मदारी


तू मदारी - खेळवीशी लीलया हे शब्द सारे
बघ कुणाचा जीव जातो, हा विखारी खेळ का रे?


चढवणे मी बंद केले - साहसी माझ्या शिडांना
वाहणे थांबून गेले आठवांचे भण्ण वारे


मोडले घरटेच त्याचे, पंखही उसवून जाती
भरवताना भावनांच्या चोचल्यांना चिमणचारे


ऐकतो की लांघले तू पावलांनी विश्व सारे
घे तुला आकाश माझे, घे तुला हे सूर्यतारे


येथ जो तो देव झाला, बांधतो अपुलीच पूजा
ईश आता मुक्त झाला, राऊळाची बंद दारे


 


गझल: 

प्रतिसाद

चढवणे मी बंद केले - साहसी माझ्या शिडांना
वाहणे थांबून गेले आठवांचे भण्ण वारे
- वा. कल्पना आवडली. पण दुसरी ओळ ' वाहता थांबून गेले आठवांचे भण्ण वारे' किंवा 'वाहणे विसरून गेले आठवांचे भण्ण वारे' अशी केली तर?

भाषेबद्दल बोलू शकत नाही. पण-
'वाहणे विसरून  गेले आठवांचे भण्ण वारे'
हे मला आवडले.
 
 

चढवणे मी बंद केले - साहसी माझ्या शिडांना
वाहणे थांबून गेले आठवांचे भण्ण वारे
मस्तच. भण्ण हा शब्द पहिल्यांदा ऐकला. बाकी कल्पनाही मस्त आहेत. सफाई येते आहे असे दिसते. उदा.

ऐकतो की लांघले तू पावलांनी विश्व सारे
घे तुला आकाश माझे, घे तुला हे सूर्यतारे
ईश ऐवजी पुन्हा देव आला तर काही बिघडत नाही.