सीमेवरती...

उभी राहिली जेंव्हा नाती सीमेवरती
क्षणात घडली, क्षणात विरली ... सीमेवरती


जिला ठेविले हृदयामधुनी जन्मोजन्मी
ठरवत होतो भेट घ्यायची ... सीमेवरती


थंड मनाने घरीच ती झोपली सुखाने
तेंव्हा उठल्या ज्वाळा काही ... सीमेवरती


मनामनांची भाषा ज्यांना समजत नाही
ते करती विश्वाची होळी ... सीमेवरती


अन्यायाला वाचा फुटते कणाकणातुन
ठरत नसे इथली की तिथली ... सीमेवरती


नकळत जेंव्हा सर्वस्वाला देउन बसलो
तिने ठेविले हृदयाच्याही ... सीमेवरती


देउन अपुल्या हृदयाला ती मला म्हणाली,
'भेटत जाऊ रोज... पण तरी ... सीमेवरती'

गझल: 

प्रतिसाद

चांगली आहे गझल.
काही ठिकाणी 'सीमेवरती' असणे हे आमच्या डोक्यावरतून गेले.
उदा:

जिला ठेविले हृदयामधुनी जन्मोजन्मी
ठरवत होतो भेट घ्यायची ... सीमेवरती
- कोणत्या 'सीमेवरती' भेट घेणार होतात हे समजले नाही.
थंड मनाने घरीच ती झोपली सुखाने
तेंव्हा उठल्या ज्वाळा काही ... सीमेवरती
- इथेपण तसेच झाले. ही 'सीमा' काही तरी गूढबिढ आहे की काय असे वाटून गेले आम्हाला.

पण गझलेची एकंदर लय छान आहे. वाचताना मजा येते.
अधूनमधून 'वीरझारा', 'LOC' ची आठवण सोडली तर 'बॉर्डर' ब-यापैकी यशस्वी झाली आहे तुमची.
कळावे,
आपला गझलग्रस्त.

नकळत जेंव्हा सर्वस्वाला देउन बसलो
तिने ठेविले हृदयाच्याही ... सीमेवरती...हा चांगला शेर आहे.
मतला, मक्ताही खास.

मतला अन अन्यायाला वाचा हे शेर आवडले.

नकळत जेंव्हा सर्वस्वाला देउन बसलो
तिने ठेविले हृदयाच्याही ... सीमेवरती.

मनामनांची भाषा ज्यांना समजत नाही
ते करती विश्वाची होळी ... सीमेवरती
आवडला  शेर.

वर्तमानपत्रातील 'ती' बातमी वाचून मतला आणि होळी लगेच सुचले. फक्त बाज वेगळा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्ञानेश, भूषण, समीर, सुनेत्रा..
 धन्यवाद!
कलोअ चूभूद्याघ्या

हे देशाच्याच नाही तर राज्यांच्या सीमेवरही घडू शकते.
मा. गझलग्रस्त, आपला प्रतिसाद उशिरा दिसला की आला आहे...
ठरवत होतो भेट घ्यायची ... सीमेवरती
जी हृदयांत आहे ती 'सीमेवरती' म्हणजेच अंतर ठेवूनच भेटेल असे वाटते.

थंड मनाने घरीच ती झोपली सुखाने
तेंव्हा उठल्या ज्वाळा काही ... सीमेवरती
कारण, मी तिथे आलो होतो.
आता तुम्ही मा.भूषण यांच्याप्रमाणे म्हणाल की यातून हे कुठे स्पष्ट होते? पण, हे काव्य आहे (निबंध नाही) असे मला वाटते. असो. हे चालूच राहणार...
धन्यवाद!
कलोअ चूभूद्याघ्या

