उदास...!

.........................................
उदास...!
.........................................

तशी अता राहिली कशाची न आस काही !
जगायला दे तुझे मला फक्त भास काही !

विचारतो मी कधी कधी पारिजातकाला....
`उधार देशील का तुझे मंद श्वास काही ? `

हळूच एकेक बंद झाले कवाड माझे...
अता कशाचा कधी न होणार त्रास काही !

अजून ही एवढीच आशा जिवंत आहे...
घडेल केव्हातरी मनातील खास काही !

जळेन मीही तुझ्याप्रमाणे उजेड द्याया...
उजेड देणे तुझीच नाही मिरास काही !

अजून माझ्या मनी कालचा ऋतू मोहरे...
अजूनही कालचेच येती सुवास काही

कधीच काळापल्याड गेले निघून कोणी...
अजून छाया तरी अशी आसपास का ही ?

बरेच काही लिहावयाचे अजून बाकी...
नवे पुन्हा जन्मतील माझ्यात व्यास काही !

प्रसन्न मी राहतो; तरीही अनेक वेळा...
विचार माझ्या मनात येती उदास काही !

- प्रदीप कुलकर्णी

..............................................

गझल: 

प्रतिसाद

यासाठी शुभेच्छा!

घडेल केव्हातरी मनातील खास काही

उजेड देणे तुझीच नाही मिरास काही

हे शेर आवडले.

बाकी शेर गझलेचे वाटले नाहीत. पण रचनेच इफेक्ट नेहमीप्रमाणेच चांगला!

'व्यास' या ओळीत एकंदर कवीला वाटू शकणारे दु:ख जाणवले. सुंदर ओळ आहे.


नेहमीसारखीच!

जास्त  आवडलेले  शेर-

विचारतो मी कधी कधी पारिजातकाला....
`उधार देशील का तुझे मंद श्वास काही ? `
हळूच एकेक बंद झाले कवाड माझे...
अता कशाचा कधी न होणार त्रास काही !
जळेन मीही तुझ्याप्रमाणे उजेड द्याया...
उजेड देणे तुझीच नाही मिरास काही !
बरेच काही लिहावयाचे अजून बाकी...
नवे पुन्हा जन्मतील  माझ्यात व्यास काही. 
(अजून माझ्या मनी कालचा ऋतू मोहरे... या  ओळीत  लगालगागा  लगालगागा  लगालगागा  चा  क्रम एके  ठिकाणी  बदलला  आहे. यात  काही  चूक  आहे  असे  म्हणायचे  नाही. पण  गझल  प्रदीपजींची  असल्याने  थोडे  खटकले.)

जलौघवेगा...

ज्ञानेश,

फारच चिकित्सक झालायस बाबा!

( अढी कपाळावरील जेव्हा मनात गेली - याबाबतीतही व्हायला पाहिजे की नाही? )


भटसाहेबांनी काफिया, अलामत व रदीफ मराठी भाषेला समजावले.
माधवांनी वगैरे वृत्त लिहिली.
तेच पाळायचे असा आग्रह असेल तर जे चूक आहे ते चूक आहे म्हणायचे.

( अवांतर - मी या स्थळावर पहिल्यापासून आशयाला महत्व द्यावे या मताचा राहिलो आहे. तसेच, उच्चाराप्रमाणे मात्रा मोजाव्यात याही मताचा मी आहे.)

भूषण  कटककर,
'तुम्ही  आणि  तुमची  मते'  हा  एका  स्वतंत्र  लेखाचा  विषय  आहे.
मुळात  माझा  तो  प्रतिसाद  प्रदीपरावांसाठी  आहे. त्यांच्या  गझलांचा  मी  चाहता  आहे आणि  त्यांच्याकडून बरेच  काही  शिकलो  आहे. त्यामुळे  जे  लक्षात  आले  ते  लिहिले. त्यात  चुका  काढणे/भोके  शोधण्याची  हीन  वृत्ती  दाखवली  असे  तुम्हाला  वाटत  असल्यास  माझा  नाईलाज  आहे.
आशयालाच  महत्व  द्यावे  हे  मलाही  पटते. म्हणूनच  'ही  चूक  आहे  असे  म्हणायचे  नाही'  हे  वाक्य  त्या  प्रतिसादात  घातले  आहे.
'अढी'- माझ्या  याच  काय, इतर अनेक  गझलांमधे  भरपूर  चुका  सापडतील. कारण मी  अजून  गझल  शिकतो  आहे. (सुदैवाने ) "गझलतज्ञ"  झालेलो  नाही.

(आणि  हो- प्रदीपरावांकडून  नम्रतेचे  आणि  अनुल्लेखाने  मारण्याचेही  पाठ शिकावे  म्हणतोय. तेवढे  शिकून  होईस्तोवर  तुम्ही  आपली  भाषा  जपून  वापरा, ही  विनंती.)  

@मतला एकदम जबरदस्त..!!

त्रास, खास, आसपास, व्यास हे शेर जास्त आवडले.

हळूच एकेक बंद झाले कवाड माझे...
अता कशाचा कधी न होणार त्रास काही !
वाव्वा!
एकंदर गझल आवडली.

हळूच एकेक बंद झाले कवाड माझे...
अता कशाचा कधी न होणार त्रास काही !

अजून ही एवढीच आशा जिवंत आहे...
घडेल केव्हातरी मनातील खास काही !

वा वा!

बरेच काही लिहावयाचे अजून बाकी...
नवे पुन्हा जन्मतील माझ्यात व्यास काही !

