फास

लांबसडक तुझिया वेणीचा नाजुक फास असा लागावा...


प्राणपाखरू उडू नये, पण स्वर्गसुखाचा प्रत्यय यावा!


 


कवेत घेता सखे तुला मी, गंधित होउन जावा वारा


मिठीत माझ्या, तुझ्या तनूचा अबोल प्राजक्त मोहरावा!


 


काजळभरल्या डोळ्यांना मी चुंबताच, ओठी माझ्याही...


श्यामवर्ण त्या कृष्णसख्याचा काजळातुनी उतरुन यावा!


 


आधी घ्यावे पिऊन‍ तुझिया ओठांमधले अमृत सारे...


नंतर त्यांतुन थरथरणारा शब्द-शब्द मी टिपून घ्यावा!


 


घेउन जावे सखे मला तू अशा सुखाच्या वाटेवरुनी...


जेथुन माघारी फिरण्याचा माझ्यासाठी मार्ग नसावा!

गझल: 

प्रतिसाद

मस्त  शृंगारीक  गझल.
मतला  आणि  मक्ता  जास्त  आवडला.

आधी घ्यावे पिऊन‍ तुझिया ओठांमधले अमृत सारे...
नंतर त्यांतुन थरथरणारा शब्द-शब्द मी टिपून घ्यावा!
कलोअ चूभूद्याघ्या

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद