किनारा

नि:शब्द किनार्‍यावर मी गुणगुणतो, फिरतो आहे
घेऊन हजारो लाटा दर्या किरकिरतो आहे

जे कागद हाती आले त्यांचे मी काय करावे?
कोराच विचार उद्याचा सध्या भिरभिरतो आहे

आत्ताच तुझ्या स्मरणांची मी राख ठेवली मागे
हा धूर तुझ्या आभासांचा हवेत विरतो आहे

संतांनी म्हटले वाटा आनंद जगाला सार्‍या
मी माझ्या उरल्यासुरल्या काळजास चिरतो आहे

माझ्या ह्या उथळपणाच्या चर्चांना शेवट नाही
जो तो हल्ली विषयाच्या खोलातच शिरतो आहे


गझल: 

प्रतिसाद

'कागद' व 'उथळपणा' मस्त.

मक्ता खूप आवडला. sagaLech sher chhaan zale aahet. मतल्यात गुणगुणतो ,, फिरतो आहे पेक्षा गुणगुणत फिरतो अशा अर्थाचे पण काफिया निभावणारे काही दुसरे घेता येणार नाही? मी योग्य बदल सुचवू शकत नाही:)

आत्ताच तुझ्या स्मरणांची मी राख ठेवली मागे
हा धूर तुझ्या आभासांचा हवेत विरतो आहे

वा! गझल आवडली.

गझल आवडली.
नि:शब्द किनार्‍यावर मी गुणगुणतो, फिरतो आहे
घेऊन हजारो लाटा दर्या किरकिरतो आहे
मतला आवडला.
जे कागद हाती आले त्यांचे मी काय करावे?
कोराच विचार उद्याचा सद्ध्या भिरभिरतो आहे
वा. सध्या ह्या शब्दात द् नसावा असे वाटते.
आत्ताच तुझ्या स्मरणांची मी राख ठेवली मागे
हा धूर तुझ्या आभासांचा हवेत विरतो आहे
सगळेच यती घ्यायला पाहिजेत असे नाही पण इथे आभासां आणि चा मधे यती आला तर मला वाचायला अधिक सोपे झाले असते.
'हा धूर तुझ्या भासांचा ह्या हवेत विरतो आहे' असे काहीसे?
शेर छान आहे.
संतांनी म्हटले वाटा आनंद जगाला सार्‍या
मी माझ्या उरल्यासुरल्या काळजास चिरतो आहे
पहिल्या वाचनात पहिली ओळ वाचायला अवघड गेली. दुसर्‍या वाचनात सोपी झाली. 'संतांनी म्हटले आहे - आनंद जगाला वाटा' असे काहीसे?
तुमचा शेर चांगला आहे. काळजास चिरणे मला व्यक्तिश: फारसे रुचत नाही :-)

माझ्या ह्या उथळपणाच्या चर्चांना शेवट नाही
जो तो हल्ली विषयाच्या खोलातच शिरतो आहे
शेर गमतीदार आहे. आवडला. उपहासाने म्हटले आहे का?
मराठीगझल.कॉम वर परखड मतांबद्दलची तुमची सूचना वाचली. म्हणून अधिक तपशीलाने प्रतिसाद देत आहे. चू भू द्या घ्या

पहिले २ शेर सफाईदार आणि मस्त आहे. २ रा विशेष आहे.  इतर शेरही चांगले आहेत. इतर शेरांत पुढच्या आवृत्तीत सफाई येईलच.

प्रणव काळ्यांनी संताच्या ओळीत सुचविलेला बदल चांगला आहे. कदाचित भरीचे शब्द नको म्हणून यतिभंग झाला असावा, असे वाटून गेले. असो. गझल चांगली आहे.

नि:शब्द किनार्‍यावर मी गुणगुणतो, फिरतो आहे
घेऊन हजारो लाटा दर्या किरकिरतो आहे
याचा अर्थ लागला नाही, दोन्ही ओळी कशा कनेक्टेड आहेत ते लक्षात नाही आले. सांगाल का!

वृत्त चांगले सांभाळले आहे. नि:शब्द किनारा आणि किरकिरणारा दर्या हा थोडासा विरोधाभास नाही वाटत का? चुकत असल्यास स्पष्ट करावे.

यतिभंग झाला आहे हे मान्य, भरीचा शब्द येऊ नये असे वाटल्याने यतिभंग होऊ दिला. आणखीही सुधारणा करता येईल. सहजपणे काही बदल सुचला तर बरे.
संतांनी म्हटले आहे - आनंद जगाला वाटा
हा बदल सहज आहे, पटला.

नि:शब्द किनारा याअर्थी की किनार्‍यावर कोणी नाही. कोणी नाही म्हणून मला कोणाशी बोलता येत नाही, मग मी केवळ गुणगुणतो आहे.
समुद्राला याचाही त्रास होतोय म्हणून तो किरकोरतो आहे. पण त्याच्या लाटांचा आवाज मात्र त्याच्या लक्षात येत नाही.

जे कागद हाती आले त्यांचे मी काय करावे?
कोराच विचार उद्याचा सध्या भिरभिरतो आहे
.............सुंदर !  प्रवाही ,आशय संपन्न आणि संयत गझल.