अजय,
मी असे ठरवले होते की जेवढे स्वतःला आवडले तेवढेच आवडले असे लिहायचे. पण गझलग्रस्तांना प्रतिसाद देताना आपण मला चर्चेत खेचले आहेत. त्यामुळे मला विस्तृत प्रतिसाद देणे भाग पडत आहे.
माझा पहिल्यापासून एकच मुद्दा आहे की कविता ही फक्त कवीला कळणारी नसावी. ( येथे आपण पुन्हा 'रसिक ना त्या ताकदीचा' हा माझा शेर लिहू शकता, पण तेवढ्याने होणार नाही ). कवी जे लिहितो त्यातुन त्याला स्वतःला एक अर्थ अभिप्रेत असतो. समजा तो रसिकाला भासला नाही, तरी रसिकाला एक अर्थ भासावा लागतो. ते झाल्यावर तो अर्थ रसिकाला आवडावा लागतो.
माझ्यामते कविता म्हणजे कवीला हवे त्या शब्दात हवे त्या गोष्टींचे व्यक्तीकरण नाही. ( तसा अर्थ जो घेतो त्याला रचना 'जाहीर' करण्याचे कारणच काय? त्या त्याने स्वतःपुरत्या ठेवाव्यात. ) ज्या रचना जाहीर केल्या जातात त्या जाहीर करण्यामागे मूळ हेतूच हा असतो की त्या कुणीतरी वाचाव्यात किंवा ऐकाव्यात. मग अर्थातच दुसरा हेतू हा असतो की त्या कुणालातरी आवडाव्यात.  ( असा हेतू असेलच असे नाही, पण बहुतांशी असतो )
जर रचना दुसर्‍याने वाचाव्यात व त्याला आवडाव्यात असे हेतू असतील, तर कवीला अभिप्रेत असलेला अर्थ किंवा दुसरा कुठलातरी अर्थ हा अतिशय स्वच्छ असलाच पाहिजे व तो भावणारा असावा असा कवीचा प्रयत्न असलाच पाहिजे असे माझे मत आहे. पहा:
 
उभी राहिली जेंव्हा नाती सीमेवरती
क्षणात घडली, क्षणात विरली ... सीमेवरती
( मला जाणवलेला अर्थ - अर्जून..युद्धापुर्वीची त्याची मनस्थिती )

जिला ठेविले हृदयामधुनी जन्मोजन्मी
ठरवत होतो भेट घ्यायची ... सीमेवरती
( इथे सीमेवरतीचे प्रयोजन मला समजले नाही )

थंड मनाने घरीच ती झोपली सुखाने
तेंव्हा उठल्या ज्वाळा काही ... सीमेवरती
( सीमेवरतीचे प्रयोजन मला समजले नाही )

मनामनांची भाषा ज्यांना समजत नाही
ते करती विश्वाची होळी ... सीमेवरती ( आंतरराष्ट्रीय सीमा असे मला वाटते )

अन्यायाला वाचा फुटते कणाकणातुन
ठरत नसे इथली की तिथली ... सीमेवरती ( आंतरराष्ट्रीय वा आंतरराज्यीय सीमा )

नकळत जेंव्हा सर्वस्वाला देउन बसलो
तिने ठेविले हृदयाच्याही ... सीमेवरती ( समजले )

देउन अपुल्या हृदयाला ती मला म्हणाली,
'भेटत जाऊ रोज... पण तरी ... सीमेवरती' ( इथे सीमा ही गावाची किंवा मनाची असावी )
शेवटच्या दोन शेरांमधे ( आपण जी चर्चा उपस्थित केली होतीत त्या अनुषंगाने ) माझ्या मते गझलेचा आशय आहे. इतरत्र मला तो जानवला नाही. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. आता आपणच कृपया न समजलेल्या तसेच समजलेल्या शेरांचा अर्था सांगावात म्हणजे चर्चा फळाला येईल.

धन्यवाद!

जिला ठेविले हृदयामधुनी जन्मोजन्मी
ठरवत होतो भेट घ्यायची ... सीमेवरती
जी माझ्या हृदयांत जन्मोजन्मी राहते आहे तिची भेट घेण्याचे मी ठरवत आहे. पण, सीमीवरती - म्हणजे अंतर राखून, मर्यादा राखून. म्हणजे इतके जन्म झाले तरी मी ठरवतच आहे अजुन. आणि तेही अंतर ठेवून. (इथे सीमा याचा अर्थ - दोन घरे, राज्य, मने, भावना, भाषा, संस्कार, परंपरा, इत्यादी कोणतीही सीमा घ्या.)

