आगी लावणारे

शब्द आता संपले ओलावणारे
जे उरे, शब्दात ते ना मावणारे


वागणे वेड्यापरी ना रम्य वाटे
पाहिजे होते कुणी रागावणारे


अन्यथा मृत्यू कसा येणार सांगा?
शौक होवो प्रकृती खालावणारे


दे जरा संजीवनी, ये, घेउदेना
गंध त्या वक्षातले नादावणारे


दोन जाती माणसांच्या भूतली या
घालणारे घाव, कोणी चावणारे


धाडकन पडताच गर्दी काय झाली!
तेच खड्डे खोदती, जे धावणारे


तेवढे ठेवून घेतो दु:ख आम्ही
जेवढे ह्रदयात आहे मावणारे


मी न त्यांना पावतो, या कारणाने
देव माझा शोध घेती ,'पावणारे'


मैफिलीमध्ये मलाही घ्याल ना रे?
शेर माझे लोचने पाणावणारे!


गझल झाली, प्रेम झाले, उमर झाली
शोधुया धंदे चलारे फावणारे


एकही टिच्चून नाही राहिला रे
खूप होते या मनी डोकावणारे


जिंदगीमध्ये जराशी खोट वाटे
अंत गाई गीत आम्हा भावणारे


लावली आतून ज्यांनी आजवरती
तेच बाहेरून आगी लावणारे



 


 


 


 



 

गझल: 

प्रतिसाद

वागणे वेड्यापरी ना रम्य वाटे
पाहिजे होते कुणी रागावणारे ... हा शेर मस्तच.
तसेच- पावणारे, मावणारे व डोकावणारे.. हे पण!

भूषण?
असे करू नये.
मिळतील तेवढे काफिया घेऊन सुटायचे गझल करत म्हणजे ' परीक्षेत पास झाला का नाही यापेक्षा जास्तीतजास्त वेळा बसला' याला महत्व देण्यासारखे आहे की नाही?
बर आता सांग की दर्जेदार गझल का बरे करत नाहीस तू?
किती शेरांमधे मात्रापुर्तीसाठी 'रे' हे अक्षर घेतलेस? 'मैफिलीत घ्याल ना रे?' मधल्या रे प्रमाणे?
असे करणे म्हणजे सरकारी नोकरीमध्ये पाट्या टाकण्यासारखे आहे की नाही? मिळाले काफिया,  रदीफ, टाकली गझल करून!
असे नाही करू.
मी आपला साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणुन येतो. बर का?

ज्ञानेश, धन्यवाद.
तिलकधारी - आपण मला कृपया एक सांगावेत की मिळतील तेवढे काफिया घेऊन जरी गझल केली असली तरी शेर निरर्थक झाले आहेत काय? गझलेत असा नियम आहे काय की जास्तीतजास्त किती शेर असावेत?
बाकी आपण 'रे' याबद्दल जे म्हणताय ते पटतंय! प्रयत्न करीन आपल्याला आवडणारी गझल करण्याचा.
आपण प्रत्येक प्रतिसादाच्या शेवटी लिहिता की वातावरण खेळकर बनवण्यासाठी येता, तसे काही ओळीत 'रे' आले आहे खरे.
 
 

सर्व बाण आवडले. बाण खुष!

सुंदरच.
कलोअ चूभूद्याघ्या

वागणे वेड्यापरी ना रम्य वाटे
पाहिजे होते कुणी रागावणारे ...
दाद देण्यापूर्वी म्हटले पारखून घ्यावे, त्यामुळे उशीर झाला...
क्षमा असावी.

तेवढे ठेवून घेतो दु:ख आम्ही
जेवढे ह्रदयात आहे मावणारे

बाकी शेर यथातथा. मुद्दाम लिहायचे म्हणून लिहू नयेत.