वा मस्त!
(अस्मादिकांचा एक शेर आठवला-
आता कुठे जरासे माझे लिहून झाले
आता कुठे जरासे शब्दांत प्राण आले
)

प्रसन्न मी राहतो; तरीही अनेक वेळा...
विचार माझ्या मनात येती उदास काही !

बहोत खुब!
गझल आवडली :)

जळेन मीही तुझ्याप्रमाणे उजेड द्याया...
उजेड देणे तुझीच नाही मिरास काही !
बरेच काही लिहावयाचे अजून बाकी...
नवे पुन्हा जन्मतील माझ्यात व्यास काही !
खास!क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

हळूच एकेक बंद झाले कवाड माझे...
अता कशाचा कधी न होणार त्रास काही !
अजून ही एवढीच आशा जिवंत आहे...
घडेल केव्हातरी मनातील खास काही !
 
हे दोन शेर तुम्हीच लिहू जाणे.... एकदम मनातल बोलता हो

नेहमीप्रमाणे...१ नंबर .... 
आरती

ज्ञानेश,
सप्रेम नमस्कार.

होय. गल्लत (आणि गलती ऊर्फ चूकही !) झाली आहे. हा शेर या गझलेतील अन्य सर्व शेरांप्रमाणे अक्षरगणवृत्तात नाही. ही गझल मात्रावृत्तात असती तर तो `खपून`ही गेला असता ! पण कुठलीही गोष्ट `खपवणे` योग्य नव्हेच!

सकृद्दर्शनी जुळ्या दिसणाऱया या वृत्तांमध्ये
(म्हणजे - अजून माझ्या मनी कालचा ऋतू मोहरे ! हे वृत्त
आणि अजूनही कालचेच येती सुवास काही ! हे वृत्त.) काही गझला लिहिण्याचा प्रयत्न मी केला होता...त्यातील दोन अपूर्ण राहिल्या. (त्यापैकी निदान एक तरी पूर्ण करावी, असे मनात आले आणि एक गझल मी `पूर्ण` केली. वर ही जी गझल आहे, ती यापैकीच एक. ही गझल पूर्ण करताना दुसऱया अर्धवट गझलेतील ओळीचा आधार मी घेतला...)
तो मूळ शेर असा होता -

अजून माझ्या मनी ऋतू कालचाच आहे...
अजूनही कालचेच येती सुवास काही !

या शेरातील दुसऱी ओळ मला बरी वाटत होती; किंबहुना आवडलीच होती...आणि म्हणून ती सोडवतही नव्हती ! पण पहिली ओळ मात्र तितकीशी पसंत नव्हती...मग मी त्या दुसऱया गझलेतील शेराची पहिली ओळ तिथे `बसविली`! ....अजून माझ्या मनी कालचा ऋतू मोहरे...ही ती ओळ.
...आणि माझ्याकडून तुम्ही म्हणता तशी ही चूक घडली ! या चुकीबद्दल क्षमा असावी.

आता विषय निघालाच आहे तर ती दुसरी अपूर्ण गझल* ऐकवायची संधी मी सोडणार नाही... !
......

अजूनही कालचे चांदणे कुठे ओसरे ?
अजून माझ्या मनी कालचा ऋतू मोहरे !

(या मतल्यातील पहिली ओळ मला उच्चारणसुलभ वाटत नसल्याने हा मतला मी तसा बाजूलाच टाकला होता. त्यामुळे दुसरी ओळ जो़डीदार नसलेलीच होती...मग मी तिला जोडीदार शोधून दिला तो माझ्या मनपसंत ओळीचा...म्हणजेच या ओळीचा -
अजूनही कालचेच येती सुवास काही !

आणि तयार झाला हा शेर

अजून माझ्या मनी कालचा ऋतू मोहरे !
अजूनही कालचेच येती सुवास काही !

...पण अक्षरगणवृत्ताच्या दृष्टीने मात्र ही जोडीदार शोधण्याची माझी `मात्रा` काही लागू पडली नाही ! :)
......

* त्या अपूर्ण गझलेतील काही शेर असे -

अजूनही कालचे चांदणे कुठे ओसरे ?
अजून माझ्या मनी कालचा ऋतू मोहरे !

खुलेपणाने पुढे मी तुझ्या नव्याने उभा...
उगीच माझे पुन्हा शोधशी जुने कोपरे !

कुणी न आता, कुणी राहिले उरी-अंतरी...
निघून गेले कुठे शेवटी सगे-सोयरे ?

........
असो. माझे हे निवेदन म्हणजे,
चूक चार आण्यांची आणि खुलासा बारा आण्यांचा, अशी गत झाली आहे.
पण `अनुल्लेखाने मारण्याची माझ्याकडील कला...`या तुमच्या माझ्यासंदर्भातील (तो तुम्ही मला उद्देशून केलेला नसला तरी !!!) शब्दप्रयोगाने मला हेss एवढे लिहिण्यासाठी उद्युक्त केले...असो.
गझलेतील `चुकी`बद्दल पुन्हा एकदा क्षमा असावी.
लोभ आहेच; असाच राहू द्यावा....

---------------------
या खुलाशाला एवढा उशीर होण्याचे कारण ः जवळपास दीड महिना हे संकेतस्थळ माझ्याकडील काही तांत्रिक कारणांमुळे उघडू शकत नव्हते. त्यामुळे हा उशीर. गैरसमज नसावा. आज ती समस्या दूर झाली आहे.

आपला,
प्रदीप कुलकर्णी
........

आणि मिरास,व्यास विशेष आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस