जन्म हा

वाटला मला तरी सुखात जन्म हा
घेतलाय मानुषी जगात जन्म हा


रीत माहिती कुठे मला जगायची ..
तीच येथ शोधण्या दिलात जन्म हा


जात-पात-पंथ-भेद या इथे किती!
त्यावरी करेल शांत मात जन्म हा


धाय मोकली तरी कुणी न यायचे
वाहिला कुठेतरी पुरात जन्म हा


बाप कोणता न माहिती असे मला
माय सोडते कुण्या पथात जन्म हा


अमृतास घेवुनी कधी न पाहिले,
हाय! का करून सोडलात जन्म हा ?


पाहुनी चहूंकडे बघे दिसायचे
पेटला इथे कुण्या उरांत जन्म हा


जिद्द आणि ध्येय कार्य साधण्या हवे
पाहिजे न चांगल्या घरात जन्म हा


अंश जाहलो तुझा करेन सार्थ मी
भेटला पुढे जरी वनात जन्म हा


सूख पाहिजे सदा पुढे जगास या
घेतला म्हणून वेदनांत जन्म हा

गझल: 

प्रतिसाद

शेवटचा शेर फार उत्तम.

धन्यवाद!

धाय मोकली तरी कुणी न यायचे
वाहिला कुठेतरी पुरात जन्म हा

सुंदर शेर

कवित चन्ग्लि आहे. मस्त

अजय,
असे करू नये.
अशी गझल करणे म्हणजे देवाने एका जीवाला भूतलावर सदेह जन्म घ्यायला तर लावायचे पण आत्माच द्यायचा नाही असे आहे की नाही?
अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गझल ही मनाला खेचणारी असली पाहिजे. इथेच तिच्यात व कवितेत सीमारेषा पडते. आता बघा:

वाटला मला तरी सुखात जन्म हा
घेतलाय मानुषी जगात जन्म हा ( यात काय विशिष्टतापूर्ण विधान आहे? )

रीत माहिती कुठे मला जगायची ..
तीच येथ शोधण्या दिलात जन्म हा ( वरीलप्रमाणेच! )

जात-पात-पंथ-भेद या इथे किती!
त्यावरी करेल शांत मात जन्म हा ( म्हणजे काय? )

धाय मोकली तरी कुणी न यायचे
वाहिला कुठेतरी पुरात जन्म हा ( चांगला शेर , पण गझलियत नाही )

बाप कोणता न माहिती असे मला
माय सोडते कुण्या पथात जन्म हा ( चांगला शेर, पण गझल स्वरुपाचा नाही. )

अमृतास घेवुनी कधी न पाहिले,
हाय! का करून सोडलात जन्म हा ? ( म्हणजे काय ? )

पाहुनी चहूंकडे बघे दिसायचे
पेटला इथे कुण्या उरांत जन्म हा ( म्हणजे काय ? याच्यात गझलियत काय ? )

जिद्द आणि ध्येय कार्य साधण्या हवे
पाहिजे न चांगल्या घरात जन्म हा ( सरळ विधान ! )

अंश जाहलो तुझा करेन सार्थ मी
भेटला पुढे जरी वनात जन्म हा ( चांगला शेर, पण.. गझलियत...! )

सूख पाहिजे सदा पुढे जगास या
घेतला म्हणून वेदनांत जन्म हा ( चांगला शेर, पण हे कसे वाटते?)
दैव बोलले, सुखे जगास द्यायला
 ( सुख चे सूख पण करायला नको. )
मी तुला दिलाय वेदनांत जन्म हा
अर्थात यात पण गझलियत नाहीये, पण मूळ विचारातच ती नसल्यामुळे कुठल्याही शब्दमांडणीमध्ये ( या शेराच्या बाबतीत बोलतोय )ती येणे अवघड आहे.
उदा: याच स्वरुपाचा जर गझलियत असलेला विचार रचायचा असेल तर तो असा काहीसा होऊ शकेलः ( हे शेर नसून फक्त विचार आहेत हे लक्षात घ्या. )
१. कसे कुणास ठाऊक पण जन्म वेदनांत होऊनही आमच्याकडून देताना मात्र जगाला सुखेच दिली गेली.
२. जन्मतानाच्या वेदना पाहिल्यानंतर , सुखाशिवाय दुसरे जगास देण्यासारखे असणारच काय आमच्याकडे?
३. अरे सुखे मागणार्‍यांनो, जन्मतानाच्या वेदना दिसल्या नाहीत का तुम्हाला? आम्ही सुखे देऊ शकणे शक्य तरी आहे का?
वगैरे वगैरे..
मी आपला या साईटवर वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणून येतो. बर का?
 


 


 

रीत माहिती कुठे मला जगायची ..
तीच येथ शोधण्या दिलात जन्म हा
धाय मोकली तरी कुणी न यायचे
वाहिला कुठेतरी पुरात जन्म हा
वा वा