थंड मनाने घरीच ती झोपली सुखाने
तेंव्हा उठल्या ज्वाळा काही ... सीमेवरती
या ठिकाणी 'सीमेवरती' चे प्रयोजन.
१. ती माझा विचार न करता थंड मनाने झोपली आणि मी तिच्या घरी, गावी, हृदयापर्यंत पोचलो - पण आत शिरू शकलो नाही. माझ्या मनातील धगधग सीमेवरच राहिली.
२. ती झोपलेली पाहून मला राग आला - मी निघालो - पण सीमेवरच कल्लोळ करीत राहिलो.
३. माणसे जेंव्हा सुखाने घरी झोपली होती तेंव्हा स्वार्थ साधण्यासाठी कोणीतरी सीमा पेटवली.
४. इत्यादी.


मनामनांची भाषा ज्यांना समजत नाही
ते करती विश्वाची होळी ... सीमेवरती
येथे 'विश्व' याचा अर्थ - भावनांचे विश्व असाही होत नाही का? प्रियकराला प्रेयसीच्या मनातले किंवा तिला त्याच्या मनातले समजत नसेल तर तर ते आक्रस्ताळे पणाच करतील (दोन मनांच्या सीमेवरची ही घटना आहे). (संशयकल्लोळ नाटक पहा.) 'विश्व' हा शब्द होळी करणा-यासाठी नव्हे तर ज्याच्या मनाची भाषा त्याला समजत नाही त्याच्या विश्वाची होळी हा करतो.
अरे.. किती सांगू! जेवढे अर्थ काढाल तेवढे आहेत.

मा. भूषण,
मतल्यात अर्जून माझ्या डोक्यांतच आला नव्हता. तुम्ही आणखी एक रंग दिलात. धन्यवाद.
सीमा याचा अर्थ मर्यादा - अंतर असाही होतो. ('बोलताना सीमा ओलांडू नका ' असे सांगितले जाते.)

मला सीमावाद पाहूनच ओळी सुचल्या. पण, त्याला स्वरूप मी वेगळे दिले.

कलोअ चूभूद्याघ्या


मा. अजय,
माफ करा. पण आपली काही मते पटली नाहीत.
जिला ठेविले हृदयामधुनी जन्मोजन्मी
ठरवत होतो भेट घ्यायची ... सीमेवरती
येथे आपण म्हणता तसे 'तरीही सीमेवरतीच भेटायचे ठरवत होतो' यातील 'तरीही' या शब्दाचा अभाव आशयात जाणवतो आहे. या शेरात 'जिला' या शब्दानंतर 'तिला' या शब्दाची आवश्यकता भासण्याची परिस्थिती निर्माण होते. म्हणजे 'जिला' ऐवजी 'जरी' असते तर 'तरीही' या शब्दाचा तितका अभाव जाणवला नसता.तसेच 'घरे, राज्य, मने, भावना, भाषा, संस्कार व परंपरा' या 'सीमेवरती' शब्दातून आपल्याला अभिप्रेत असलेल्या अनेक अर्थांपैकी फक्त 'भावना' व 'संस्कार' हे अर्थ बसू शकतील.
कारणे:
१. घरांच्या सीमेवर भेटताना हृदयात ठेवण्यामध्ये ट्विस्ट येत नाही. जिला लोक हृदयामध्ये ठेवतात, तिला घराच्या सीमेवरही भेटू शकतात, जर एकमेकांच्या घरी जाणे शक्य नसेल तर ( 'एक दुजे के लिये' सारखे ). ज्यात 'ती'ही तुम्हाला हृदयात ठेवू शकत असेल.
२. तसेच राज्यांचे. 'राज्य' या शब्दामधून आपण कुणालातरी परकीला हृदयात ठेवले असावे असेही वाटेल.
३. मनांच्या सीमेवरती - मनाला सीमा नसते असे म्हणतात. काल्पनिक सीमा गृहीत धरली तरी हृदय अन मन हे दोन्ही शब्द आपण एकाच अर्थाने घेतलेले दिसत आहेत. म्हणजे जिला हृदयात ठेवले तिला मनाच्या सीमेवर भेटायचे ठरवत होतो. हे बर्‍यापैकी सीधेसाधे विधान होऊ शकेल.
४. भाषा - ही जर मनांची भाषा असेल तर ठीक! पण आपण तसे म्हंटलेले दिसत नाही. ( निळे वगैरेही केलेले नाही, ज्याने मला तसे वाटावे, जसे 'आजोबांसाठी' केले होतेत, हा हा  ) बोली भाषा असल्यास त्याच्या सीमेवर भेटणे म्हणजे कमल हसनची आई अन रती अग्निहोत्रीचे वडील भेटायचे ठरवत आहेत असे वाटेल. ( पुन्हा एक दुजे के लियेचे उदाहरण सुचले )
५. संस्कारांच्या सीमेवर हा अर्थ उत्कृष्ठ आहे.
६. भावनांच्या सीमेवरती हा अर्थही उत्कृष्ठ आहे.
७. परंपरांच्या सीमेवरती - हे राज्याच्या अथवा भाषेच्या सीमेपेक्षा वेगळे वाटत नाही.
पण मुळातच 'तरीही' असे करत होतो हे भासत नसल्यामुळे 'सीमा' कशाची आहे हा प्रश्न उपस्थित होउ नये.
थंड मनाने घरीच ती झोपली सुखाने
तेंव्हा उठल्या ज्वाळा काही ... सीमेवरती

यातील आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थांपैकी ती शांतपणे झोपली होती अन मी मात्र त्रासलेलो होतो हे जाणवत असले तरी  ती सीमा गाव, मन, वगैरेची आहे हे भासत नाही. ते स्पष्ट होणे आवश्यक आहे असे माझे मत आहे.  तसेच, सीमेवरती ज्वाळा उठल्या होत्या याचे कारण समजत नाही. अशा परिस्थितीत कवीच्या हृदयात ज्वाळा उठल्या पाहिजेत. सर्वात महत्वाचे म्हणजे 'माणसे झोपलेली असताना स्वार्थी लोकांनी आग लावली' हे त्यातून मला तरी अजिबात जाणवत नाही.
मनामनांची भाषा ज्यांना समजत नाही
ते करती विश्वाची होळी ... सीमेवरती

 आपण म्हणता की ही दोन मनांच्या सीमेवरची घटना आहे. एका मनाची भावना किंवा भाषा दुसर्‍या मनाला समजली नाही तर ते आक्रस्ताळेपणा करून 'भावविश्वाची' होळी करेल. मान्य! पण ती होळी मनाच्या सीमेवरती होईल म्हणजे काय? ती होळी तर अख्ख्या आयुष्याचीच होईल! म्हणजे वरवर होळी झाल्यासारखे वाटले पण आत धग लागली नाही असे कसे होईल?
इतर मुद्दे:
१. जेवढे काढाल तेवढे अर्थ आहेत हे विधान मला पटत नाही. कारण तसे कशातुनही काहीही अर्थ काढता येतात. कवी त्याच्या कविता या माध्यमातून स्वच्छ दिसावा अशा आग्रही मताचा मी आहे. माझ्या विधानाच्या पुष्ट्यर्थ मी एक शेर लिहीत आहे.
वैभव जोशी यांचा हा शेर पहा:
रिते आकाश निरखावे तसा माझा तुला चाळा
उद्या येईल कंटाळा, उद्या संपेल नवलाई
आपल्या अर्थांच्या व्याख्येप्रमाणे जर काढाल तेवढे अर्थ असतात हे मान्य केले तरः
१. कवी प्रेयसीला म्हणत आहे.
२. कवी आकाशालाच म्हणत आहे.
३. कवी स्वतःला म्हणत आहे.
४. आमदार वॉर्डातल्या नागरिकांना म्हणत आहे.
५. आकाश म्हणजे प्रेयसीचे केस सुद्धा म्हणता येईल. प्रेयसी आपल्या केसांची सावली कवीच्या तोंडावर टाकून हे वाक्य म्हणत आहे.
६. कंटाळा हा प्रातिनिधिक शब्दही म्हणता येईल, कंटाळा म्हणजे अगदी कंटाळाच असे नाही, तो वैतागही असू शकतो, तत्क्षणी आलेला रागही असू शकतो वगैरे!
७. कवी हे जीवनाला म्हणत आहे.
८. मंदिरातील देव भक्ताला म्हणत आहे.
असे अनेक अर्थ 'काढायचे' झाले तर 'काढता' येतात. पण त्यातही कवीला अभिप्रेत असलेला किंवा पटकन जाणवणारा अर्थ महत्वाचा! जसे वरील ओळीनंतर, हे प्रेयसीला म्हणणे, स्वतःला म्हणणे अन जीवनाला म्हणणे आहे, असे किंवा यापैकी एक अर्थ बहुतांशी लोक घेतील.
या दृष्टीने जर आपण आपल्या शेरांचे अर्थ बघितलेत तर मला असे वाटते की काही वेळा आपल्याला अभिप्रेत असणारे अर्थ नेमके प्रकट होत नसावेत किंवा मला तरी जाणवत नाहीत.
असो. मला असे वाटते की अशा चर्चेतून माझा काहीतरी फायदा होईल म्हणुन लिहिले. राग मानू नये.
धन्यवाद!

