'ळ' ची जुळवाजुळव
पुन्हा विझवा, पुन्हा जाळा, पुन्हा विझवून मन जाळा
किती कामे, तिला विसरा, तिची ती आठवण टाळा
तिचा स्वप्नात येण्याचा भरवसा फारसा नाही
इथे सत्यात अपमानीत व्हा, पुरते वचन पाळा
असेही एरवी वागा जणू कोणीच नाही ती
नि वर झालीच जर नजरानजर तर धाडकन भाळा
कुणाला काय बोलावे तिला शिकवा कुणी आता
"तुझाही रंग आहे एक" म्हणते "यार पण, काळा"
मते एकाच गोष्टीवर तिची जुळतात माझ्याशी
मला माझा, तिलाही नेमका माझाच कंटाळा
गझल:
प्रतिसाद
सुनेत्रा सुभाष
मंगळ, 09/12/2008 - 09:01
Permalink
वाह!
वाह! क्या बात है! पाचही शेर शेरच आहेत.
गंभीर समीक्षक
मंगळ, 09/12/2008 - 17:10
Permalink
शीर्षक!
पुन्हा विझवा, पुन्हा जाळा, पुन्हा विझवून मन जाळा
किती कामे, तिला विसरा, तिची ती आठवण टाळा
गझलेचे शीर्षक खरे तर नसाचेच. पण असले तर ते आकर्षक असावे. 'ळ' ची जुळवाजुळव म्हंटल्यावर आधी क्लिक करतानाच कवीला आत्मविश्वास नसावा असे मनात येते. भग्नहृदयी माणसाची व्यथा मांडताना कवीने ठीक मनोवृत्ती दाखवली आहे. तिला विसरा व तिची आठवण टाळा या दोन्ही गोष्टी समान असूनही 'किती कामे' हा शब्दप्रयोग करण्यातुन एक दिसून येते की क्षणाक्षणाला तिला विसरण्याचा प्रयत्न करणे हेच आता कवीचे काम राहिले आहे. मतला ताकदवान नाही. म्हणजे असे की गझल रचताना पहिल्या ओळीत काहीतरी असे सांगायचे ज्याने उत्कंठा निर्माण व्हायला पाहिजे की दुसर्या ओळीत काय सांगीतले आहे आणि दुसरी ओळ ऐकल्यावर असे वाटले पाहिजे की 'ओह्..ओ असे म्हणायचे होते होय?' इथे पहिल्या ओळीत थोडीशी उत्सुकता निर्माण होते खरी पण थोडा अंदाजही येतो की हे प्रेमाबद्दल असावे अन तो अंदाज खरा ठरताना मात्र फारसा आकर्षकपणे खरा ठरत नाही.
तिचा स्वप्नात येण्याचा भरवसा फारसा नाही
इथे सत्यात अपमानीत व्हा, पुरते वचन पाळा
याही शेरात दुसरी ओळ अजून उंचीवर नेता आली असती. 'तरी झोपून बघतो, आपले आपण वचन पाळा' वगैरे जरा बरे झाले असते. सत्यात अपमानीत व्हा म्हणजे काय ते नक्की लक्षात येत नाही. कवी प्रेम व्यक्त करायला गेल्यास त्याला अपमानीत केले जात असावे हे वाटू शकते, पण तरी 'अपमानीत' हा शब्द जरा वेगळाच वाटतो.
असेही एरवी वागा जणू कोणीच नाही ती
नि वर झालीच जर नजरानजर तर धाडकन भाळा
चांगला शेर! 'धाडकन' हा शब्द का घेतला आहे ते जरा बघायला लागेल.
कुणाला काय बोलावे तिला शिकवा कुणी आता
"तुझाही रंग आहे एक" म्हणते "यार पण, काळा"
गझलेत पाच शेर असावेत या नियमाला अनुसरून हा शेर ओवला असावा असे वाटते. पण एक मात्र आहे, गझलेतील प्रत्येक शेर स्वतंत्र असतो या नियमाने फक्त हाच शेर वाचला तर तो जरा दिलचस्प जरूर वाटेल. पण आधीच्या इतर शेरांबरोबर ( म्हणजे अपमानीत वगैरे ) तो कितपत बसतो ते बघायला पाहिजे. म्हणजे जर कवीचा अपमान होत असेल तर त्याचा रंग काळा आहे वगैरे सांगण्यापर्यंत मजल जाणारच नाही.
