गझलेचा आजार हवा


प्रिये तुला मी सांगुन थकलो प्रेमाचा बाजार हवा
'प्रेम' शब्द ना पुरतो... आता.. शब्दांचा भडिमार हवा

ऐकाया तू आज नसे, पण तशी मलाही खंत नसे
कारण हृदयीं मल्हाराला ऐकुन होते गार हवा

तार छेडता आठवणींची दोन स्वरांच्या खेळाला...
रोज वाटते षड्जासाठी फक्त तुझा गंधार हवा

चंद्र रातचा बहरुन जाता मिळु दे कोणा संजिवनी
पहाट होता पानफुलांना दवासारखा यार हवा

वाद घाल तू रोज कितीही वा काही बोलूच नको
शब्द असू दे उणे-थिटे, पण प्रेमाला आकार हवा

रोज तुला पाहतो जरासे काठावरती फिरताना
उतर कधी पाण्यामध्ये.. तुज देतो जो आधार हवा

'ऐवज' सारा माझ्यापुढती मांडुन कोणी गेले गं...
शब्द नको चमचमते त्यांचे फक्त तुझा होकार हवा

शब्द कुणाचे जखमी करती तेंव्हा येशी भेटाया
रोज तुला भेटण्या मलाही गझलेचा आजार हवा


गझल: 

प्रतिसाद

अजय,
व्वा! गझलेचा आजार हवा. काय तमन्ना आहे! आधार, आकार, होकार अन आजार हे चारही शेर आवडले. 'गार हवा' काही समजला नाही. ( मला एखादातरी शेर 'समजला नाही' असे होतेच. उपचार चालू आहेत. बघू...) शब्द कुणाचे जख्मी करती तेव्हा येशी भेटाया...छान !
दवासारखा यार हवा ही ओळ म्हणताना फार छान वाटते.
 
 
 

आवडली गझल !

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
प्रा. डौ. दिलीप बिरूटे यांचे विशेष आभार. वेळात वेळ काढून दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कलोअ चूभूद्याघ्या

प्रतिसादाबद्दल प्रथम धन्यवाद.

ऐकाया तू आज नसे, पण तशी मलाही खंत नसे
कारण हृदयीं मल्हाराला ऐकुन होते गार हवा

यामध्ये, जीवाला थंड करण्यासाठी तू समोर नसलीस तरी तूझ्या आठवणींच्या मल्हाराची धून हृदयांत ऐकू येते आणि 'गार' - (बरे) वाटते असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणखीही विचार आहेतच. ते शोधून काढा.
कलोअ चूभूद्याघ्या

ही गझल  चांगली या सदरात घेता येईल.
तार छेडता आठवणींची दोन स्वरांच्या खेळाला...
रोज वाटते षड्जासाठी फक्त तुझा गंधार हवा
हे फारच सुंदर आहे. ज्यांना संगीत थोडे-फार कळते त्यांना चटकन लक्षात येईल.
संगीतामध्ये वादी आणि संवादी अशी संकल्पना आहे. मुख्य स्वर आणि उपमुख्य म्हणा हवे तर अशी ही जोडी मानली आहे. असो. संगीत रसिकांना माहीत असेलच.

तुमची प्रिया कल्पनेतली आहे की वास्तवातली हे मला माहीत नाही.
पण, संवादात्मकतेमुळे ही गझल आकर्षक वाटते.
गझलेचा आजार हवा - ही संकल्पना सुंदर.
प्रतिसादांचा विचार करू नका. चांगले लिहीत रहा.
नववर्षाच्या शुभेच्छा!
(तसा मी फारसा बोलत नाही.)

प्रिये तुला मी सांगुन थकलो प्रेमाचा बाजार हवा
'प्रेम' शब्द ना पुरतो... आता.. शब्दांचा भडिमार हवा

ऐकाया तू आज नसे, पण तशी मलाही खंत नसे
कारण हृदयीं मल्हाराला ऐकुन होते गार हवा

तार छेडता आठवणींची दोन स्वरांच्या खेळाला...
रोज वाटते षड्जासाठी फक्त तुझा गंधार हवा

वाद घाल तू रोज कितीही वा काही बोलूच नको
शब्द असू दे उणे-थिटे, पण प्रेमाला आकार हवा

रोज तुला पाहतो जरासे काठावरती फिरताना
उतर कधी पाण्यामध्ये.. तुज देतो जो आधार हवा

'ऐवज' सारा माझ्यापुढती मांडुन कोणी गेले गं...
शब्द नको चमचमते त्यांचे फक्त तुझा होकार हवा

शब्द कुणाचे जखमी करती तेंव्हा येशी भेटाया
रोज तुला भेटण्या मलाही गझलेचा आजार हवा

गझलेचा आजार हवा - सुंदर कल्पना आहे.