ही सिद्धता कशाची? हे सोहळे कशाला?
आत्मा नव्या जगाचा, हा देह जुना आहे

उन्मत्त नको होऊ, त्या वादळास सांगा,
नौकेकडे किनारा येणार पुन्हा आहे

गझल: 

प्रतिसाद

छान्..गझल आवडली

गाईल वसंताची गाणी पुन्हा नव्याने,
हा कंठ कोकिळेचा, जो आज सुना आहे

ही सिद्धता कशाची? हे सोहळे कशाला?
आत्मा नव्या जगाचा, हा देह जुना आहे

उन्मत्त नको होऊ, त्या वादळास सांगा,
नौकेकडे किनारा येणार पुन्हा आहे

ही गझल बरी आहे. पण सरावातून साध्य झालेली वाटली. अर्थात हे माझे मत. वाचक म्हणून तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतात. गझलकाराने सरळ सोपी वाट टाळायला हवी. उदाहरणार्थ भरारी सारखे शेर.

छान गझल आहे.........
*
शिक्षा नवी तरीही आरोप जुना आहे
काही न बोलणे हा, इतकाच गुन्हा आहे
* ( एक कल्पना ... " मी प्रेम फार केले, बस हाच गुन्हा आहे "... असे ठेवले असते तर ?....कृपया राग मानू नये...)
`ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / २-८-२००९.

गझलकाराने सरळ सोपी वाट टाळायला हवी.
हे म्हणणं पटलं. योग्य मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.
इथं खूप शिकायला मिळतं. वाचनातूनही ब-याच नवनव्या कल्पना मिळतात. त्यातूनच तंत्रशुद्ध, समाधानकारक गझल लिहिण्याचा प्रयत्न करतेय. त्यासाठी असेच मार्गदर्शन मिळावे.

उन्मत्त नको होऊ, त्या वादळास सांगा,
नौकेकडे किनारा येणार पुन्हा आहे......

जबर इच्छा शक्तीचे अतिशय उत्तम उदाहरण... प्रेरणादायी...!!!

खूप छान

- प्रसाद.