मते एकाच गोष्टीवर तिची जुळतात माझ्याशी
मला माझा, तिलाही नेमका माझाच कंटाळा
हा मात्र खरोखरच चांगला शेर आहे. कवीने व्यथा फार सुंदर पद्धतीने मांडली आहे.
'ळ' चीच जुळवाजुळव करायची असल्यास माळा, वाळा, चाळा, टाळा ( कुलुप या अर्थाने ) असे अनेक शब्द होते. पण मर्यादीत शेर रचले आहेत असे दिसते.
Dhananjay Borde
बुध, 10/12/2008 - 18:11
Permalink
ंMast
बहुत उम्दा!
मते एकाच गोष्टीवर तिची जुळतात माझ्याशी
मला माझा, तिलाही नेमका माझाच कंटाळा
क्या बात है! Ye hasil-e-ghazal sher hai! सहज आणि नेमका!
For listeners like us, please, add some more shers in the ghazal whenever you can and then do share with us.
regards,
ज्ञानेश.
बुध, 10/12/2008 - 18:48
Permalink
शेवटचा शेर
शेवटचा शेर इतका अप्रतिम आहे, की बाकीचे सगळे शेर त्या शेरापर्यंत येण्यासाठीच रचले गेलेत, असा संशय यावा... चूभूद्याघ्या.
मते एकाच गोष्टीवर तिची जुळतात माझ्याशी
मला माझा, तिलाही नेमका माझाच कंटाळा..
क्लास!
चित्तरंजन भट
बुध, 17/12/2008 - 16:28
Permalink
मला माझा, तिलाही नेमका माझाच कंटाळा
मते एकाच गोष्टीवर तिची जुळतात माझ्याशी
मला माझा, तिलाही नेमका माझाच कंटाळा
वाव्वा! मस्त!! ज्ञानेशरावांशी सहमत आहे.
अजय अनंत जोशी
बुध, 17/12/2008 - 21:51
Permalink
उत्तम जुळवाजुळव
पण 'ळ' ची नाही तर शेरांची.
कलोअ चूभूद्याघ्या
अहंकारी
गुरु, 18/12/2008 - 00:47
Permalink
अपयश!
बहुसंख्य गझला व बहुसंख्य शेर चांगले असले पाहिजेत. एखादी गझल किंवा एखादा शेर नाही!
समीक्षकांना 'अपमानीत' म्हणजे काय हे समजत नाही हे त्यांचे अपयश आहे.
भूषण कटककर
गुरु, 18/12/2008 - 20:08
Permalink
स्पष्टीकरणाचा प्रयत्न!
सुनेत्रा, ज्ञानेश, धनंजय, अजय सर्वांना मनापासून धन्यवाद!
गंभीर समीक्षक -
अपमानीत - आपण सुचवलेला बदल जास्त चांगला वाटतो हे खरे!
धाडकन - नजरानजर क्षणभराचीच आहे, भाळायला वेळच नाही, त्यातही भाळायची किंवा भाळायला कारणीभूत ठरेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची फारच उत्कंठा, अशा परिस्थितीत प्रियकराचे ह्रुदय 'धाडकनच' भाळणार असे वाटल्यामुळे तो शब्द घेतला आहे.
काळा - पाच शेर होण्यासाठी - मला शेर रचतानातरी संख्याभरतीचा विचार आला नव्हता. शेर किरकोळ होणे हे माझे अपयश आहे. पण पाच शेर होण्यासाठी हा शेर रचला नाही हे मात्र प्रामाणिकपणे सांगतो.
चित्तरंजन - मधेमधेच आपला प्रतिसाद येतो अन सुखावून जातो. धन्यवाद!
श्रीनिवास (not verified)
शनि, 20/12/2008 - 23:59
Permalink
हेडींग असे काय?
'ळ' ची जुळवजुळव म्हणजे काय?
लिहिलेले आवडले. पण हेडींग समजले नाही.
अनंत ढवळे
गुरु, 25/12/2008 - 12:10
Permalink
मते एकाच
मते एकाच गोष्टीवर तिची जुळतात माझ्याशी
मला माझा, तिलाही नेमका माझाच कंटाळा
व्वा ! सुंदर शेर,
बाकी सुनेत्रा सुभाष, गंभीर समीक्षक, अहंकारी ई. एकाच व्यक्तीची टोपण नावे आहेत की काय अशी शंका येते.