गझल तालात चालावी

जरी बेताल मी माझी गझल तालात चालावी
सदा रंगीन वाटावी तिन्ही कालात चालावी


असावे मी नसावे मी तयाचे फारसे नाही
तिची जादू जगी या शेकडो सालात चालावी


तिला ना वावडे दु:खे, सुखे, भीती नि मोहाचे
मनाचा जो असावा हाल त्या हालात चालावी


असो खोडी तिला लाडीकशी की गुदगुली व्हावी
प्रियेची जीभ लाजेने जशी गालात चालावी


जगाच्या कारभाराची करावी चौकशी त्याने
दिला जाईल जो देवास, अहवालात चालावी

गझल: 

प्रतिसाद

तिला ना वावडे दु:खे, सुखे, भीती नि मोहाचे
मनाचा जो असावा हाल त्या हालात चालावी


मस्त  आहे गझल. अगदी  'तालात.'
"प्रियेची जीभ लाजेने जशी गालात चालावी"- गुदगुली  करणारी  ओळ.

समीरशी सहमत.
तिला ना वावडे दु:खे, सुखे, भीती नि मोहाचे
मनाचा जो असावा हाल त्या हालात चालावी

भूषण,
निराळा रदीफ आहे. रदीफ काफिया चांगल्या रीतीने चालवले आहेत.
शेवटच्या शेराचा ्अर्थ कृपया स्पष्ट करावा.
असो खोडी...हा गोड शेर आहे. 

धन्यवाद समीर, ज्ञानेश, अजय व केदार.
शेवटच्या शेरात मला अभिप्रेत अर्थ नीट मांडता आलेला नाही.
असे म्हणायचे होते की जेव्हा देव विचारेल की तुमच्या या भूतलावर कायकाय केलेत सांगा, तेव्हा त्याला जो अहवाल दिला जाईल त्यात माझ्या गझलेचा उल्लेख असावा. हा हा. एक आपली उद्दाम इच्छा!