अशी तर चर्चा कधीच संपणार नाही. तरीही हा शेवटचा प्रयत्न...
ज्यावेळी माणसाला सीमा ओलांडून जाण्याचे धैर्य नसते त्यावेळी तो सीमेवरच काही ना काही करीत राहतो. यासाठी माझ्याच लहानपणचे गम्मतशीर उदाहरण सांगतो.
आम्ही काही मुले गल्लीत क्रिकेट खेळत असू. पण हे एका बाईंना आवडायचे नाही. म्हणून आपल्या घरातूनच त्या अम्हाला शिव्या घालायच्या. नंतर त्यांनी अशी गम्मत सुरू केली की त्यांच्या घराच्या पायरीवर त्या कमीतकमी ४ बादल्यातरी पाणी ओतायच्या. जेणेकरून ते पाणी वहात आमच्या पीचवर येईल आणि आमचे खेळणे थांबेल. वर त्या असेही म्हणायच्या की मला कुणाच्या बापाची भीती नाही. मी माझ्याच पायरीवर पाणी ओतले आहे. तसेच,
मनामनाची भाषा न समजणारे, मनात डोकावू शकणार नाहीत किंवा ते मन बदलूही शकणार नाहीत. अशा वेळेला ते काय करतील बापडे? जेथपर्यंत हक्क आहे तेथपर्यंत येऊन हैदोस घालतील (विश्वाची होळी).
ज्वाळांबद्दल : ती जेंव्हा थंड मनाने घरी झोपली होती तेंव्हा सीमेवर ज्वाळा उठल्या - एवढेतरी समजायला काहीच हरकत नाही. आता - ज्वाळा कुठल्या, घर कुठले, सीमा कुठली हा विचार वेगळाच करायला लागेल.
'रसिक ना त्या ताकदीचा' हे यावेळी मी सांगणार नाही. कारण मुळात ही ओळदेखील तितकी स्पष्ट नाही. (ताकदीचा रसिक नसल्यामुळे शायरी व्यर्थ आहे.) यात 'नसल्यामुळे' असे गृहीतच धरावे लागत आहे. अन्यथा, रसिक ना त्या ताकदीचा आणि व्यर्थ सारी शायरी ही दोन वेगवेगळी विधाने आहेत. 'ना त्या' याचा अर्थ नसल्यामुळे असा होत नाही. पण, कवीचे हृदय जाणून समजून घेतले आहे.
ही चर्चा माझ्यालेखी मी इथेच संपवतो.
कलोअ चूभूद्याघ्या