गारगोट्या




मैफिलीला दीनसे संगीत नाही
घोट कोणी आसवांचे पीत नाही

ऊर्ध्वगामी भोवर्‍याला नाळ नाही
आणि त्याचे दु:खही बेंबीत नाही


उघडली सारी दुकाने ही सुखाची
पण उधारी ठेवण्याची रीत नाही


स्वप्न नाही - बुब्बुळांच्या गारगोट्या
घोरतो मी - झोपणे माहीत नाही


चंदनाचे खोड आता जून झाले
गंध त्याचा अंग हे जाळीत नाही


या भिकारी कागदांना काय देऊ?
एकही कविता कशी शाईत नाही?...




गझल: 

प्रतिसाद

विसुनाना, मतला म्हणून घेतलेला शेर आणि नंतरचा याची अदलाबदल करा. तर गझल होईल किंवा ह्याच गझलेत मतल्यात पहिल्या ओळित काफिया घ्या.  शिवाय पहिलाच शेर डो़क्यावरून जातो असे वाटले तर पुढच्या गझलेत तोच मूड सेट होतो, असा माझा अनुभव आहे.
 

गझल व्हावी म्हणून किरकोळ बदल केला आहे, नवीन सुधारणा करून जरूर पुन्हा नवा मतला लिहिण्यास हरकत नाही.
विचाराधीन फोल्डरमध्ये ही गझल जाऊ नये म्हणून असे केले आहे.

३, ५, ६ आवडले.१ व २ मध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कळलं नाही. समजावून सांगाल का?

गझलेत योग्य तो तांत्रिक बदल केल्याबद्दल संपादकांचे आभार.
मलाही असाच क्रम अभिप्रेत होता.
मैफिलीला दीनसे संगीत नाही
घोट कोणी आसवांचे पीत नाही
-हे आजकालच्या बेगडी समाजचे सत्य! खरे दु:ख त्याना माहीत नाही.

ऊर्ध्वगामी भोवर्‍याला नाळ नाही
आणि त्याचे दु:खही बेंबीत नाही
-ऊर्ध्वगामी हे  "Upwardly mobile society" चे स्वैर भावांतर आहे. तो एक भोवरा किंवा चक्रीवादळ आहे. (वादळाला एक नाभी असते.) अर्थ पोचत नाही हे मान्य आहे.
स्वप्न नाही - बुब्बुळांच्या गारगोट्या
घोरतो मी - झोपणे माहीत नाही
-माझ्या डोळ्यांमध्ये आता कोणतेही स्वप्न नाही. त्यामुळे बुब्बुळे जिवंत नाहीत. ती गारगोट्याच आहेत. या जगात मी शांत झोपू शकत नाही. नेहमी असुरक्षित वाटते. त्याचा घोर आहे. अर्थ पोचत नाही हे मान्य आहे.
 
 
 

कोणताही शेर सरसरत जाणार्‍या भाल्याप्रमाणे काळजात शिरला पाहीजे असं मी कुठेतरी वाचलं होतं.
तुम्ही अर्थ पोहोचत नाही हे खुल्या दिलाने मान्य केलं हे अभिनंदनीय आहे.
अभिजित.
 

चंदनाचे खोड आता जून झाले
गंध त्याचा अंग हे जाळीत नाही
वाव्वा!
या भिकारी कागदांना काय देऊ?
एकही कविता कशी शाईत नाही?...
वाव्वा!

मस्त विसुनाना.

एकही कविता कशी शाईत नाही?...
आवडले.

विसूनाना,

उघडली सारी दुकाने ही सुखाची
पण उधारी ठेवण्याची रीत नाही - वा!
मक्त्यातली कल्पनाही वेगळी आहे.. आवडली.
- कुमार



एकही कविता कशी शाईत नाही?...

वा!!मस्त!!