...वेड पांघरावे मी !

................................
...वेड पांघरावे मी !
................................


यायचे तुझ्यापाशी़; काय पण करावे मी ?
- की असेच कायमचे सांग अंतरावे मी ?

प्रश्न हा न, कोणाला हे पटेल की नाही...
प्रश्न हा - कशासाठी, काय उत्तरावे मी !

चेहरा तुझा आता आठवे न थोडाही...
आठवे, तुला तेव्हा सारखे स्मरावे मी !

जी घडून गेली ती घोडचूक मी आहे...
अन् स्वतःस थोडेसे रोज निस्तरावे मी !

मी कुठे किनाऱ्यांशी खेळलो मनाजोगे ?
तृप्त व्हायच्या आधी काय ओसरावे मी ?

मारलीस तू बाजी; मान्य हे, तरीसुद्धा-
खेळलोच नाही तर सांग का हरावे मी ?

भोवती किती गर्दी...आतही किती गर्दी....
एकटेपणाखाली रोज चेंगरावे मी !!

आगही; फुफाटाही...भाग्य हेच या भाळी
सांग तू मना माझ्या काय पत्करावे मी ?

लागल्यावरी हाती चांदणी मला माझी
सूर्य-चंद्र-ताऱ्यांचे विश्व ठोकरावे मी !

मैफलीत या गाणे ऐकवून झाले की...
वाजतील टाळ्या अन् त्या क्षणी मरावे मी !

येथल्या शहाण्यांची वाटते मला भीती !
मी दिसू नये त्यांना...वेड पांघरावे मी !!


- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

मी कुठे किनाऱ्यांशी खेळलो मनाजोगे ?
तृप्त व्हायच्या आधी काय ओसरावे मी ? .. वा मस्त कल्पना!
-मानस६

प्रिय मित्र प्रदीप,
फार छान गझल केलीस. प्रत्येक शेर छान आहे. वृत्त चांगले आहे.
त्यातही उत्तरावे, हरावे, ओसरावे, मरावे अन पत्करावे हे अतिशय सुंदर शेर आहेत.
एक विचार सुचला. संपूर्ण गझल 'मी' या रदीफेशिवाय 'अर्थ तोच राहूनही' चालू शकते. ( अर्थात पहिल्या मिसर्‍यात योग्य ते बदल करावे लागतील - वृत्तासाठी).  मग या 'मी' मुळे गझलेतील नेमका कोणता घटक 'अधोरेखीत' होत आहे? भावनेची इंटेंन्सिटी किंवा फोर्स ? पण मला वाटते की तुला 'फोर्स' या घटकासाठी 'मी' हा शब्द वापरायची गरज भासणारच नाही असे सामर्थ्यवान शब्द तू वापरतोस.
??
 
 
 

व्वा..छान...
शेर आवडले

लागल्यावरी हाती चांदणी मला माझी
सूर्य-चंद्र-ताऱ्यांचे विश्व ठोकरावे मी !

मारलीस तू बाजी; मान्य हे, तरीसुद्धा-
खेळलोच नाही तर सांग का हरावे मी ?

भोवती किती गर्दी...आतही किती गर्दी....
एकटेपणाखाली रोज चेंगरावे मी !!

येथल्या शहाण्यांची वाटते मला भीती !
मी दिसू नये त्यांना...वेड पांघरावे मी !!
वा वा! हा शेर एकदम मस्त. फार आवडला.

मी कुठे किनाऱ्यांशी खेळलो मनाजोगे ?
तृप्त व्हायच्या आधी काय ओसरावे मी ?

मारलीस तू बाजी; मान्य हे, तरीसुद्धा-
खेळलोच नाही तर सांग का हरावे मी ?

भोवती किती गर्दी...आतही किती गर्दी....
एकटेपणाखाली रोज चेंगरावे मी !!
हे तीनही शेर आवडले. 'वेड पांघरावे' नीट अर्थ लागला नाही.
ठेका छानः   ला ल ला ल ल ल्ल ल्ला     ला ल ला ल ल ल्ल ल्ला
कलोअ चूभूद्याघ्या

प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार.

मैफलीत या गाणे ऐकवून झाले की...
वाजतील टाळ्या अन् त्या क्षणी मरावे मी !

येथल्या शहाण्यांची वाटते मला भीती !
मी दिसू नये त्यांना...वेड पांघरावे मी !!

लागल्यावरी हाती चांदणी मला माझी
सूर्य-चंद्र-ताऱ्यांचे विश्व ठोकरावे मी !

सगळेच शेर आवडले.....

गा ल गा ल गा गा गा ....गा ल गा ल गा गा गा
ओसरावे मी अतिशय आवडला.
प्रदीपसाहेब?
एक सांगावेत अशी विनंती!
आपल्या समजा वर्षभरातल्या गझला घेतल्या तर त्यात 'तू' ही एक व्यक्ती प्रकर्षाने जाणवते.
तीन उदाहरणे खालीलप्रमाणे:
तू कशी जाशील कवितेतून माझ्या?
तुझ्यापरी निलाजरेपणा कुणी करायचा?
इतक्यात हा असा तू का गोंधळून जाशी?
आणखीही उदाहरणे मिळू शकतील.
वरील गझलेतही 'तू' आहेच!
आपण 'गझल वजा तू' अशी एक गझल करावीत अशी विनंती!
 

प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार.

मी कुठे किनाऱ्यांशी खेळलो मनाजोगे ?
तृप्त व्हायच्या आधी काय ओसरावे मी ?
वाव्वा.

येथल्या शहाण्यांची वाटते मला भीती !
मी दिसू नये त्यांना...वेड पांघरावे मी !!
वाव्वा. क्या बात है.
एकंदर गझल आवडली.

तिलकधारी, तुमच्या ह्या 'मी' आणि 'तू'ला काही अर्थ नाही.  असो. अनेक टोपणनावे (डुप्लिकेट आयडी ) घेऊन वावरण्यावर लवकरच प्रतिबंध आणायला हवा.

भोवती किती गर्दी...आतही किती गर्दी....
एकटेपणाखाली रोज चेंगरावे मी !!
शेर आवडला.