ही तुझी माझीच आहे गोष्ट पण

चेहरा सारे खरे ते सांगतो
याचसाठी आरसा मी टाळतो


वेगळे घडणार अंती जाणतो
मी तरी अंदाज माझे बाधतो

कोंडली मी वादळे माझ्यामध्ये
फुंकरीने मात्र मी घायाळतो


माळरानावर मनाच्या एकटा
मी कुणाची वाट आहे पाहतो


यायची असतेस तेव्हा का मला
काळ थोडा थांबल्यागत वाटतो


एवढा साधा नसावा प्रश्न तो!
उत्तराला वेळ आहे लागतो


ही तुझी माझीच आहे गोष्ट पण
नाव मी बदलून आता सांगतो


मी इथे हल्ली खुळ्या गत एकटा
आठवांच्या या स्मशानी हिंडतो

-अनिरुद्ध अभ्यंकर

गझल: 

प्रतिसाद

यायची असतेस तेव्हा का मला
काळ थोडा थांबल्यागत वाटतो

कोंडली मी वादळे माझ्यामध्ये
फुंकरीने मात्र मी घायाळतो.. वा वा!!
एवढा साधा नसावा प्रश्न तो!
उत्तराला वेळ आहे लागतो... मस्त आशय.,,
-मानस६

जबरदस्त गझल!
प्रशासनाला एक विनंती ! नवीन गझला पहिल्या पानावर आल्या तर बरे होईल. नाहीतर बघितल्याच गेल्या नाहीत असे व्हायचे.
अतिशय सुंदर गझल!

संपूर्ण गझल अप्रतिम. परत परत वाचावीशी  वाटते.

उत्तर आणि वादळ हे शेर आवडले!
वादळावरून माझा एक शेर आठवला -
वादळांसाठी घडवले काळजाला
मंद वारा नेहमी झोंबून गेला

'मी' हे अक्षर किती वेळा यावे याला मर्यादा नसतात अन नसाव्यात! पण तरी फार वेळा आले आहे असे वाटले. पणं बेहतरीन खयाल!

आंदाज हा शब्द चुकीचा आहे असे वाटले. गझल खरच आवडली.

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर

आवडली.
माळरानावर मनाच्या एकटा
मी कुणाची वाट आहे पाहतो
मनाच्या माळरानावर मी एकटा(च) कुणाची वाट पाहतो आहे.    यात ताकद कमी पडली असे वाटते आहे. बाकी सर्वसाधारण ठीक आहे.
कलोअ चूभूद्याघ्या